Wednesday, January 22, 2025

चालण्याची गोष्ट!


*चालण्याची गोष्ट!*

 *आपली वडीलधारी मंडळी नेहमीच पुढच्या पिढीला सल्ला देत आली आहे, "स्वतःच्या पायावर उभे रहा!" पण उभं राहून करायचं काय? हे काही या मंडळींनी सांगितलं नाही. मग माणसं मोठी बेरकी. त्यांनी स्वतःहूनच पुढे "...आणि अखंड चालत रहा!" हे वचन जोडून घेतलं आणि आजन्म चालत राहिली!*

     *कधीकाळी माणूस खाली मान घालुन गपगुमान चालायचा. मग त्याने वेगात चालण्यासाठी सायकल आणली. सायकलवर मन भागलं नाही, म्हणून अजून वेगात जाण्यासाठी मोटरसायकल आणली. मग फोर व्हिलर आणली. मग पोट सुटायला लागल्यावर पुन्हा रिव्हर्स प्रवास सुरू केला! आता शहरात माणसं सकाळी संध्याकाळी चालायला तर जातातच, शिवाय रिक्षाच्या पाठीवर 'वजन वाढवा /कमी करा नाहीतर पैसे परत मिळवा' अशा जाहिरातीही डकवतात! शिवाय चार पाच हजाराचे प्रोटीन्सचे डबे विकून पैसेही कमवतात!!*

    *माणसाला खायला लागतंच किती? दोन हातांची ओंजळ करा. तिच्याकडे पहा. या ओंजळीत जेवढं अन्न मावेल तेवढीच आपली एक वेळची अन्नाची गरज. बरं, आपण खातो किती? करा विचार! आधी पोटाला दोन घास मिळावेत म्हणून माणसं पायपीट करायची, आता गरज नसताना दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्लेले दोन घास जिरावेत म्हणून पायांचं पीठ पाडतात! काखुटीला संसार बांधून माणसं गावोगाव, मैलोन्मैल चालायची, आता जॉगिंग ट्रॅकला खड्डे पडेपर्यंत चकरा मारतात! अगोदर चालण्याच्या भरात आपण किती अंतर कापलं याचं माणसांना भान नसायचं. आता पेडोमीटर लावून 'आपण दहा हजारांपैकी किती पावलं चाललो?' ते चेक करतात, आणि स्वतःच सेलिब्रेट करतात!* 

  *'आपण चालायला गेलं पाहिजे' चा साक्षात्कार अगोदर घरातल्या एकाला म्हणजे नवरा किंवा बायकोला होतो. मग 'मीही जाते/ जातो' म्हणत संसाराचं दुसरं चाकही त्या गाड्याला सामील होतं. पण जे घरी तेच दारी. नवऱ्याची सुरू होते बडबड, बायकोला हवी असते शांतता. एकाचा स्पीड असतो जास्त तर दुसऱ्याचा कमी. नवरा म्हणतो 'तू जरा पटपट चल.' बायको म्हणते, 'तुम्ही जरा हळू चला, नाहीतर निघा पुढे.' हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होतो. दोघेही आपापल्या परीने घामाघूम होऊन घरी येतात! ज्यांचे ट्युनिंग उत्तम जमते त्यांची वजनं कमी होतात, इतरांची तशीच राहतात!*

    *अनेक माणसं त्यांच्या अनेक तऱ्हा. मात्र या सर्वांमध्ये उठून दिसतात ते ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता नित्यनेमाने पहाटे किंवा आपल्या ठराविक वेळेला ग्राउंडवर, रस्त्याने किंवा ट्रॅकवर दिसणारे. हे बऱ्याचदा एकटेच असतात. वय इथे मॅटर करत नाही. चालणं हा त्यांच्या दररोजच्या आयुष्याचा भाग झालेला असतो. 'कॉन्स्टंट वॉकिंगमधल्या मेडिटेशन' चा अनुभव ते घेतात. आरोग्य तर राखलं जातंच; परंतु महत्वाचं म्हणजे स्वतःचा स्वतःशी अंतस्थ संवाद होतो, जो त्यांना चांगला माणूस बनवतो.*

