◾
*लोढणं बांधलेला जीव!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_30 जुलै, बुधवार_
▪️
*लोढणं बांधलेला जीव!*
*आजकाल गाई, म्हशी, बैल या जित्राबांची संख्या घटत चाललीय. ज्यांच्याकडे आहेत त्यांना देवकृपेने काही कमी नाही. गावाकडं उधळणाऱ्या जनावराच्या गळ्यात लाकडाचं नाहीतर लोखंडाचं लोढणं बांधतात, आणि त्याला जखडून टाकतात.*
*भागाभागानुसार त्याला कोणी लोढं, कोणी गंडास, कोणी गंजार, कोणी गळपट्टा, कोणी अंगठीसुद्धा म्हणतात. तर या लोढ्यामुळं ते जनावर जरा नियंत्रणात राहतं आणि शेतकऱ्याचा जीव निर्धास्त राहतो... आपल्या बाबतीतही नियती असंच करते याचा तुम्ही कधी विचार केलाय का?*
*बऱ्याचदा वरकरणी आपल्याला अतिशय आनंदी, कुठलंही टेन्शन नसलेला, हरहुन्नरी वाटणारा एखादा माणूस वैयक्तिक पातळीवर मात्र एक पराभूत, दयनीय आणि हतबल जीव असतो! लोढणं बांधलेला जीव! नियतीने त्याच्या उजव्या पायाशी एक भला मोठा अदृश्य दगड लोढणं म्हणून बांधून ठेवलेला असतो. तो कोणाला दिसत नाही. हा माणूसही तो कुणाला दाखवत फिरत नाही.*
*कुणाला कर्जाचं लोढणं, तर कुणाला कोर्टाचं. कुणाला घरातल्या कुणाच्यातरी नाहीतर स्वतःच्या जीवघेण्या आजाराचं लोढणं, तर कुणाला गळ्यात पडलेल्या चुकीच्या माणसाचं! नावं वेगवेगळी, पण शेवटी ते लोढणंच! माणूस अक्षरशः हे लोढणं कसाबसा ओढत पुढे जात असतो. मनाशी म्हणतो, “मी खूप हुशार होतो; आणखी खूप प्रगती करू शकलो असतो, पण या लोढण्यामुळे जखडला गेलो.*
*जनावरं असं जखडून ठेवल्यावर काय म्हणत असतील माहित नाही, पण माणसं मात्र एकांतात “हे माझ्या वाट्याला काय टाकलंस देवा?” अशी आर्त विचारणा देवाला नक्की करत असतात. ना कोणाला सांगू शकत, ना कोणापुढे रडू शकत. एक खंत आयुष्यभर माणसाला खात राहते; एक शल्य त्याला आयुष्यभर बोचत राहतं. पण गळ्यात लोढणं बांधलेलं असतानाही एखादं जित्राब जसा स्वतःचा आब राखून असतं, तसाच या माणसाचाही समाजातला वावर खंबीर असतो.*
*असं कोणी भेटलं तर त्याच्या लोढण्याची टर उडवू नये. त्याला सहानुभूती दाखवून खुजंही करू नये. त्याला मदत करता आली नाही तरी हरकत नाही, पण त्याच्या जखमेवर मीठ मात्र चोळू नये. उलट पायात लोढणं असतानाही, पाय मोकळे असलेल्यांपेक्षा वेगात धावण्याची कोणत्याही क्षणाला तयारी दाखवणाऱ्या अशा जिगरबाज माणसाला जोरदार सॅल्यूट ठोकावा! त्याच्यापासून काही शिकावं; प्रेरणा घ्यावी. कारण अशी माणसं समाजातले दीपस्तंभ असतात, जे इतर भरकटू पाहणाऱ्यांना आणि हतबल झालेल्यांना दिशा दाखवण्याचं काम करतात, लढण्याचं बळ देतात. साक्षात मृत्यूसुद्धा त्यांना वचकून असतो, कारण...*
*जगायाची प्रबळ इच्छा यमाशी झुंजते तेव्हा*
*लढाई जिंकणाऱ्याला... सलामी ठोकतो मृत्यू!*
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc
No comments:
Post a Comment