Tuesday, October 25, 2022

कवी विलास पंचभाई : मनाची स्पंदणे

    नाशिकच्या साहित्य वर्तुळामध्ये स्वतःच्या मस्तीत आणि स्वतःच्या धुंदीने जगणारा एक धडपड्या कविमित्र आहे, विलास पंचभाई. विलासची जगण्याची, वागण्याची, बोलण्याची एक स्टाईल आहे. तशीच त्याच्या लिहिण्याची सुद्धा.
    स्वभावाने बेधडक परंतु दिलदार असलेल्या विलासच्या मनात माणुसकी बद्दलची कळकळ मात्र अखंड तेवत असते. 'मनाची स्पंदने' हा त्याचा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. याच संग्रहातील या  पुढील ओळी पहा.

मैला-मैलावर
रोवून ठेवलेत
त्यांनी दगड
अंतर कळावं म्हणून...
पण..
त्यांना कुठे कळतंय
माणसा-माणसातलं
अंतर वाढत चाललंय ते...
 एखादा तत्त्वचिंतकच असं सुंदरपैकी लिहू शकतो.

  विलास त्याचे सांसारिक आयुष्य अगदी मोकळेपणाने जगतो आणि त्यातल्या बारीक सारीक खाणाखुणा मोकळेपणाने लिहितो सुद्धा. 

तुझ्याशी माझं 
भांडण झाल्यावर
तुझ्या डोळ्यातून
अश्रू टपकताना
माझं हृदय हळहळतं
मग मीही विरघळतो तुझ्यात...

बायकोवर त्याचं नितांत प्रेम आहे. तो छान स्वयंपाकही करतो, आणि हे कवितेतही लिहितो.

मला छान जमतं
वडापाव मिसळ पावही
कधी कधी म्हणतो तिला
तुझ्या हाताला चव नाही!
( म्हणजे पुन्हा भांडायला तयार!)

    प्रेम मिळणं ही प्रत्येकाची एक स्वाभाविक भावना आहे, ती टिपताना कवी म्हणतो,

हवं असतं प्रत्येकाला प्रेम
प्रत्येकालाच मिळत नसतं
ज्याला मिळालं त्याने
पारीजातक जपायचं असतं...!

  कधी कधी  त्याच्या शब्दांना भावनेचा ओलावा दिसतो, तर कधी कधी त्याचे शब्द थेट षटकार लगावतात. 

तारुण्य म्हणजे
याच किस तिचं मिस असतं
लग्न करायचं
दोघांचही फिक्स असतं!

   हा म्हणजे विलासचा खास मंगेशकर तडका आहे. जीवनातल्या आयुष्याला दररोजच्या धकाधकीच्या अनुभवांमधून व्यक्त करताना विलास म्हणतो 

उकळलेल्या दुधपाण्यात
चहा पावडर टाकली जाते
गोडवा यावा म्हणून
साखरही विरघळते..
तसेच जीवनातही
गोडवा रहावा म्हणून
आनंदाचे क्षण
यावे लागतात अधूनमधून...

   दिवसभर कुटुंबासाठी धावपळ करून थकून घरी येणाऱ्या माणसाचे वर्णन बघा किती सुंदर प्रकारे त्याने व्यक्त केलं आहे 

दिवस भराचा तापलेला
सूर्य संध्याकाळी थंड होतो
घराकडे जाऊन पुन्हा
एक रात्र आराम करतो!

  आयुष्यातले सगळे दिवस सारखे नसतात. काही गोड तर काही कडू. आपल्या सभोवतालची माणसं ही वेळ प्रसंग पाहून कधी चांगली तर काही वाईट वागतात. प्रतीक्षिप्त क्रिया म्हणून आपलंही वागणं कधी कधी बदलू शकतं, परंतु कवी म्हणतो,

प्रत्येक दिवस सारखा नसेल
कधी उंच भरारी,
कधी खाली खेचेल
भीती असते पडण्याची
तरी भरारी घेणे कसे थांबेल?

 स्वतःवरील आत्मविश्वास अधोरेखित करताना कवी

माणसं येतील जातील
कोणी वार करतील
कोणी फुंकर घालतील
मी माझे ध्येयापर्यंत जाणे
थांबणार नाही

 अशी ग्वाही देतो. व्यक्त होताना केवळ कविताच नाही तर गजलेच्याही मार्गाने त्याचे शब्द येऊ लागतात. पुढील दोन ओळी पहा,

केल्या किती सरकारी जनगणना
तरीही अजून ही जात बाकी!

 तर दुःखाची कारणमीमांसा करताना तो म्हणतो,

राहिले असतील भोग काही
बिनदिक्कत सोसावे म्हणतो

 मुळात कवी कविता लिहितोच कशासाठी? याचे उत्तर शोधताना कवीला खालील शब्द सापडतात,

कविता ऐकून घेते
सुख दुःख सर्व काही
पचवतो मग
आंनद नि विरहही
कवितेला नसतो
कोणता रंग
नसतात कुठल्या
जातीच्या भिंती
कविता करते सर्व
एकत्र जातीपाती.....

  स्त्री-पुरुषांच्या समानतेबद्दल कवी एक महत्त्वपूर्ण भाष्य करतो 

बाई होते विधवा
तसा पुरूषही होतो विधूर,
(फक्त म्हणायला समानतेची वागणूक)
पुरुषाला केल जातं का
समाजापासून दूर ?