  *तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे 'आपुलाची वाद आपल्यासी' चा अनुभव प्रत्येकाला घेता यायला हवा. स्वतःला तटस्थपणे चाचपून बघता यायला हवं. आत्मचिंतन व्हावं. आपल्या ध्येयपथावर आपण बरोबर चालतो आहोत की नाही? आपलं नेमकं कुठे चुकतंय? आपल्यामध्ये काही बदल करायचा असेल तर काय आणि कसा केला पाहिजे? व्हॉट नेक्स्ट? या सर्वांची झाडाझडती घेता यावी. या एकट्याने चालण्याच्या वेळेला ती घेता येते, आणि विशेष म्हणजे शोधणाऱ्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरंही सापडतात.*

 *बाय द वे, तुमचा स्वतःशी संवाद होण्यासाठी तुम्ही काय करता?*

-प्रा. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
_चलसंवाद : 9423542224_
 
https://www.youtube.com/c/ProfRajShelke

Wednesday, January 15, 2025

किमान बोला

*गोडगोड बोला!* 

    *आजकाल थोडं काही झालं की माणसं अबोला धरतात, दुरावतात. थांबलेलं बोलणं सुरू करायलाही 'मी का बोलू? त्याला गरज असेल तर बोलेल अगोदर!' असं हटून बसतात. या न बोलण्यापायी आजवर कितीतरी नाती गुदमरून गेली आहेत. माणसाला बोलताच आलं नसतं तर? माणसांमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये काय फरक राहिला असता?*

     *काही माणसं छान बोलतात. त्यांच्या बोलण्याला रसवंती असते. त्यांच्या बोलण्याने माणसं जोडली जातात. अशी माणसं बोलू लागली, की ऐकणाऱ्याला ऐकतच राहावंसं वाटतं. काही माणसं नको तितकं बोलतात. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात! त्यांच्या बोलण्यात ज्ञानाच्या गोष्टी कमी आणि निरर्थक गुऱ्हाळच जास्त. एकीकडे बसून ऐकायचं आणि दुसरीकडे जाऊन ते उगाळत बसायचं असा यांचा शिरस्ता असतो. त्यांच्या व्यर्थ बडबडीतून काही साध्य तर होत नाही, परंतु लोकांना त्यांच्या बडबडीचा कंटाळा मात्र नक्की येतो. एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन तावातावाने भांडणारी माणसं पाहिलीत का कधी? ही माणसं एरवी लपवून ठेवलेल्या त्यांच्या अगाध शाब्दिक ज्ञानाची भांडताना मुक्त उधळणच करीत असतात!*

     *असं म्हणतात की माणसाला 'बोलणं' शिकायला जन्मल्यापासून एक वर्ष लागतं आणि 'गप्प बसणं' शिकायला बाकीचं सगळं आयुष्य कमी पडतं. तसं बघितलं तर माणूस बोलायला शिकला हजारो वर्षांपूर्वी; पण अद्यापही त्याला कुठे? किती? कसं बोलावं? किंवा बोलूच नये याचं म्हणावं तसं तारतम्य आलेलं नाही. कायम मूग गिळून बसलेली, बोलायचं असतानाही मुद्दाम बोलण्याचं टाळणारी, बोलायला हवं तेव्हा गप्प बसणारी आणि गप्प बसावं तिथे मध्येच काहीतरी बोलून रंगाचा बेरंग करणारी, फक्त टोमणे मारण्यापुरतंच बोलणारी, बोलण्यात कायम अहंकाराचा उग्र दर्प असलेली अशी तऱ्हेतऱ्हेची माणसं पाहिली की वडीलधाऱ्यांनी 'मौनम् सर्वार्थ साधनम्' का म्हटलं असावं याची प्रचिती येते. याउलट चारचौघात चार शब्दही धड बोलू न शकणारी माणसं पोटात उगाच हजारो शब्दांचं कोठार घेऊन फिरत असतील की काय अशी शंका येते. 'बोललो असतो पण जाऊ दे आता!' असं म्हणत कायम संशयाचं धुकं निर्माण करणारी माणसं काही कमी नव्हेत! याच्या उलट इतरांच्या लेखी अबोल असणारी माणसं त्यांच्या पठडीतला कुणी भेटला की अशी काही खुलतात की ज्याचं नाव ते!*

   *खरं तर इतरांच्या जखमांवर शब्दांची हळुवार फुंकर घालून त्यांना धीर देणाऱ्या, जगण्याचा आशावाद देणाऱ्या माणसांनी हे जग जिवंत ठेवलं आहे. थोडं सांगून आणि थोडं ऐकून माणसांमधली दरी सांधण्याची सुबुद्धी ज्या क्षणी माणसात येते तेव्हा त्याचं बोलणं किंवा शांत राहणंही एक सोहळा होऊन जातो. त्याच्या अंतर्मनातून शब्द उमटतात,*

_*बोललो नाही तरी संवाद झाला*_
_*राहिले सांगायचे काहीच नाही!*_

- प्रा. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
सुसंवाद - 9423542224

Wednesday, January 8, 2025

धरसोडपुराण



धरसोडपुराण!

