Saturday, January 28, 2023

एकदाचा काढला काटा तुम्ही

📌

लोक करतिल काम अन् मरतीलही
फक्त येउन श्रेय ते लाटा तुम्ही!

एकदाचा काढला काटा तुम्ही
चांगल्याच्या रोखल्या वाटा तुम्ही

चूक होती कस्पटाइतकीच पण
गावभर केलात बोभाटा तुम्ही!

सर्व खोटे एक झाले शेवटी
आणि केला न्याय उफराटा तुम्ही!

काल होती मस्तशी किलबिल इथे
आणला कोठून सन्नाटा तुम्ही?

खायच्या वांद्यात होता कालवर
आज अंबानी तुम्ही... टाटा तुम्ही!

लोक करतिल काम अन् मरतीलही
फक्त येउन श्रेय ते लाटा तुम्ही!

- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

Sunday, January 22, 2023

पापण्यांचे पाळणे करशील बहुदा

■ पापण्यांचे पाळणे


पापण्यांचे पाळणे करशील बहुधा 

वाट माझी पाहशिल; रडशील बहुधा


एकट्याने चालतो आहेस मित्रा

जा पुढे पण, एकटा थकशील बहुधा


चेहऱ्यावर काजळी आली कशाची?

लाख चिंताचा धनी असशील बहुधा


ऐकल्यावर दोन शब्दाचा खुलासा

तू मला वेडा खुळा म्हणशील बहुधा


आठवण जेव्हा तुला येईल माझी 

हासताना आसवे पुसशील बहुधा


ज्या सुखासाठी तुझे आयुष्य गेले

ते बघाया तू इथे नसशील बहुधा!


-राज शेळके, नाशिक

9423542224

Saturday, December 10, 2022

जगून थोडे घेऊ

जगून थोडे घेऊ

कुण्या काळचे जुनेच भांडण
कुरतडणारी कडू आठवण
उगाच छळणारे काही क्षण
विसरून थोडे जाऊ
चल, जगून थोडे घेऊ.....

कोण बरोबर? कोण चुकीचा?
सोबत फिरतो प्रश्न कधीचा
अडवून धरतो रस्ता पुढचा
प्रश्नच सोडून देऊ
चल, जगून थोडे घेऊ...

लहान-मोठे ठरवायाला
कोण रिकामा ? वेळ कुणाला ?
हजार कामे ज्याला त्याला
रस्ता बदलून घेऊ
चल, जगून थोडे घेऊ.....

आयुष्य म्हणजे मैफिल सुंदर
तयात मिसळू आपलाही स्वर
अवचित एखाद्या वळणावर
पुन्हा जवळचे होऊ
चल, जगून थोडे घेऊ...

राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

Tuesday, December 6, 2022

दीपस्तंभ

"तुझा चेहरा, तुझे दाखले दीपस्तंभ बनतील इथे 
संघर्षांचे सर्व प्रवासी तुझे शिष्य बनतील इथे!"


दीपस्तंभ

तू ज्ञानाची पहिली ओळख तू तेजाचे नाव नवे 
तू गेला त्या मार्गावरती नवपक्ष्यांचे लक्ष थवे

अंधाराला भेदुन तेथे तू पेटवला दीप नवा 
स्पर्श तुझा झाला अन् झाली सुगंधित सारीच हवा

तू शब्दांचा असीम साधक तू ज्ञानाची भूक नवी
तू बुद्धाचा दिव्य उपासक तू अजरामर चिरंजीवी

तू जिद्दीची अमर कहाणी, तू यत्नांचे नाव दुजे 
अखंड ऊर्जा, स्वयंप्रेरणा, बा भीमराया नाव तुझे

खचलेल्यांच्या उद्धाराची तू शेवटची आस भीमा
तू लढणाऱ्यांच्या देहातील धडधडणारा श्वास भीमा 

तुझा चेहरा, तुझे दाखले दीपस्तंभ बनतील इथे 
संघर्षांचे सर्व प्रवासी तुझे शिष्य बनतील इथे!

