Wednesday, March 5, 2025

माणूस जगला पाहिजे

**माणूस जगला पाहिजे*
_एक मुद्दा, एक विचार!_
_5 मार्च, बुधवार_

▪️

*गिव मी सम सनशाईन*

  *पहाटे सगळं जग साखरझोपेत असताना एक जण रेल्वेरुळावर येऊन उभा राहिला. निस्तेज. निर्विकार. तिकडून गाडी आली. लोको पायलटने त्याला पाहिलं. खूप हॉर्न दिले. पण हॉर्न ऐकायला तिथे कोणीही नव्हतं. तो स्वतःही नव्हता. रुळावर फक्त त्याचं शरीर उभं होतं. विचार शून्य झालेलं फक्त शरीर. गाडी थांबू शकली नाही, त्याचा प्रवास थांबला. लोकांनी म्हटलं गाडीने त्याला उडवलं म्हणून तो गेला, परंतु खरं तर तो दोन महिन्यापूर्वीच गेलेला होता, हे कोणालाच कळलं नाही. नंतर लोक त्याच्यावर अमुक दडपण होतं वगैरे चर्चा करत राहिले.*

    *भावनिक आणि स्वाभिमानी माणसं धाडसी असतात. त्यांच्या निर्णयांनी ती कधी इतरांच्या दहा पावले पुढे जातात आणि खूप प्रगती करतात, तर कधी दहा पावले मागे फेकली जातात, प्रचंड अपयशाची धनी होतात. जिंकली तर कौतुक; हारली तर ‘छी! थू!’ त्यांच्या वाट्याला येते. ही माणसं जगावेगळी असतात खरी, परंतु यांची एक अडचण असते. ती अपमान सहन करू शकत नाहीत. दडपण व्यवस्थित हाताळू शकत नाहीत. पडीच्या काळात कोणाला सांगतही नाहीत. चार चौघात हसतात, आतल्या आत झुरत राहतात. लोक काय म्हणतील? आणि ते काय करतील? हे प्रश्न त्यांना छळू लागतात. बदनामीची त्यांना भीती वाटते. मग एखादया हळव्या क्षणाला त्यांचं मन खचू लागतं. मन खचलं की शेवटाकडे सुरुवात झालीच म्हणून समजा. मृत्यू हा त्यांना सगळ्या कटकटीतून सुटण्याचा सोपा मार्ग वाटतो. जे इतरांना जमत नाही, असं मरण्याचंही धाडस ते करतात. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना अडचण होते हे त्यांना जिवंतपणी आवडत नाही, पण आपण असे केल्यावर त्यांना आयुष्यभर अडचणी राहतील, हे त्यांना टोकाचा निर्णय घेताना समजत नाही ही खरी शोकांतिका आहे. अशा वेळी माणूस आपल्या हातून निसटू लागला आहे हे कोणालातरी कळणं फार महत्वाचं. खचू पाहणाऱ्या माणसानेही 'मी आता खचू लागलो आहे' हे कोणालातरी सांगणं महत्त्वाचं आहे. कारण प्रयत्नांचे शंभर दगड मारल्यावर एखादा तरी दगड लागतोच. प्रयत्न थांबता कामा नयेत.*

     *सरतेशेवटी जेव्हा कुठूनही मदत मिळणार नाही तेव्हा 'ध्यान, ज्ञान आणि गान' म्हणजे संगीत हे माणसाला कोणत्याही संकटातून शंभर टक्के वाचवू शकणारे मार्ग आहेत हे प्रत्येकाला कळावं. तीनपैकी एकाला अशा वेळी बिनशर्त शरण जावं. कारण माणूस वाचला पाहिजे. माणूस जगला पाहिजे. सोबत माणुसकीही जगली पाहिजे. हे जग माणसांनी त्यांच्या प्रयत्नांनी सुंदर केलं आहे. माणसंच खचून हे जग सोडून जाऊ लागली, तर या जगाच्या इतक्या सुंदर असण्याचा फायदा तरी काय?* 
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...