नवीन वर्ष लागल्यापासून बऱ्याच जणांनी काहीबाही सोडण्याचा धडाका लावला आहे. कोणी म्हणे नवीन वर्षापासून चहा सोडलाय. कोणी बिडीपुडी सोडली आहे. कुणी सिगारेटला रामराम केलाय. कुणी बायकोमैत्रीणप्रेयसीच्या धाकाप्रेमाशब्दापोटी दारू सोडली आहे. कुणी काय सोडलं आहे तर कुणी काय. सोप्पंय. मी स्वतः आतापर्यंत शंभर वेळा चहा सोडलाय. पण चहाने मला कुठे सोडलंय? जेव्हा चहा मला सोडेल तेव्हा खरं! आता हा लेख लिहिताना मी चहाचा एक झुरका घेतला आहे ही बात अलहिदा!
  काहीतरी सोडण्याची, त्यागण्याची तयारी दाखवणं म्हणजे आपल्यातल्या चांगल्या माणसाचं जागृत होणं असतं. कुठल्यातरी मुहूर्तावर आपल्यातला हा चांगला माणूस जागा होतो, ही चांगली गोष्ट आहे. पण हा चांगला माणूस काही दिवसांतच पुन्हा का ढेपाळतो काही कळत नाही! म्हणून चहा सोडलेला इसम काही दिवसांनी पुन्हा चहा पिताना दिसला तर त्याला नावं ठेवू नका. फक्त स्माईल करा!
   खरोखरच जर एखाद्याला एखादी गोष्ट सोडायची असेल तर तो तिचा जाहीर प्रचार करत बसत नाही. लोकांना ते आपोआप कळतं. मुळात एखाद्या गोष्टीचा अगदी त्रास व्हावा इतकं अति करण्याची गरज काय?  अजाणतेपणाने, इतरांच्या दबावाला किंवा तात्कालीक मोहाला बळी पडून नको ते शुक्लकाष्ठ आपण पाठीमागे लावून घेतलेलं असतं, त्याच्यापासून दूर होण्याची सुबुद्धी अशा एखाद्या समुहूर्तावर व्हावी यापेक्षा दुसरा सुवर्णयोग तो कोणता! माणसाला कोणीतरी सदगृहस्थ, सखा, मार्गदर्शक ऐन कोलमडण्याच्या क्षणाला भेटतो, कान टोचतो, चुकणारं पाऊल सावरतो! मग माणूस म्हणतो, या या मुहूर्तापासून मी ही गोष्ट सोडणार! शहाणा, समजदार असेल तर पुन्हा चुकीच्या मार्गाला जात नाही. अशा वेळी या सोडण्यालाही अर्थ प्राप्त होतो. ज्यांना हे जमणे नाही त्यांच्या पालथ्या घड्यावर कितीही पाणी ओतलं तरी तो भरणार थोडाच आहे?
   काही गोष्टींना सोडायलाच हवं असंही काही नसतं. त्यांना आपल्या आयुष्यात आनंदाची चिमूटभर समांतर जागा देऊनही आयुष्य सुखकरपणे पुढे नेता येऊ शकतं. परंतु हा समतोल फार कमी लोकांना साधता येतो.
   जे स्वतःहून विचारपूर्वक स्वीकारलं आहे, कष्टाने कमावलं आहे, जीवापाड जपलं आहे, ज्याच्यासाठी आयुष्याची काही वर्ष खर्च केली आहेत, अशा गोष्टीवरही कधीकधी जड अंत:करणाने पाणी सोडावं लागतं. अशा गोष्टी सोडताना माणसाचा नवा जन्म होत असतो. वरवर पाहता या गोष्टी सोडल्यासारख्या वाटतात, परंतु त्या सुटत नाहीत. आजन्म माणसाची सोबत करत राहतात. त्याच्या मनात राहतात.
   या धरण्यासोडण्याच्या घाईत ज्यांना गमवायला नको होतं अशी माणसं आपल्याकडून चुकूनही दुखावली, दुरावली जाऊ नयेत, याची काळजी घ्यायला हवी. कारण अशी माणसं आपल्याला दुखावत नाहीत, परंतु आपल्या आयुष्यातून इतक्या बेमालुमपणे निघून जातात, की ते कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. नंतर केवळ पश्चाताप उरतो. आनंद बक्षी साहेबांच्या शब्दांत सांगायचं झालं तर,
बाद में प्यार के चाहे भेजो हजारो सलाम...
वो, फिर नहीं आते!
-
प्रा. राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
भ्रमणसंवाद - 9423542224

