Monday, May 31, 2021

देशभक्तीचा नव्याने रोकडा व्यवहार आहे


देशभक्तीचा नव्याने रोकडा व्यवहार आहे
लूट ज्याला मान्य नाही तो नवा गद्दार आहे

ही तुझ्या रक्तातली खळबळ अशी दावू नको
चळवळीला दाबणारा नेमका सरदार आहे!

या दिशेला येत नाही तो सुगंधी मंद वारा
या दिशेला नेमके पडक्या घराचे दार आहे

माणसांना राहिला ना दौलतीचा सोस काही
जीव झाला प्रिय केवळ, बाकी सब भंगार आहे!

भेटल्याने कर्जमाफी मोकळा झाला गळा
सावकाराच्या घराला कोण ठोठवणार आहे?

कोणत्या जातीतला आहे तपासा नाव आधी
काय त्याला द्यायचे ते त्यावरी ठरणार आहे!

-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224





गांजलेल्या माणसांनी सांग कोठे जायचे?



गांजलेल्या माणसांनी सांग कोठे जायचे?
आसवांना प्यायचे, की उंबरे झिजवायचे?

मौक्तिके माळेतली एकेक निखळू लागली
मूर्तिके, कुठल्या फुलांनी मी तुला सजवायचे?

चेहऱ्यावर छापली होती सविस्तर काळजी  
काय मी सांगू जगाला? कोणते लपवायचे?

पुण्य वाटुन घ्यायची जागा खरे तर इस्पितळ
पण तिथेही बेत दिसले रुग्ण वाटुन घ्यायचे

कर्जबाजारी घराचा मूक झाला हुंदका
घरधण्यामागे अता हप्ते कुणी फेडायचे?

( घेतली नाही कधीही काळजी झाडा तुझी
काय मागू मी तुला? अन् तू तरी का द्यायचे?)

या जगाला भेट दे तू एकदा ये विठ्ठला...
सोडशिल तूही स्वतःला देवबिव समजायचे!

जन्म देतानाच ही आज्ञा कपाळी गोंद तू
रिक्त हाती यायचे अन् रिक्त हाती जायचे!

बघ, तुला जमलेच तर, दे श्वास थोडासा मला
आणि त्या बदल्यात मित्रा, ने तुला जे न्यायचे!

-राज शेळके, नाशिक
9423542224

Tuesday, April 20, 2021

इतके अवलंबुन राहुन चालेल कसे?

इतके अवलंबुन राहुन चालेल कसे?
सगळे इतरांवर टाकुन चालेल कसे?

कोण जवळचा आहे ते नंतर पाहू
गरजू जो, त्याला टाळुन चालेल कसे?

पूर्ण दिवाळे निघण्याची ही वेळ अता
अक्कल रस्त्यावर टाकुन चालेल कसे?

मालक असशिल... पण तसदी घे, ऊठ जरा
गल्ल्यावर फतकल मांडुन चालेल कसे?

डोक्याचे टक्कल झाकुन राहील म्हणुन
कंबरेचे लंगुट सोडुन चालेल कसे?

दुसऱ्यांचे करता करता मेलास गड्या
मित्रा, घरच्यांना विसरुन चालेल कसे?

कडु काळाची वेळ सभोती टपलेली
कळते तर, गाफिल राहुन चालेल कसे?

राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

Sunday, April 18, 2021

जरा अंधारल्यावर भोवती घोटाळतो मृत्यू

■जरा अंधारल्यावर भोवती घोटाळतो मृत्यू

जरा अंधारल्यावर भोवती घोटाळतो मृत्यू
फिरवतो हात मायेने, जणू गोंजारतो मृत्यू

जगूही देत नाही अन् मरूही देत नाही बघ
असा कुठल्या प्रकाराने मला सांभाळतो मृत्यू

कुणाच्या ऐन आनंदात पडते मीठ मृत्यूचे...
सुखाचे ताट खेचुन दुःख त्याला वाढतो मृत्यू

जगाला त्रासलेला जीव जेव्हा यायचे म्हणतो
उचलणे त्यास मुद्दामून वेडा टाळतो मृत्यू!