जोवर राहील चंद्र चांदणे, जोवर राहील सूर्य नभी 
अखंड तळपत राहील तोवर भीमा तुझेही नाव जगी

तुझ्या दिव्य तेजाचा येवो अंश जरा आमच्यात भीमा 
तुझा त्याग,बलिदान लढाई सदा असो लक्षात भीमा!

राजेश्वर शेळके,
नाशिक
9423542224

Thursday, December 1, 2022

कमाई व्हायच्या आधी..उभी खर्चायची यादी!

कमाई व्हायच्या आधी
उभी खर्चायची यादी!

खिशाला चाचपुन बघ तू
कुठेही जायच्या आधी

वितळणे धर्म देहाचा
असू दे नर, असो मादी

म्हणुन तर मोडली काडी
कुणी नव्हताच संवादी

अरे ही जगबुडी आहे
नव्हे ही बातमी साधी

तुझी किंमत ठरव मित्रा
कुणी ठरवायच्या आधी!

-राजेश्वर पांडुरंग शेळके
9423542224

Monday, November 21, 2022

लक्षण


भले नव्हे हे बुरेपणाचे लक्षण आहे
चिडचिड होणे पराभवाचे लक्षण आहे!

जीव लावला ज्यांनी त्यांना शिडी समजणे
तुझ्या मनाच्या खुजेपणाचे लक्षण आहे!

इतकी तंद्री, इतक्या खस्ता, इतक्या धडका...
वेड नव्हे तर अन्य कशाचे लक्षण आहे?

बरेच अंतर निघून आलो आता आपण
अता थांबणे खुळेपणाचे लक्षण आहे!

अपुल्यापुरती दुनिया झाली ज्याची त्याची
आणि म्हणे की नव्या युगाचे लक्षण आहे!

वेळ लागु द्या, पण देण्याची दानत ठेवा
जाणिव असणे जितेपणाचे लक्षण आहे!

हजार वेळा हरून सुद्धा पुन्हा तयारी?
हे योद्धयाच्या पराक्रमाचे लक्षण आहे!

-राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

Thursday, November 17, 2022

बशीकपाची कहाणी


जगातील प्रत्येक कपबशीला समर्पित...

▪️बशीकपाची कहाणी▪️

बशी कपाचे भांडण झाले, निमित्त नव्हते काही
शब्दाने मग शब्द वाढला, कारण नसतानाही...

कपास आला राग म्हणाला, सवय तुझी तू सोड!
तोंड कुठेही उचकटण्याची, कशी अमंगळ खोड ?

बशीही म्हणाली फणकाऱ्याने, तुला विचारतं कोण?
गप रे! मेल्या एकाच घावात, करीन तुकडे दोन!

चिनीमातीचा संसार आपला, दोघंही जाऊ फुटून
कप विचारी बशीला, मग माती आणशील कुठून?

बशी म्हणाली, आता नाहीतरी तडाच गेलाय मला
मी जाईनच, परंतु जाईन घेऊन तुला सोबतीला...

तेव्हापासून कप बिचारा, बशीसमोर नमलेला
नशीब फुटकं! दुसरं काय ? उभा चिरा दुभंगलेला!

बशीही आठवे इतर बशांना, सुखात असतील बिचाऱ्या
म्हणे कसा माझ्याच नशिबी, असला बावळट नाऱ्या!

बशीघरातील बशी, बशीला कशीबशी समजावी
सांभाळ कपाला, प्रत्येक गोष्ट का मीच तुला सांगावी ?

बशी म्हणे मग बघच आता, कशी जिरवते याची
दररोज चाले बशी कपाची,  खडखड 'बा' चा 'बा' ची !

अशी लांबली बशी, जाहला कपही उजाड सुना
कोनाड्यामध्ये पडून आठवे, भूतकाळातल्या खुणा!

तुम्हाला जर कधी भेटली, ऐशी कोणी जोडी
चहात साखर वाढवा थोडी, पुन्हा वाढवा गोडी...

आणिक त्यांची घसरलेली, आणा रुळावर गाडी
पुन्हा आणा रुळावर गाडी !!

-राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...