Thursday, January 2, 2025

नवीन वर्ष

नवं वर्ष. पहिला दिवस. पहिला लेख. 
मशागत करायला घेतलीय. स्वतःच्याच मनाची.
यानिमित्ताने मला स्वतःची झाडाझडती घ्यायला मिळणार आहे. तुम्ही सर्वजण सोबत आहातच.
तुमच्या प्रतिक्रियेने बळ मिळणार आहे.
- राज 

नवी उभारी

 नव्या वर्षाचा पहिला दिवस. पहिली सकाळ. पहिली किरणं. मागच्या वर्षात जे काही भलंबुरं घडलं असेल ते सगळं पुसून टाकून आलेला ताज्या दमाचा नवा दिवस. कोलमडायला झालं असेल तर जिद्दीने पुन्हा उभं राहण्याचा धीर देणारा दिवस. ज्याच्यासमोर आपण नतमस्तक होतो त्याला शरण जाऊन नव्या वर्षातल्या सुखासाठी आशीर्वाद मागण्यासाठीचा मंगलमय दिवस. 

जगी सर्वसुखी असा कोण आहे? कुणीच नाही. जगात ज्याला दुःखच नाही असा कोण आहे? कुणीच नाही. इतरांच्या मानाने कणभर असलेल्या आपल्या दुःखाला बाजूला सारून आपल्याकडे येऊ पाहणाऱ्या मनभर सुखाला दोन्ही बाहू उभारून आनंदाने आमंत्रण देण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस. 

काही माणसं सरत्या वर्षात सोडून गेली. वाईट झालं. परंतु ती जिथे कुठे असतील तिथून मला पाहत असतील तर त्यांना माझ्या वागण्याचा, कर्तृत्वाचा आनंद होईल असं जगून दाखवीन अशी निष्ठापूर्वक शपथ घेण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस. वेळ प्रत्येकावर येते तशीच ती प्रत्येकाचीही येते. मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. त्यासाठीची सजगता आपल्यात यावी म्हणून सूर्यनारायणाकडे दोन्ही हातांची ओंजळ करून दान मागण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस. 

 गेल्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील; काही निर्णय चुकले असतील, असूदेत. झालेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारून, नियतीने दिलेल्या शिक्षेचा स्वीकार करून, पुन्हा आपल्यामधलं माणूसपण सिद्ध करण्यासाठी निर्मात्याने आपल्या पदरात टाकलेलं सुंदरसं दान म्हणजे हे नवीन वर्ष. 

नव्या कोऱ्या पत्त्यांच्या कॅटमधून काढलेले पत्ते मनसोक्त पिसावेत आणि समोर बसलेल्या सवंगड्यांना दिलखुलासपणे वाटावेत तसं निर्मात्याने त्याच्याकडे असलेल्या अनंत दिवसांच्या कॅट मधून तीनशे पासष्ट पानं आपल्यासमोर फेकली आहेत. त्यातलं पहिलं पान म्हणजेच एक जानेवारी. आपल्या वाट्याला कोणतं पान आलं आहे हे पाहून अति आनंदीही व्हायचं नाही किंवा नाराजही व्हायचं नाही, कारण पानं बदलत राहणार आहेत! न जाणो कसा अचानक हुकमाचा एक्का आपल्या हाती येईल! तोपर्यंत आपण खेळात टिकून आहोत याचा आनंद आणि कृतज्ञभाव आपल्यासाठी महत्वाचा. कोसळूनही पुन्हा नवी उभारी घेण्यासाठी 'बचेंगे तो और भी लडेंगे' ही वृत्ती महत्वाची.

