कविता, गझल, अनुभव, व्यक्तिविशेष, व्याख्याने, सुसंवाद, भाषानुवाद, इंग्लिश ट्रान्सलेशन आणि बरंच काही! Inspiring minds through words, wisdom, and stories.
Thursday, December 14, 2023
Tuesday, December 12, 2023
Friday, July 28, 2023
सोबतीला न्यायचे काहीच नाही
▪️
सोबतीला न्यायचे काहीच नाही
अन् तसेही यायचे काहीच नाही!
बोललो नाही तरी संवाद झाला!
राहिले सांगायचे काहीच नाही
जे हवे ते सर्व घे... एका अटीवर
जे नको ते घ्यायचे काहीच नाही!
माग माफी एकदा मोठ्या मनाने
बघ तुझे बिघडायचे काहीच नाही!
हारलो तेव्हा जरा माणूस झालो
मज अता जिंकायचे काहीच नाही!
विठ्ठला विश्राम कर आता सुखाने
या जगाचे व्हायचे काहीच नाही!
-
राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
Saturday, July 15, 2023
ज्याचा अडलेला हात...
◾
ज्याचा अडलेला हात...
ज्याचा अडलेला हात
त्यानं धरावा संयम
शब्द खुटीला बांधून
हाती ठेवावी दावण
ज्याचा अडलेला हात
त्यानं करावं एवढं
धरी डोक्याला गारवा
आणि जिभेला साखर
ज्याचा अडलेला हात
त्यानं बोलावं जपून
घ्यावी माघार जराशी
आणि रहावं नमून
ज्याचा अडलेला हात
त्यानं सांगावं मनाला
असे हजार गांजले
वेळ टळली कुणाला
ज्याचा अडलेला हात
त्यानं लपवावी कळ
वेळ बदलता येते
लावी प्रयत्नाचे बळ
ज्याचा अडलेला हात
त्यानं सूर्याला पहावं
आज मावळला जरी
उद्या उजळून यावं
✒️
राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
Thursday, July 13, 2023
मन थोडं मोठं करुन थोडं शांत रहायचं!
घरातल्या ज्येष्ठ मंडळीशी नव्या पिढीचा संवाद हरवू पाहतो आहे. या परिस्थितीला शब्दबद्ध करणाऱ्या या दोन रचना.
▪️
होता होईल तेवढं...
मन थोडं मोठं करुन थोडं शांत रहायचं
होता होईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं...
भांडयाला भांडं लागून घरात आवाज होतोच ना?
रांगतं बालक चालू लागल्यावर त्याचाही तोल जातोच ना?
मोठयांचंही तसंच असतं त्यांनाही सांभाळून घ्यायचं
होता होईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं...
मोठ्यांमध्येही लपलेलं असतं एक लहान मूल,
तेही कधी पांघरून घेतं खोडकरपणाची झुल
कधी कधी त्यालाही थोडं मोकळ रडु दयायचं
होता होईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं...
अधूनमधून येतच असतं एखादं वादळ भेटायला
एखादा अश्रू पुरेसा ठरतो माणसाचा धीर सुटायला
संयमाचं तीर्थ थोडं हळूच मस्तकावर घ्यायचं
होता होईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं...
कष्टाविनाच सगळं मिळावं असं होतं का कधी?
अरे मोगरासुद्धा ऊन सोसतो, फुलून येण्याआधी!
प्रयत्नांच्या रोपटयाला ठरवून पाणी दयायचं
होता होईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं...
अहंकाराचा वारा लागून बहकू शकतो माणूस..
थोडा इकडे थोडा तिकडे, सरकू शकतो माणूस
येतंच कधीतरी भान त्यालाही, पुन्हा माणसांत यायचं
होता होईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं...
-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224
▪️
जुन्या पिढीचं असं होतं..........
संस्कारांचं बियाणं घेऊन...
फिरत असतात वावरभर
जमेल तेवढं पेरत असतात
उधळत असतात शिवारभर
कधी कधी येतं पीक...
कधी कधी हसं होतं!
