◾
*खरा उपवास!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_26 फेब्रुवारी 2025, बुधवार_
▪️
*‘उपवास धरणे’ ही आपल्या संस्कृतीमधील एक सुंदर गोष्ट आहे. आणि ‘धरलेला उपवास पुन्हा सोडणे’ ही त्याची त्याहून सुंदर उत्तरपूजा आहे. काहीजण उपवास धरतात, काही ठेवतात, काही करतात, काहींना तो घडतो, तर काहींना तो चक्क पावतो!*
*सदा नि कदा चर चर चरणाऱ्या देहाला व त्याच्या यंत्रणेला थोडी सक्तीची विश्रांती मिळावी हा उपवासामागचा निर्मळ हेतू आहे. 'हाताची घडी तोंडावर बोट!' ही म्हण उपवासासाठीच जन्माला आलेली असावी, पण खादाड लोकांनी ती लहान मुलांवर चिटकवली! उपवासाला 'कमी खावं' किंवा 'खाऊच नये' इथपर्यंत ठीक आहे. मात्र “हेच खावं, ते खाऊ नये” हा फतवा कोणी काढला कुणास ठाऊक? शिवाय त्याचे पहारेकरी खूप. एखाद्याने चुकून चॉकलेटचा किंवा बिस्कीटचा एक तुकडा जरी तोंडात टाकला तरी त्याच्यावर तुटून पडायला हे पहारेकरी टपूनच असतात. “उपास सुटला! उपास सुटला!” असं ‘चोर! चोर!’ च्या पट्टीत जाहीर करतात. बिचाऱ्या उपासकऱ्याचा चेहरा पहिल्याच बॉलवर विकेट पडल्यासारखा होतो!*
*आजकालचा आपला उपवास म्हणजे निव्वळ ‘खाण्यात बदल’ असा झालेला आहे. आठवडाभर न खाल्लेली, वाटीभर टाकली तर कढईभर होणारी, आणि नुसताच बिनकामाचा पोटाचा फुगा वाढवणारी साबुदाण्याची खिचडी किंवा भगर उपवासाला कशी चालते कळत नाही. शिवाय उपवासाला बाकी काही चालू न देणाऱ्या लोकांना तंबाखू वगैरे खाल्लेलं मात्र बरोबर चालतं. ती 'वल्ली' असल्याचं शेपूट तिथे माणसं शिताफीने जोडतात! मग चतकोर भाकरीनेच काय घोडं मारलं आहे? 'काहीही खा, पण अत्यल्प, अगदी थोडसंच खा.' अशी उपासाची नवी व्याख्या केली तर? इतर दिवशी जेवणाला दोन भाकरी खाणाऱ्या माणसाने उपवासाच्या दिवशी फक्त चतकोर भाकर खाल्ली, तरी त्याचा उपवास चालू रहायला काय हरकत आहे? पण मग माणसांना 'चेंज' कसा मिळणार!?*
*सणाच्या दिवशी एका दिवसाचा उपवास करणं सोपं आहे. आयुष्यभर तो नित्यनेमाने निभावणं ही साधना आहे. प्रख्यात तत्त्वचिंतक श्री श्री रविशंकर यांनी उपवासाची खूप सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. परमेश्वराचीच रूपे असलेल्या चांगल्या गुणांच्या व्यक्ती,वस्तू, विचारांच्या सानिध्यात राहणे म्हणजे खरा उपवास. उपवासाच्या निमित्ताने खाण्यावर नियंत्रण तर येतंच; बोलण्यावरही ते यावं. थोडं चिंतन मनन व्हावं. ज्ञानार्जन व्हावं. शुभ, नेमकं आणि सकारात्मक बोलावं. छोटं का होईना एखादं चांगलं काम करावं. आणि महत्वाचं म्हणजे चिडचिड न होता चेहऱ्यावर मस्त स्मित असावं की उपवास पावलाच म्हणून समजा!*
*असा उपवास आपल्यापैकी किती जण करतात?*
-
-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
No comments:
Post a Comment