  माणसांच्या कोलाहलात काही माणसं लक्षात राहतील. काहींवर लक्ष ठेवावं लागेल. काही आपल्याला लक्ष्य करतील त्यांचं लक्ष चुकवावं लागेल. मात्र आपल्या ध्येयावरचं आपलं लक्ष विचलित होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. या सर्व गोष्टी मनावर गोंदवून घेत नव्या वर्षाला सामोरे जाऊया. आपल्या हसण्यामागील दुःख, रागावण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण न सांगता समजून घेणाऱ्या माणसांना जपूया आणि येत्या वर्षात यशाचा, आनंदाचा, आणि आरोग्याचा नवा अध्याय लिहूया. 
-
प्रा. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
भ्रमणसंवाद - 9423542224

Thursday, September 5, 2024

खरा शिक्षक कोण?

शिक्षक दिन

खरा शिक्षक कोण?
या अवघड प्रश्नाचे उत्तर अगोदरच देऊन टाकतो!
- शाळा सोडून गेल्यानंतरही आयुष्यभर जो विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील, तो खरा शिक्षक. 'आमचे सर!' किंवा 'आमच्या मॅडम!' असे म्हटल्याबरोबर ज्यांचा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो ते खरे शिक्षक!

5 सप्टेंबर शिक्षक दिन...सर्वांना शुभेच्छा!!

शिक्षक दिनाचा आज सकाळी सुरू झालेला धमाका ( वन डे पॅक!) रात्री 12 वाजेपर्यंत चालेल बहुधा!

या गदारोळात एक छोटी वाचनीय पोस्ट आली. त्यात मी काही माझं टाकलं, पोस्ट करावीशी वाटली, म्हणून हा उपद्व्याप.

कुणाला दुखावण्याचा, कुणाची बाजू घेण्याचा प्रयत्न नव्हे, पण फिरस्ती करत असताना या गोष्टी खरोखर दिसतात.

थोडं आत्मचिंतन!

जर तुम्ही थोडे सुद्धा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असाल, तर तुम्ही ही पूर्ण पोस्ट नक्की वाचाल. वाचल्यानंतर तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी इच्छुक आहेच. 🙏


भाग 01.

नुसत्या आप्पाचाच नाही, आजच्या शिक्षणाचा विषय पण हा र्डे !

आजचं शिक्षण, शिकवा, पण खबरदार मुलांना काही बोलाल तर!  इथपासून मुलांना शाळेत पाठवा; पण ती सुरक्षित घरी येतीलच याबद्दल आम्ही ठामपणे सांगू शकणार नाही! या नाजूक वळणावर आलंय.

एखादी काही कुरकुर झाली की फक्त शिक्षक कसे चुकीचे होते? आणि माझी मुलगी/ मुलगा कसा योग्य आहे? आणि तो/ती कधीच खोटे बोलत नाही! यावरच चर्चा रंगताहेत!

वर्गातील दोन-तीन टग्या मुलांमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब होऊ लागला आहे.  लहान लहान पोरांचे शाळेबाहेरच्या भाई लोकांशी संबंध आहेत! एका शाळेत तर हा त्रास इतका आहे की मॅडमना शिकवूच देत नाहीत, त्यात हायपरऍक्‍टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच. त्या हाताळायच्या कशा हा शिक्षकांसमोर प्रश्न पडलेला आहे.

शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल करणे कठीण होऊ लागले आहे. ADHD, Learning Disabilities, Lack of Concentration यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. जे अगोदर कुठे होते कुणास ठाऊक?

शिक्षण कायद्याच्या कचाट्यामुळे विद्यार्थ्यांना मारणे सोडा; साधे रागावणे कठीण होऊन बसले आहे. शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यावी तर काय द्यावी? हा प्रश्न पडलाय. वर्गाच्या बाहेर काढले तर पालक भांडायला येतात, म्हणतात की तो/ती वर्गाच्या बाहेर राहिल्याने तिचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्गात उभे केले तर पालक ओरडतात, की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला! आता तो शाळेत यायला नाही म्हणतोय!!

कान पकडून उठाबशा काढायला सांगितले तर पालक दुसऱ्या दिवशी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतात.

खूप त्रास देतो म्हणून कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून काढून टाकले, तर लगेच पालक म्हणतात आम्ही फी भरली आहे, त्याला ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या. तशी स्कूल डायरी मध्ये नोटच येते.

टीचरने त्याच्याशी बोलणे सोडले, तर पालक लगेच म्हणतात पाहू टीचर किती दिवस बोलत नाही तुझ्याशी... तू स्वतःहून बोलू नकोस. प्रिन्सिपल ला सांगून तिला तुझ्याशी बोलायला मी भागच पाडते. अशी कशी टीचर बोलत नाही पाहूच!

