
◾
एक दिवाळी
एक दिवाळी अंगण सजवुन सडा समार्जन करते आहे
एक दिवाळी अंधारातच हमसुन हमसुन रडते आहे
काय काय अन् कितीक घ्यावे यादी करते एक दिवाळी
अता करावे काय नेमके दुसरी चिंता करते आहे
पगार, बोनस, सेविंग्ज, हप्ते, घरभाड्याने गच्च एक अन्
दुसरी आलेल्या पैशाने घर दुसऱ्याचे भरते आहे
किती फायदा झाला यंदा मोजत आहे एक दिवाळी
एक दिवाळी आस्मानीच्या सुलतानीशी लढते आहे
गाडी, बंगला, कपडे लेवुन सजली आहे एक दिवाळी
एक दिवाळी बिन कपड्याची वाट पित्याची बघते आहे
गप्पा-टप्पा, फराळ-मैफल करते आहे एक दिवाळी
एक दिवाळी शांत दिव्याच्या सोबत केवळ जळते आहे
एक दिवाळी फराळ घेउन येते आहे दुसरीसाठी
दीपलक्ष्मी डोळे मिटुनी स्वप्न एवढे बघते आहे!
- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
No comments:
Post a Comment