कविता, गझल, अनुभव, व्यक्तिविशेष, व्याख्याने, सुसंवाद, भाषानुवाद, इंग्लिश ट्रान्सलेशन आणि बरंच काही! Inspiring minds through words, wisdom, and stories.
Monday, August 15, 2022
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव : काय कमावलं? काय गमावलं? - Raj Shelke
Thursday, November 11, 2021
तुम्हीच सांगा आता नेमकं यांचं करायचं काय?
Friday, October 29, 2021
इंग्रजीतील स्वर म्हणजे जणू हत्तीचे दात!
इंग्रजीतील स्वर म्हणजे हत्तीचे दात!
दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे.
काही वर्षांपूर्वी कोणताही लहान मुलगा दिसला की त्याला हमखास बाराखडी विचारली जायची. मुलगाही मोठ्या तोऱ्याने किल्ला लढविल्याप्रमाणे उच्चरवात म्हणून दाखवायचा. जग जिंकल्याचा आनंद त्याला होत असे तेव्हा! शाळेमध्ये पण हे सगळं करून घेतलं जायचं. सगळा गाव ऐकायचा. बाराखडी म्हणजे बारा अक्षरी हे त्याला कधीही कळत नसायचं, परंतु बाराखडी म्हटल्याबरोबर अ पासून तर अहहाsss पर्यंत म्हणायचं आहे एवढं त्याला पक्क माहित असायचं. नकळतच त्याची बारा अक्षरी म्हणजे बाराखडी ही पाठ होऊन जात असे. अशी आपली माय मराठी. आता बदलत्या दिवसांबरोबर मराठीनेही थोडा उदारपणा दाखवला आहे आणि इंग्रजीमधील दोन स्वर स्वतःमध्ये सामावून घेतले आहेत. आता बाराखडीची चक्क चौदाखडी झाली आहे! नव्या शिक्षक मित्रांना ही गोष्ट माहीत आहे की आता अँ आणि ऑ यांना सुद्धा मराठीमध्ये स्वर म्हणून मान्यता मिळाली आहे. म्हणून आता बाराखडी नव्हे तर चौदाखडी.
ही झाली मराठीची गोष्ट. इंग्रजीच्या स्वरांचे काय? असा प्रश्न विचारला तर कोणीही सांगेल की इंग्रजीचं सोपं काम आहे. इंग्रजीमध्ये पाचच स्वर असतात. a,e,i,o आणि u.
मित्रांनो, खरं तर याच ठिकाणी आपला आणि आपल्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी शिकण्यामधला निम्मा पराभव निश्चित होतो! कारण इंग्रजी मध्ये असलेले हे पाच स्वर म्हणजे हत्तीचे दात! दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे. याचा अर्थ असा की दिसायला जरी इंग्रजी मध्ये पाचच स्वर असतील तरीही खरंतर ते वीस आहेत! आणि ही गोष्ट बिचाऱ्या काही शिक्षकांच्या गावीही नाही. विद्यार्थी तर दूरच राहिले. कित्येक वर्षे आपण याच पाच स्वरांच्या भोवती गिरक्या मारत मारत मुलांना गाणी म्हणून दाखवत आहोत आणि शब्द वाचायला लावत आहोत. परंतु या स्वरांच्या माया जंजाळामधील इतर छुप्या स्वरांकडे बहुतांश शिक्षकांचे लक्ष अजूनही गेलेलं नाही आणि ज्यांनी चाणाक्षपणे हे स्वर समजून घेतले, त्यांचे विद्यार्थी कधी कमी पडले नाहीत! वीस सोडा पण या पाच जणांची किमान कुंडली तरी किती जणांना माहीत आहे हीसुद्धा संशोधनाची बाब ठरावी.
आता a चंच उदाहरण घ्या आपण या अक्षरासाठी मराठीतून काय शिकवतो मुलांना? 'अ' बरोबर? परंतु केवळ एवढाच त्याचा अर्थ आहे का? खोल विचार केला तर असे लक्षात येईल की या एका अक्षरासाठी इंग्रजीमध्ये तब्बल पाच नावे आहेत!