शिक्षक हे सुधारणांचे प्रवेशद्वार असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेम आणि स्वातंत्र्य देऊन त्यांची मनं जिंकायची असतात. पण हे करण्याच्या प्रक्रियेमध्ये, शिस्त लावण्यासाठी काही अधिकार शिक्षकांना सुद्धा लागतात. मारणे, जबर शिक्षा करणे हे अघोरीच आहे; ते केव्हाच कालबाह्य झाले आहे आणि आजकालचे शिक्षक याचे समर्थनही करणार नाहीत. पण सध्याच्या काळात साधे रागावणे, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी छोट्या-छोट्या शिक्षा करणे सुद्धा पालकांच्या दबावापोटी बंद झाले आहे. याचा विद्यार्थ्यांवर दूरगामी खूप वाईट परिणाम होतो आहे आणि हे पालकांना स्वीकारावेच लागेल.

ज्या विद्यार्थ्यांना अपमान पचवण्याचे मानसिक धैर्य राहत नाही, असे विद्यार्थी तरुणपणी लवकरच नैराश्याच्या विहिरीत पडतात. मला कोणी रागवत असेल तर ते माझ्या फायद्यासाठी आहे, कुणीही शिक्षक आनंदासाठी, काट काढण्यासाठी, दुसऱ्याचा राग विद्यार्थ्यांवर काढण्यासाठी विद्यार्थ्याला रागवत नसतात. ते रागवतात याचा सरळ अर्थ विद्यार्थी कुठेतरी चुकतो आहे! पण विद्यार्थ्यांची धारणा होते, की मला कोणीही रागवू नये ओरडू नये. तसाच तो मोठा होतो आणि मग पुढे आयुष्यात वावरताना, नोकरी करताना व्यवसायामध्ये, समाजात लोकांशी वागतांना जड जाते. कारण जग आपल्या म्हणण्यानुसार नाही चालत.

आयुष्यात मान-अपमान हे दोन्ही येतच असतात. वर्गात नुसतं रागावलं तरी आजच्या इवल्याइवल्या मुलांचा अपमान होतो! त्यामुळे तेही आजकाल शिक्षकांनी बंद केले आहे, कारण त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालकांकडून  त्यांचा अपमान होण्याची शक्यता असते!

त्यामुळे अपमान कसा सहन करावा आणि त्यातून self analysis कसे करावे ही प्रक्रियाच मुलांच्या मनांत होत नाही. आणि नंतर आई-वडील म्हणतात की याला अपमानच सहन होत नाही!

थोडे काही झाले, की पालक शिक्षकांशी चर्चा करायला येतात, ज्यामध्ये चर्चेचा सूर कमी आणि कोर्टात जसे आरोपीला प्रश्न विचारतात तसाच शिक्षकांना प्रश्न विचारण्याचा सूर असतो. कारण शाळेने ही त्यांच्याकडून करकचून फीस वसूल केलेली असते! याचा उल्लेख घरी वारंवार होत असतो. या सर्व सु?!संवादामुळे मुलांच्या मनात शिक्षकांविषयीचा आदर निघून जातो, आणि विद्यार्थी हेच शिकतो की मला काही अडचण आली तर आहे माझे ममी 'पपा!

मुलांच्या प्रत्येक (चुकीच्यासुद्धा) निर्णयांमध्ये काही सो कॉल्ड ममी 'पपा सहभागी होतात. ते इतके involve होतात, की त्याचा अपूर्ण राहिलेला होमवर्क, प्रोजेक्ट, अभ्यास तेच स्वतः पूर्ण करतात. त्यामुळे काही मम्मी आणि पप्पांना चष्मेही लागले! परंतु यामुळे पाल्य दुसऱ्यांवर अवलंबून रहावे असा चुकीचा धडा शिकतो आहे ही गोष्ट ते सोयीस्करपणे विसरतात. ही मुलं मोठी झाली आणि घरात आग लागली तरी फायर ब्रिगेडला फोन करायचा असतो हे सुद्धा त्यांना लवकर सुचत नाही एवढे ठोम्बे बनतात कारण लहानपणापासून त्यांना स्वतः काही करावे लागते हे शिकायलाच मिळाले नाही!

