🇮🇳
*आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. त्यानिमित्ताने हे थोडंसं आत्मचिंतन.*
1947 साली आपण स्वतंत्र झालो, तेव्हा आपल्याकडे काय उरलं होतं? काहीच नाही. आपल्या हाती आपली सत्ता आल्यानंतर पुढील आजपर्यंतच्या वर्षांत खालील काही गोष्टी मात्र आपण अथक प्रयत्नांनी साध्य केल्या.
पंचवार्षिक योजना,
औद्योगिक विकास महामंडळांची निर्मिती,
आर्थिक समृद्धी,
उद्योगधंद्यांची भरभराट,
इतर देशांची वाताहत होत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावत असलेला आपला दर्जा,
कंप्यूटर मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देशाने घेतलेली झेप,
भारतातील बुद्धिमान लोकांनी परदेशात जाऊन, स्थायिक होऊन का होईना, आपल्या देशाचे उंचावलेले नाव,
भारताची झपाट्याने इंडियाकडे होत असलेली वाटचाल,
अनेक क्षेत्रे जी अगोदर सामान्य जनतेला माहीत नव्हती ती ती त्यांच्या माहितीपर्यंत आणण्यामधील मिळालेले यश,
पिढ्यानंपिढ्या अशिक्षित राहिलेल्या शेवटच्या स्तरापर्यंत शिक्षणाची पोहचलेली पाऊलवाट,
देशभर वेगाने विकसित होत असलेले रस्त्यांचे जाळे,
गरीब घरातल्या मुलांनीही जिद्दीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मिळवलेली अत्यंत सन्मानाची व महत्वाची शासकीय पदे,
डावलल्या गेलेल्या अनेक समाजबांधवांचा शासनकर्ता वर्ग बनण्यापर्यंतचा प्रवास,
एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर्स,
जागतिक परिसंवादांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व व सन्मान,
वैज्ञानिक प्रगती व देशाची संरक्षण सिद्धता,
हॉस्पिटल्स व आरोग्यसुविधा,
अनेक उत्पादनांमध्ये देशाचा असलेला अव्वल क्रमांक,
शहरीकरणामुळे आणि मेट्रोसिटीजमध्ये अनोळखी चेहऱ्यांच्या एकत्र काम करण्यामुळे थोडा नजरेआड झालेला जातीयवाद इत्यादी.
या आणि अनेक अशा गोष्टींमुळे भारत जगात ताठ मानेने उभा राहतो आहे. परंतु आपण ज्या ठिकाणी सपशेल तोंडावर पडलो आहोत असे खालील कित्येक प्रश्न जे आपण सहज सोडवू शकलो असतो, ते समाजात अजूनही टिकून आहेत. या प्रश्नांच्या बाबत आपण किती जागरूक आहोत?
सामाजिक अहंकार,
दुसऱ्यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती,
चिटकून बसलेली आणि जात नसलेली जात,
तिला जाऊ न देणारे तिचे रखवालदार,
खालच्या जातीच्या लोकांना त्यांच्यापेक्षा खालच्या जातीबद्दल असलेली घृणा,
सख्ख्या नात्यांना लाज आणणारी आणि आपल्याच खानदानाचे नाव खराब करणारी भाऊबंदकी,
अशिक्षित आईबापांनी रक्ताचं पाणी करून, पोरांना शिकवून, नंतर आपल्याच अट्टाहासाने त्यांच्या गळ्यात मारलेल्या अजागळ पोरी व त्यामुळे सगळ्यांच्याच सुखी संसाराची झालेली माती, पोरांच्या जागी पोरी ठेवुन सेम प्रकारे त्यांचेही केलेले मातेरे,
शिकलेल्या लोकांनी आधुनिकतेच्या नावाखाली त्यांच्या ओव्हरस्मार्ट मुलांना चरायला सोडलेले मोकळे कुरण, त्यामुळे बिथरलेली पिढी,
तल्लफ पासून व्यसनाधीनतेपर्यंतचा तरुणांचा हतबल, जीवघेणा प्रवास,
अति कर्मकांड,
दोन धर्मामधील तेढ,
शिकून सुधारण्यापेक्षा अधिकच अंधश्रद्धाळू झालेले व आपल्या सफाईदार इंग्रजी भाषेतुन संभाषण करून, इतरांवर छाप टाकुन, त्यांनाही बाबा, बुवा आणि तत्सम अतिकथित मार्गाला अक्षरशः जुंपणारे सू?संस्कृत भक्त,
देवघरातील वाढत चाललेली फोटोची संख्या,
नालायक व खुनशी नेतृत्व,
काटा काढण्याची प्रवृत्ती,
आपल्यापेक्षा दुसऱ्याला मोठं झालेलं बघू न शकण्याची विकृती,
स्त्रियांकडे बघण्याची घाण नजर,
स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी पुरुषांना अक्षरशः ब्लॅकमेल करणाऱ्या निर्लज्ज स्त्रिया,
लाज आणणारं घाणेरडं राजकारण,
स्वतःचा स्वाभिमान आणि तटस्थता अक्षरशः विसरून किंवा विकून कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले गेलेले आणि त्यांची बाजू हिरीरीने मांडून अनभिज्ञ समाजाची दिशाभूल करणारे समाजातील शिक्षक, विचारवंत, न्यायाधीश असे सन्माननीय परंतु लाचार घटक,
पैशातून राजकारण, राजकारणातून सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा राजकारण या दुष्टचक्राने घोटलेला लोकशाहीचा गळा,
स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणारे आधुनिक बकासुर,
पैशासाठी दर निवडणुकीत विकली जाणारी गरजवंत, बिनडोक, सामान्य जनता,
मतदान न करणारे प्रज्ञावंत,
शिक्षणाचा अक्षरशः ठरवून वाजवलेला बोजवारा आणि किळसवाना बाजार,
आईबापांना तोंडावर अपमानित करण्यापर्यंत पुढारलेली त्यांची नवशिकी औलाद,
झोपडपट्ट्यामधले पोसलेले दलाल आणि तिथे राहून श्रीमंत होऊनही झोपडपट्टी न सोडणारे तथाकथित भाई,
आर्थिक आकडेमोडीची लूटमारी करणारे आधुनिक कॉर्पोरेट दरोडेखोर,
शेल कंपन्यांमार्फत चाललेली हजारो कोटींची अफरातफरी
गरज नसताना वाढत चाललेली प्रार्थनास्थळांची यादी व त्यांच्या आडून पुढे रेटवले जाणारे छुपे अजेंडे,
पुस्तकांपासून दूर चाललेली पिढी,
मदत करण्यापेक्षा व्हिडीओ शूट करण्यात धन्य मानणारे टेक्नॉसेव्ही ड्युड्स,
देश आणि देशबांधव, माणुसकी आणि आपुलकी या कमालीच्या सपक होत चाललेल्या संकल्पना.
या आणि इत्यादी गोष्टींमुळे आपली मूळ प्रश्न यादी अजूनही उत्तरांच्या प्रतीक्षेत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आपला सदसदविवेक जागा होवो आणि भारतीय म्हणून आपली मान सदैव अभिमानाने उंचावलेली राहो या सदिच्छा.
✒️
- *राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक.*
*9423542224*