◾
**छोटा शून्य मोठा शून्य!*
(अनंत काणेकरांच्या विचारांचा एक धागा)
_एक मुद्दा, एक विचार!_
_19 फेब्रुवारी, बुधवार_
▪️
*एका वर्गात एक गुरुजी गणित शिकवत होते. वजाबाकी चालू होती. गुरुजींनी विचारलं, "पाच वजा पाच बरोबर किती?" मुलांनी एका सुरात सांगितलं "शून्य!" मग गुरुजींनी मुलांची मजा घ्यायचं ठरवलं. आणि विचारलं, "पंचवीस हजार वजा पंचवीस हजार बरोबर किती?" एक पोरगा जोरात ओरडला, "मोठ्ठा शून्य!! "सगळा वर्ग हसला! गुरुजींनी त्याला उभं केलं आणि म्हणाले, "शून्य कधी लहान मोठा असतो का? शून्य केवळ शून्य असतो." मुलगा धिटाईने म्हणाला, "गुरुजी, पाच ही लहान संख्या आहे. पंचवीस हजार ही मोठी संख्या आहे. उत्तर मोठा शून्यच असलं पाहिजे." गुरुजी म्हणाले, "अरे पण मोठा शून्य नसतोच!" मुलगा म्हणाला, "का नसतो?" आता गुरुजी निरुत्तर झाले. म्हणाले, "बाबा रे माझ्या गुरुजींनी मला इतकंच शिकवलं होतं. पण तरीही हा प्रश्न तू तुझ्या हृदयाशी जपून ठेव. एखाद्या वळणावर आयुष्य तुला या प्रश्नाचे उत्तर देईल." मुलाला ते काही कळलं नाही. पण गुरुजींनी खाली बसायला सांगितलं म्हणून तो खाली बसला. प्रश्नही काही काळासाठी खाली बसला.*
*बरीच वर्ष मधल्या काळात निघून गेली. मुलगा मोठा झाला. त्याचा माणूस झाला. एके दिवशी टीव्हीवरचा एक प्रोग्राम पाहताना तो जरा सावध झाला. प्रसंग त्याच्या प्रश्नाशी निगडित होता.*
*हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरावरच्या कुठल्याशा पठारावर एक साधू तपश्चर्या करत बसला होता. तिथे एक हेलिकॉप्टर उतरले. त्यातून वैमानिक खाली उतरला. ती एक स्त्री होती. ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांचे लक्ष वेधण्यासाठी थोडा पायांचा आवाज केला. साधूंनी डोळे उघडले. तिने विचारलं, बाबा तुम्ही तप का करत आहात? त्यांनी सांगितलं, "मोक्षप्राप्तीसाठी." ती म्हणाली, "तुम्ही मला ओळखता का?" साधू म्हणाले, "नाही." ती म्हणाली, "मला सर्व जग माझ्या कार्यामुळे ओळखतं. मी जगातील सर्वश्रेष्ठ अंतराळवीर आणि वैमानिकांपैकी एक आहे." साधू म्हणाले, बाळ, आयुष्य क्षणभंगुर आहे. मनुष्य एके दिवशी देह सोडून जातो. मृत्यू हे प्रत्येकाबद्दल अंतिम सत्य आहे. तुलाही एका दिवशी मरायचंच आहे आणि मलाही. फक्त मी इथे मरणार आणि तू तिथे एवढंच! प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवटी शून्यच होतो." अंतराळवीर म्हणाली, "परंतु तुमच्या आयुष्याचा छोटा शून्य होईल माझ्या आयुष्याचा मोठा शून्य!!"*
*'छोटा शून्य मोठा शून्य' ऐकल्याबरोबर टीव्ही पाहणारा ताडकन उठून बसला!*
*अंतराळवीर म्हणाली, "तुमचा श्वास थांबेल, तेव्हा किती लोकांना माहीत होईल?" साधू म्हणाले, "अर्थातच, कुणालाच नाही." ती म्हणाली, "जेव्हा मी मरेल तेव्हा सर्व जग माझ्यासाठी हळहळ व्यक्त करेल. माझ्या मृत्यूनंतरही लोक मला माझ्या कार्यासाठी स्मरणात ठेवतील. तुमचा प्रवास छोट्या शून्याकडे सुरू आहे. माझा प्रवास मोठ्या शून्याकडे!" अनेक वर्षानंतर मुलाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.*
*आता प्रश्न इतकाच. तुमचा प्रवास कोणत्या शून्याकडे सुरू आहे? छोट्या? की मोठ्या?*
-
-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
No comments:
Post a Comment