मानसशास्त्राचा नियम आहे. 'जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर असतो, श्रद्धा असते तेव्हा शिक्षक जेव्हा वर्गात शिकवतात तेव्हा अंतर्मनाची द्वारे आपोआप उघडली जातात' आणि शिक्षक जे शिकवतात ते लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा पालक विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या वर्ग शिक्षकांशी उद्धटपणे बोलतात किंवा सातत्याने भेटून तक्रारीचा पाढाच गात राहतात तिथे पाल्याच्या मनात तरी शिक्षकांबद्दलचा आदर कसा राहील?

परंतु खमक्या शिक्षकांनी हे लक्षात ठेवावे की, Respect is always commanded not demanded!


भाग 02

हा भाग फार महत्वाचा आहे.

काही भागांत विद्यार्थ्यांना शिकण्याची खूप उत्सुकता आहे परंतु शिक्षक स्वतःच कमी पडताहेत. म्हणून मुलं खऱ्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

नवीन नवीन आयोग लागू झाल्यापासून, आणि शिक्षकांच्या बोकांडीवर नवीन नवीन योजनांचे भूत सरकारने बसवायला सुरुवात केल्यापासून, शिक्षकांमधलं 'गुरूतत्त्व' जरासं निस्तेज पडू लागलं आहे. काय स्वप्न घेऊन या क्षेत्रात आलो होतो आणि काय करावे लागत आहे, ही गोष्ट बऱ्याच शिक्षकांच्या मनाला बोचते आहे. आम्हाला फक्त शिकवू द्या हो! अशी ओरड अधून मधून ऐकायला येते. पण यावर गांभीर्याने विचार करायला सरकारलाही वेळ नाही, उठ सूट आंदोलने करणाऱ्या राजकीय पक्षांनाही, आणि पालकांनाही!

दुसऱ्या बाजूला काही शिक्षकांनी दणक्यात इनिंग खेळायला सुरुवात केलेली आहे. कधीकाळी वैचारिक चर्चा करणारे शिक्षक आता आणखी प्रगल्भ विचार करू लागले आहेत! भिशी किती तारखेची आहे? काय झालं मग त्या प्लॉटचं? मी फक्त दोन टक्क्यांनी देतो. माझा रो हाऊस घेता का? 'टाटा मोटर्स' मध्ये टाका तुम्ही!  कालच अडीच लाख रुपये भरले क्लाससाठी!  आपण माझ्या फोर व्हीलर मध्ये जाऊ! खूप बोर झालंय या मीटिंगमुळं. आज बसुया का? या अनएक्स्पेक्टेड डायलॉग्सची भर वाढली आहे!

माझ्या छोट्याशा कारकिर्दीत मला आढळलेले शिक्षकांचे सहा प्रकार पुढील प्रमाणे. आपण शिक्षक असाल तर यात कुठे बसता ते शोधा.

1. नवीन शिक्षक!
नवं रक्त असतं, उत्साह फार, पण नॉलेज कमी, सगळं कॉपी पेस्ट! घे गाईड,सांग समजून. मार रट्टा. शिवाय जुण्यांची कामं ऐका. शिंगरू ओझ्यानेच मरण्याची शक्यता जास्त. शिकवणं बोंबललं.

2. Model शिक्षक!
इतकं नटतील की त्याला माप नाही, सर मॅडम एक समान. मुली सरांवर फिदा, मुलं मॅडम वर फिदा!!
मग मुलांनी शिकायचं की मेकप बघायचा? की फ्लर्ट करायचं?

3. हास्य शिक्षक!
इतकं हासवतील की शिकवण्याचं राहूनच जाईल. मुलं डोक्यावर घेतील पण मुख्याध्यापक? आणि इतर शिक्षक? त्यांच्या नजरेतून उतरतील. कारण, परीक्षा डोक्यावर आली तरी पोर्शन अपूर्णच. त्याचं काय?

4. कठोर शिक्षक!
असं म्हटलं जातं की यांच्यामुळे शाळेची शिस्त टिकून आहे. पण, दिसला पोरगा की काढ ठोकून! ही मानसिकता. त्याची साधी चौकशी नाही, की समजून घेणं नाही. चुकीला माफी तर नाहीच. मग 'मारकुट्या' नाव नाही पडलं तर काय कमावलं?

