Friday, October 30, 2020

लाजसुद्धा ऐनवेळी सोडता यावी...


लाजसुद्धा ऐनवेळी सोडता यावी
चेहऱ्यावर वक्र रेषा ओढता यावी

खेळ केला जर कुणी मुद्दाम भिडले तर
एक खेळी मग तुलाही खेळता यावी

ना कुणीही स्वच्छ धुतल्या तांदळाजोगा
फक्त अपुली घाण तितकी झाकता यावी!

कारणे परिणाम नंतर सांग दुनियेला
वेळ आलेली तुला निस्तारता यावी

कैक वळणांचा निसरडा घाट हे जगणे
तोल सांभाळून गाडी रेटता यावी

फेकला जाशील जेव्हा दूर वाऱ्यावर
स्वार हो! बस हीच संधी साधता यावी!

एकदम नाही सुचायाची तुला कविता
आतली खळबळ अगोदर ऐकता यावी

राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

Sunday, October 4, 2020

दोघांसाठी हेच केवढे सुखकर आहे




दोघांसाठी हेच केवढे सुखकर आहे
तुझ्या नि माझ्यामधे पुरेसे अंतर आहे

जरा स्वतःच्या आत तळाशी डुबकी मारा
कळेल मग हा खोल किती भवसागर आहे

ज्या दारावर कुणी सुखाची भीक मागतो
दुःख हासते, म्हणते, हे माझे घर आहे!

सांगा थकलेल्या पायांना, थोडे सोसा
मखमल अंथरलेला रस्ता नंतर आहे!

किमान इतके ओळखण्याची बुद्धी लाभो
कोण कुणाच्या जगण्यामधला अडसर आहे

जो जो जितका जितका धार्मिक बनला येथे
सोज्वळ होता आधी, आता कट्टर आहे

मृत्यू जेव्हा स्पर्शून जातो तेव्हा कळते
जगणे हा तर मृत्युच्या वरचा थर आहे!

-राज शेळके, नाशिक
profrajshelke.blogspot.com
9423542224

Thursday, October 1, 2020

मालक हुशार होता...

पाहिजे जे जे तुला...



पाहिजे जे जे तुला, घेऊन जा
फक्त आशेचा दिवा ठेवून जा

ही महामारी नव्हे;  ही अवदसा
जा बये, दुनियेस गुंडाळून जा

तू म्हणे असतोस पाठीशी सदा
ये असा, डोळ्यांपुढे... भेटून जा!

आपल्यामधली दरी मिटली कुठे?
ठेव अंतर; फक्त सांभाळून जा

एवढा जर हक्क आहे ना तुझा
तू उभे केलेस... तू पाडून जा

द्यायचे असलेच जर काही मला
चेहऱ्यावरचे हसू देऊन जा

स्वैर तू आहेस मी म्हटले कुठे?
ये उशीरा, पण घरी सांगून जा!
जा कुठेही, पण घरी सांगून जा!

-राज शेळके, नाशिक
profrajshelke.blogspot.com
9423542224

Monday, September 21, 2020

जय जय शिवराय


                                                                                    ■
जय जय शिवराय!

बनून वारा घुमु दे नारा... जय जय जय शिवराय!
मंत्र बनु दे चेतवणारा... जय जय जय शिवराय!!

गडागडावर तटातटावर उठू दे भगव्या लाटा
शिवबाचा जयकार गर्जती सह्याद्रीच्या वाटा
तेजसूर्य तू धगधगणारा...जय जय जय शिवराय
मंत्र बनु दे....।।१।।

छत्रपतींच नाव गर्जता फुलुन येते छाती
तुम्हांचसाठी फक्त मावळा शीर घेतसे हाती
दहा दिशांना एक गर्जना...जय जय जय शिवराय
मंत्र बनु दे....।।२।।

चला उठा रे एक होऊ या मर्द मराठी सारे
रक्तामधुनी फक्त वाहू दे मर्द मराठी वारे
एकजुटीचा एकच नारा ...जय जय शिवराय
मंत्र बनु दे चेतवणारा... जय जय जय शिवराय!!
जय जय जय शिवराय...जय जय जय शिवराय


                         © राज पांडुरंग शेळके
                              9423542224
                                  नाशिक

Thursday, May 14, 2020

गझल । दुनियेत जाणत्यांच्या वेडा ठरू नको

📌

दुनियेत जाणत्यांच्या वेडा ठरू नको
जे अंथरूण आहे,ते पांघरू नको

घरट्यातल्या पिलांच्या चोचीत घास दे
घरटे कसे रिकामे... चर्चा करू नको

डोळ्यांस शिस्त थोडी लावून यार घे
झाली सुरू कहाणी की पाझरू नको

बहकत असेल मुलगा चॅनल बघून तर
मैत्रीत सांग त्याला...तू हादरू नको

मालक लबाड होता, इतकेच बोलला
आम्हास खोकणारा भाडेकरू नको

धनधान्ययुक्त राहिल कोठी तुझी सदा
गरिबांस वाटताना मागे सरू नको

शतकात एकदा हे सद्भाग्य लाभते
संधी तुला मिळाली, तर बावरू नको

डोळ्यांत वाच पैसे, तुटकी परिस्थिती
नुसता हपापल्यागत गल्ला भरू नको!

✒️
-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224
rajshelkenashik.blogspot.com

Saturday, May 9, 2020

गझल । संकटांची पायरी कर



संकटांची पायरी कर
मग यशाची खातरी कर

राग येइल... भेट त्याला
संयमाची ओसरी कर

गोष्ट नाही ना चुकीची?
वेळ लागू दे, खरी कर!

रिक्त होऊ दे मनाला... 
काळजाची बासरी कर

लाव हास्याचा मुलामा
दुःख थोडे भरजरी कर

घे तुला पर्याय दोन्ही
राज्य कर, वा चाकरी कर!


-राज शेळके, नाशिक
9423542224


वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...