जुन्या पिढीचं असं होतं!!
कुठे कुणाचं चुकलं काही
की यांनाच होतो अधिक त्रास
नवी पिढी कशी कुचकामी
यावर बोलतील अख्खा तास
भूतकाळामध्ये शिरून म्हणतील
आमच्यावेळी असं होतं,
आमच्यावेळी तसं होतं...
जुन्या पिढीचं असं होतं!
कळकळ यांची खूप असते
पण हात पुरत नाही...
कधीकधी तर मेंदूही खास
काम करत नाही
भरकटलेलं जहाज काठावर
मग कसंबसं येतं...
जुन्या पिढीचं असं होतं!
त्यांचा त्यांना मान मिळाला
की आभाळ यांना ठेंगणं
मग नको कुणावर रुसणं
आणि नको कुणावर चिडणं
नातवंडांबरोबर असतील तर मग
ते म्हणतील, तस्सं होतं!
जुन्या पिढीचं असं होतं!
हळवं असतं यांचं मन
डोळ्यांमध्ये असतो झरा...
पल्याड कोणी बोलवित असतं
शरीर थकलेलं असतं जरा
त्यांच्या नुसत्या असण्यानेही
घर अगदी साजेसं होतं
जुन्या पिढीचं असं होतं!!
हळूच सोडुन जातात हात
त्याचा नंतर होतो त्रास
फोटोकडे बघतो आपण
शिल्लक राहतात केवळ भास
वेळप्रसंगी गप्पा निघतात
त्यांचं वागणं कसं होतं!
...
जुन्या पिढीचं असं होतं!
-राजेश्वर पांडुरंग शेळके
नाशिक
9423542224
Wednesday, March 22, 2023
गुढी
▪️
गुढी ज्ञानाची लावलीज्ञान सावराया आले
केली आनंद पताका
सुख घरी स्थिरावले!
गडू तमाचा पालथा
वर टांगला गुढीला
कडूनिंबाचा मोहर
दिला खबरदारीला!
गंध कपाळीचा धनी
शुभ मंगलाची खूण
एक साखर मोहर
कडू-गोड आठवण!
नवे वस्त्र लेऊनिया
करा कार्याचा आरंभ
हार-कडे; उदबत्ती
जणू कष्टाला सुगंध!
दिला प्रयत्नाचा टेकू
गुढी उंच चढवली
फडफडली पताका
चारी दिशांत घुमली!
असा सुखाचा पाडवा
देवा येवो घरोघरी
लक्षुमीच्या पावलांनी
होवो गरिबी साजरी!
-राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
Friday, March 3, 2023
थांब जरासा नकोस होऊ अधीर इतका
▪️
थांब जरासा नकोस होऊ अधीर इतका
झाला नाही अजून वेड्या उशीर इतका
जरा सुकू दे ताज्या जखमा नको उगाळू
दुखावलेला भाग न झाला बधीर इतका
श्वासांचीही भीक म्हणाला नको मला ही
कुणास दिसला जगात कोणी फकीर इतका
वार कदाचित होत असावा राजावरती
उगाच नाही घाबरलेला वजीर इतका
या जगण्यावर शिंपड थोडे अत्तर पाणी
आयुष्याचा नको व्हावया शिशीर इतका
तुला क्षणाचा विलंबसुद्धा नकोच असतो
मृत्यो, केला कुणी तुला वक्तशीर इतका?
- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
Subscribe to:
Posts (Atom)
वास्तांगुणाहूंया!
🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, ▪️ *वास्तांगुणाहूंय...
-
◾ *फोनपुराण!* _एक मुद्दा, एक विचार!_ _24 डिसेंबर, बुधवार_ _लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ ▪️ *फोनपुराण!* अर्थात...
-
◾ *मोडला ‘आहे’ कणा?* _एक मुद्दा, एक विचार!_ *१५ जुलै २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक. ▪️ *मोडला ‘आहे’...
-
◾ *अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर* _एक मुद्दा, एक विचार!_ _21 जानेवारी 2026, बुधवार_ _लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, ना...