5. अनुभवी शिक्षक!
पोक्त म्हणूया. बाकीच्यांचे वय तेवढी तर यांची कारकीर्द. मुलं सोडा, त्यांच्या बापांनाही यांनी शिकवलेलं! तसं ते बोलूनही दाखवतात. पण एक प्रकारची कामात शिथिलता. आपले काय? थोडे राहिले, ही मानसिकता. नवं तंत्रज्ञान शिकण्यातला पराकोटीचा आळस. फेक तिकडं! ही भूमिका. करत नाही म्हणून सांग त्याला! ही गुर्मी. मग कसं जुळवून घेणार नव्या पिढीशी? यांना मुलांची घेणं देणं नाही, मग मुलांनाही यांच्याशी घेणं देणं नसतं!

     शिक्षकाने या पाचही गोष्टींचा गुलाम न होता त्यातील जमेच्या बाजू आपल्यात सामावून घेतल्या पाहिजेत. कामांचा बोजा तर काही कमी होईल असं वाटत नाही, (पण होवो तो). पण त्याच्या आडून
कर्तव्यापासून दूर राहणे नको.

बाकी काही असो. शिक्षणाचा महामेरू आजही सहाव्या प्रकारातल्या 'धडपडया शिक्षकांनी' पेलून धरलेला आहे. मुलांसाठी जीवाचे रान करणाऱ्या, स्वतःचं आयुष्य उधळून देणाऱ्या, खिशाला चाप पडला तरी मागे न हटणाऱ्या आणि माझा प्रत्येक विद्यार्थी घडलाच पाहिजे या ध्येयाने पछाडलेल्या ध्येयवेड्या शिक्षकांमुळेच  शिक्षणक्षेत्राच्या कपाळावरचा पावित्र्याचा मंगल तिलक शोभून आहे. आणि जोपर्यंत ही धडपडी मंडळी शिक्षण क्षेत्रात येत राहतील तोपर्यंत शिक्षण हाच प्रत्येकाचा तिसरा डोळा राहील!

शेवटी इतकंच,
मुलं ते नाहीत शिकत जे शिक्षक शिकवतात,
मुलं ते शिकतात, जे शिक्षक वागतात!

सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

- श्री. राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक.

#rajshelke
9423542224.

Wednesday, September 4, 2024

मुलं जेव्हा बोलतात काळजातून...


मुलं जेव्हा बोलतात 
काळजातून 
तेव्हा फक्त ऐकायचं 
त्यांच्यात हरवलेलं 
आपलं लहानपण 
नुसतं नजरेने न्याहाळायचं

ते सांगतील तुम्हाला 
छोट्या मोठ्या गोष्टी, 
करतील तक्रारी, सूचना वगैरे
ठेवतील तुमच्याकडून अपेक्षा
धरतील तुम्हाला जबाबदार 
कदाचित दोषीही म्हणतील तुम्हाला... 

तेव्हा तुमचा तोल 
ढळता कामा नये 
तुम्ही हादरलात 
तुमच्यावरचे आरोप ऐकून... 
हे मुलांना अजिबातही 
कळता कामा नये!

कारण मुलं जेव्हा बोलतात 
काळजातून 
तेव्हा ती फक्त बोलत नसतात;
आरसा धरत असतात 
मोठ्यांसमोर
त्यांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवलेला!

साधी नसतात मुलं 
ती तर असतात 
देवाघरची फुलं 
टोचला त्यातील एखादा काटा 
तरी हसायचं 
मुलं जेव्हा बोलतात 
काळजातून 
तेव्हा फक्त ऐकायचं!

सोपं नसतं मुलांच्या मनात 
हळूच घर करणं 
त्यापेक्षा किती सोपं असतं ना?
त्यांना 'गप!' म्हणणं!?
-

*राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक*
9423542224

Sunday, July 14, 2024

मी तसा आहे शहाणा...


मी तसा दिसतो शहाणा, पण तुम्हाला सांगतो 
आत माझ्या एक वेडा शेखचिल्ली राहतो!

बोलणे जेथे जरूरी, गप्प असतो मी तिथे 
आणि जेथे गप्प व्हावे, फार तेथे बोलतो!

यामुळे तर मोडला नाही कधी माझा कणा 
चार नोटा फेकल्या की, मी जरासा वाकतो!

चार चौघांनी बनवले एवढे सोज्वळ मला 
की सहज माझ्या खिशावर मित्र डल्ला मारतो

कान हलका ठेवल्याची भोगतो आता फळे 
रात्र सारी या कुशीवर, त्या कुशीवर काढतो!

( पाठलागावर तिच्या आहे असे समजू नका )
बाप आहे ना मुलीचा... लक्ष थोडे ठेवतो!

राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...