उदाहरणाने समजून घेऊ. अनिल लिहितांना आपण a ला अ म्हणतो, आर्ट लिहिताना आपण त्यालाच आ म्हणतो, पेज लिहिताना त्यालाच ए म्हणतो,apple लिहिताना आपण त्यालाच अँ म्हणतो आणि ऑल लिहितांना त्यालाच ऑ म्हणतो! म्हणजे आपण a साठी कधी अ, कधी आ, कधी ए, कधी अँ, तर कधी ऑ म्हणतो.परंतु a ला इतकी सगळी नावे आहेत, हे किती शिक्षक त्यांच्या मुलांना शिकवत असतील?
e ला ए म्हणावे एवढं आपण मुलांना शिकवून मोकळे होतो, परंतु teacher शब्दाच्या शेवटी er आल्यावर आपण त्यातील e ला अ म्हणतो, eat वाचताना आपण त्यालाच इ म्हणतो आणि pen म्हणताना आपण त्यालाच ए म्हणतो! म्हणजे e या अक्षराला अ, इ, ए इतकी नावे आहेत म्हणायची.
i या अक्षराकडे वळू. याला आपण इ म्हणायला शिकवतो, it मधला. परंतु firm या शब्दांमध्ये जो i आहे, त्याला आपण अ म्हणतो. म्हणजे i ला अ सुद्धा म्हणतात किंवा ice या शब्दामध्ये जो i आहे त्याला आपण आइ म्हणतो. म्हणजे या अक्षरासाठी अ, इ आणि आइ अशी तीन नावे आहेत तर!
o या अक्षराचेही तसेच आहे. याला आपण ओ शिकवून मोकळे होतो, परंतु come शब्दामध्ये जो o आला, त्याला आपण अ म्हणतो. open मध्ये त्याला आपण ओ म्हणून शिकवतो आउट मध्ये आपण त्याला आ म्हणून शिकवतो, तर ऑफिसमध्ये आपण त्याला ऑ म्हणून शिकवतो. आणि एवढंच नव्हे तर one लिहिताना आपण त्याला व सुद्धा म्हणतो!!
u कडे या. u म्हणजे उ एवढे आपण शिकून, शिकवून मोकळे झालो, परंतु up लिहितांना आपण त्याला अ म्हटलं! कुमार लिहितांना उ म्हटलं तर युनिट लिहिताना चक्क यू म्हटलं! म्हणजे u ला तीन-तीन नावे!
लक्षात घेण्यासाठी गोष्ट अशी आहे की या पाचपैकी प्रत्येक अक्षराला किती नावे आहेत हे काही शिक्षकांच्याच अजून गावी नाही तर मुलांना कधी समजणार? ट्रेनिंग्जमध्ये नेमके काय होते हे नव्याने सांगणे नको! या लेखमालेच्या निमित्ताने ज्यांना हे हवं आहे त्यांच्यापर्यंत हे पोहचवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत.
स्वरांबद्दल आणखी काही पुढील लेखात पाहूया.
- राजेश्वर शेळके
( बिझिनेस इंग्लिश,केम्ब्रिज.)
9423542224
( या लेखमालेतील लेखांचे व्हिडीओ रूपांतरण https://www.youtube.com/c/ProfRajShelke
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. )
Saturday, October 23, 2021
cat च्या स्पेलिंग मध्ये k का नाही?
17 October 2021
cat च्या स्पेलिंग मध्ये k का नाही?
इंग्रजी वाचता न येण्यामागचा गोंधळ
जर k या अक्षराला क म्हणायचं आहे तर cat चे स्पेलिंग मध्ये k का नाही? किंवा c या अक्षराला क म्हणायचं असेल तर king च्या स्पेलिंग मध्ये c का नाही? असं जर एखाद्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विचारलं, तर शिक्षक काय सांगतील? गप्प बस. ते तसंच आहे. इंग्लिश असंच असतं. जेवढं सांगितलं तेवढं पाठ कर. आम्हीपण असेच शिकलो होतो. स्पेलिंगनुसार पाठ कर. खरं ना? परंतु तसं नाही. जोपर्यंत आपण मुलांना या प्रश्नांची खरी उत्तरं देऊ शकणार नाहीत, तोपर्यंत आपल्या मुलांना वाचता येणार नाही.ज्या शिक्षकांना हे गुपित माहीत असतं ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होतात, कारण ते मुलांना शंका उत्पन्न होण्यापूर्वी स्वतःच ती त्यांच्यापुढे मांडतात आणि मुलांना आश्चर्यचकित करून सोडतात. मुलांना आवडतं हे. जेव्हा शिक्षक त्यामागील गुपित मुलांना समजावून सांगतात तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा असतो!