अताशा खातरीचा राहिला नाही दवाखाना
तिथे म्हणतात, गणवेशात फेऱ्या मारतो मृत्यू

जगाला वाटते केली असावी आत्महत्या पण
खरेतर खून झाल्याची कहाणी सांगतो मृत्यू!

बुवा, बाबा,नवस अंगार,साधू, संत अन् योगी
अशा प्रत्येक मध्यस्थास जागा दावतो मृत्यू

कळो प्रत्येक प्राण्याला जिवाचे मूल्य, यासाठी
घडीभर मार्ग श्वासाचा अचानक रोखतो मृत्यू!

जगायाची प्रबळ इच्छा यमाशी झुंजते तेव्हा
लढाई जिंकणाऱ्याला... सलामी ठोकतो मृत्यू!

राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224


Saturday, April 17, 2021

दिखावा लागतो मित्रा दिखाव्याची गरज आहे

दिखावा लागतो मित्रा दिखाव्याची गरज आहे
जगाला फक्त एखाद्या बहाण्याची गरज आहे

विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांनो थांबवा जथ्थे
इथे विझल्या पलित्यांना निखाऱ्याची गरज आहे

जरासे खट्ट झाले की जमाया लागते गर्दी
रिकामे लोक हे यांना तमाशाची गरज आहे!

तुझे रडणे, तुझी ओरड, तुझा कर्कश्य हा टाहो
तरी न्यायासनाला बस, पुराव्याची गरज आहे

घटस्फोटास दोघांनी दिला होकार आहे, पण
मुलांना नेमकी,आई नि बापाची गरज आहे!

सुखाच्या वळचणीला पोसला, त्याला कुठे कळते?
खरे जगणे कळाया खास दुःखाची गरज आहे!

-राजेश्वर शेळके
नाशिक
94235 42224

हो, माझ्यातील बाप हरवला आहे

हो माझ्यातिल बाप हरवला आहे
मी पोराचा हात सोडला आहे

नियतीच्या दारात फाटली झोळी
अन दैवाने घास टाकला आहे

जगणे कसले...ही लंगड्याची शर्यत
अन मी खोटा पाय बसवला आहे!

या चंद्रांनो रात्र जागती ठेवू
सूर्याने अंधार पसरला आहे

फडफड केली पिंजऱ्यात पंखांनी
आकाशाने श्वास रोखला आहे!

रडण्याचा मज एक फायदा झाला
मी हसण्याचा मार्ग शोधला आहे

मेल्यावरही जीव जायचा नाही
मी शब्दांतुन श्वास ओतला आहे!

-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

होता हाईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं..


होता होईल तेवढं

मन थोडं मोठं करून 
थोडं उदार व्हायचं 
होता हाईल तेवढं आपण 
स्वतःच समजदार व्हायचं..

भांड्याला भांडं लागून 
घरात आवाज होतोच ना?
रांगतं मूल चालू लागल्यावर 
त्याचाही तोल जातोच ना?
मोठ्यांचही तसंच असतं,
त्यांनाही सांभाळून घ्यायचं..

मोठ्यांमध्येही लपलेलं असतं 
एक लहान मूल 
तेही कधी पांघरून घेतं
खोडकरपणाची झूल
त्यालाही कधी मोकळेपणाने 
मस्त रडू द्यायचं...

अधूनमधून येतच असतं
एखादं वादळ भेटायला 
एखादा अश्रू पुरेसा असतो 
माणसाचा धीर सुटायला 
संयमाचं तीर्थ थोडं 
हळूच मस्तकावर घ्यायचं...

कष्टाविनाच सगळं मिळावं 
असं होतं का कधी?
मोगरासुद्धा ऊन सोसतो
फुलून येण्याआधी!
प्रयत्नांच्या रोपट्याला 
ठरवून पाणी द्यायचं...

अहंकाराचा वारा लागून
बहकू शकतो माणूस 
थोडा इकडे थोडा तिकडे
 सरकू शकतो माणूस 
येतच कधीतरी भान माणसाला
पुन्हा माणसांत यायचं...
होता होईल तेवढ आपण 
स्वतःच समजदार व्हायचं...

राजेश्वर उर्फ राज शेळके, 
नाशिक
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...