खरंतर इंग्रजीमध्ये सॉफ्ट साऊंड आणि हार्ड साऊंड ( मृदू आणि कठोर )अशा प्रकारचे दोन ध्वनी असतात. आणि शब्द वाचन करत असताना या कन्सेप्टचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. c आणि k हे दोघेही जरी क असले तरी सुद्धा ज्या क नंतर e, i आणि y हे साऊंड म्हणजे ध्वनी येतील, त्या ठिकाणी क हा सॉफ्ट असतो. व त्यासाठी k हे अक्षर लागते, ( king मध्ये k नंतर i आहे म्हणून क साठी c न वापरता k घेतला आहे.) आणि a, o व u हे ज्या क नंतर असतील तिथे क हा harsh किंवा hard असतो, व त्यासाठी c हे अक्षर घ्यावे लागते,( cat मध्ये c नंतर a आहे म्हणून क साठी k न घेता c घेतला आहे! ) हे विद्यार्थ्यांना समजले पाहिजे.परंतु बऱ्याच शिक्षकांनाही हे दुर्दैवाने माहित नसते. मग ते तरी काय करणार?
c, g, s ही तीन अक्षरे ही अशीच आहेत. त्यांना प्रत्येकी दोन दोन नावे आहेत. ज्याच्यानंतर e, i,y येईल तो सॉफ्ट, ज्याच्यानंतर a, o,u येईल तो हार्ड. हे किती विद्यार्थ्यांना माहीत असेल? वाचकांपैकी ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी यांची दोन्ही नावे म्हणजे उच्चार असे आहेत.
c- सॉफ्ट असेल तर स / हार्ड असेल तर क
g- सॉफ्ट असेल तर ज / हार्ड असेल तर ग
s- सॉफ्ट असेल तर ज / हार्ड असेल तर स
उदाहरणाने समजून घेऊया.
city सिटी. कारण c नंतर i ( सॉफ्ट e, i y)आला आहे. नाहीतर कीटी म्हटलं असतं! car कार. कारण c नंतर a ( हार्ड a, o, u )आला आहे.
सी म्हणजे क हे तो शिकला आहे सी फॉर कॅट मधून. परंतु सी म्हणजे स हेसुद्धा त्याला माहित असले पाहिजे. अशीच गत g आणि s ची आहे. हे जर आपल्या विद्यार्थ्यांना अगोदरच्या टप्प्यांवर कळले तर ते judge ला 'जुडगे' म्हणणार नाहीत!
मित्रांनो, हा विषय फक्त ह्या दोन तीन अक्षरांपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण मुळाक्षरांची हीच गत आहे. ए पासून झेड पर्यंत बऱ्याच अक्षरांना वेगवेगळी नावे आहेत, वेगळे उच्चार आहेत. परंतु विद्यार्थ्यांना ते माहीतच नसते. त्यांनी लहानपणी ज्याप्रमाणे पाठ केले त्याचे नेमके विपरीत उच्चार पुढच्या वर्गांमध्ये गेल्यावर त्यांना म्हणावे लागतात. आणि मग त्यांचा संभ्रम होतो. म्हणून नुसतं एबीसीडीची घोकंपट्टी केली म्हणजे मुलांना वाचता येईल या भ्रमात कुणी राहू नये, तर प्रत्येक अक्षराला असलेले वेगवेगळे आवाज वेगवेगळे ध्वनी मुलांच्या मनःपटलावर लहानपणापासूनच कोरले गेले पाहिजेत. दुर्दैवाने हे न झाल्यामुळे त्यांना इंग्रजी वाचता येत नाही. आणि वाचता न आल्यामुळे यांना बिनचूक लिहीताही येत नाही. आणि मग इंग्रजी चा राक्षस त्यांच्या मानगुटीवर जो बसतो, तो शाळा सुटेपर्यंत त्यांची मानगुट सोडत नाही. पुढील लेखात आपण सर्व इंग्रजीच्या मुळाक्षरांची झाडाझडती घेऊया.
कारण
प्रत्येक मुलगा महत्वाचा
पहिल्या बेंचवर बसलेला असो,
की शेवटच्या बेचवरचा रुसलेला...
प्रत्येक मुलगा महत्वाचा!
- राजेश्वर शेळके
( बिझिनेस इंग्लिश,केम्ब्रिज.)
9423542224
Saturday, October 16, 2021
Thursday, October 7, 2021
इंग्रजी वाचता का येत नाही?
वास्तांगुणाहूंया!
🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, ▪️ *वास्तांगुणाहूंय...
-
◾ *फोनपुराण!* _एक मुद्दा, एक विचार!_ _24 डिसेंबर, बुधवार_ _लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ ▪️ *फोनपुराण!* अर्थात...
-
◾ *मोडला ‘आहे’ कणा?* _एक मुद्दा, एक विचार!_ *१५ जुलै २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक. ▪️ *मोडला ‘आहे’...
-
◾ *अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर* _एक मुद्दा, एक विचार!_ _21 जानेवारी 2026, बुधवार_ _लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, ना...