स्त्री सुधारलेली भासत असली तरी तिची वेदना चिरंतर आहे हे सांगताना कवी म्हणतो,

अजूनही संपल्या नाही वेदना
किंबहुना किंचित जास्तच
आज फरक एवढाच
ती तेव्हा शेतात राबवायची
आज नोकरी करते
बाई शिकली
दोन पैसे कमावू लागली
पण व्यवहार नवऱ्याकडेच सोपवून
ती तिचं अस्तित्व जपत राहते...

त्याच वेळेला स्वतःच्या आईचं वर्णन करताना कवीची लेखणी थकत नाही.

माझी आई
आरसा धरायची
आणि कपाळावर
मेन लावलं की
गरगरीत असं
कुंकू लावायची
अखंड सौभाग्य टिकावे म्हणून...

 प्रत्येक कवीच्या कवितेत आई कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येतेच.उगीचच कविला मातृहृदयी म्हणत नसावेत. सोबतच पुरुषाच्या राकटपणात असलेला हळवा कप्पा स्पष्ट करताना कवी सहज लिहून जातो,

नेहमीच
उंच रांगडा दणकट
पिळदार शरीरयष्टी
झुपकेदार मिशावर ताव देऊन...
कणखर आवाज
अशीच प्रतिमा तयार झाली पुरुषाची
पण त्याच्या मनाचा विचार
होत नाही कधी
तोही हळवा असू शकतो...

छानच.

  कवी विलास पंचभाई यांनी कामगारांचे जीवन जवळून अनुभवलेले आहे; अनुभवत आहेत. त्यांचा 'हंगामी' हा कथासंग्रहही याच विश्वाशी आधारित आहे. कामगारांचे आयुष्य शब्दात मांडताना ते म्हणतात, 

कामगारांचं जीवन म्हणजे
लोखंडाशी खेळणं
छन्नी हातोड्यासोबत
रोज घाम गाळणं!

   असा कष्टाचा घाम गाळता गाळता शब्द शारदेची आराधना करत साहित्याच्या क्षेत्रात आपलं योगदान देणाऱ्या कवी, लेखक आणि साहित्यकणा फाउंडेशन, नाशिकचे सचिव श्री विलास पंचभाई यांचा 'मनाची स्पंदने' हा संग्रह नक्कीच वाचनीय असा झालेला आहे. आपणही तो 7774955892 या त्यांच्या  क्रमांकावर फोन करून मागवू शकता.
  एकूण 67 कवितांचा खजिना असलेला 96 पानांचा हा संग्रह नाशिक येथील ज्ञानसिंधू प्रकाशनाने आपल्या सर्वांसाठी केवळ 120 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. दिवाळीतल्या पोटासाठीच्या फराळाबरोबरच हा मेंदूसाठी पाठवलेला फराळ कसा वाटला? ते अवश्य कळवा.

रसग्रहण
-श्री राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
दि. 25 ऑक्टोबर 2022.

Saturday, October 22, 2022

एक दिवाळी

एक दिवाळी

एक दिवाळी अंगण सजवुन सडा समार्जन करते आहे
एक दिवाळी अंधारातच हमसुन हमसुन रडते आहे

काय काय अन् कितीक घ्यावे यादी करते एक दिवाळी
अता करावे काय नेमके दुसरी चिंता करते आहे

पगार, बोनस, सेविंग्ज, हप्ते, घरभाड्याने गच्च एक अन् 
दुसरी आलेल्या पैशाने घर दुसऱ्याचे भरते आहे 

किती फायदा झाला यंदा मोजत आहे एक दिवाळी 
एक दिवाळी आस्मानीच्या सुलतानीशी लढते आहे 

गाडी, बंगला, कपडे लेवुन सजली आहे एक दिवाळी  
एक दिवाळी बिन कपड्याची वाट पित्याची बघते आहे 

गप्पा-टप्पा, फराळ-मैफल करते आहे एक दिवाळी 
एक दिवाळी शांत दिव्याच्या सोबत केवळ जळते आहे 

एक दिवाळी फराळ घेउन येते आहे दुसरीसाठी 
दीपलक्ष्मी डोळे मिटुनी स्वप्न एवढे बघते आहे!

- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

 

Thursday, October 20, 2022

नवकविता आणि नवकवी


   नुकतंच एका कविता लेखनाच्या स्पर्धेला परीक्षक म्हणून जाण्याचा योग आला. स्पर्धा छान झाली. आयोजन भव्यदिव्य होते. कवितेच्या अंगाने काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या.

▪️
दहा-वीस वर्षांपूर्वी काव्य लेखनाच्या स्पर्धा जेवढ्या उदंडपणे आणि उत्साहात व्हायच्या, तेवढ्या सध्या महाविद्यालय स्तरावर होत नसाव्यात. तरुण पिढीला काव्य स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी कमी मिळत असावी.
▪️
मोबाईल ने बऱ्याच कवींमधला कवी मारून टाकला आहे.
▪️
एखाद्या विषयावर कविता लिहायची म्हटल्यास चक्क गुगलवर सर्च करून ती कॉपी-पेस्ट करण्याचा व खाली आपले नाव टाकण्याचा जमाना आला आहे.
परंतु कविता लेखनाच्या स्पर्धेमध्ये जर आपण गुगलवर सर्च करून लिहिलं तर सहज पकडले जाऊ शकतो, कारण परीक्षकांकडेही मोबाईल फोन आहे, हे नवीन कवींच्या लक्षात येत नाहीये!
▪️
नव्या कवींचं वाचन कच्चं आणि कमकुवत आहे. तेच तेच शब्द घोळून पीठ पाडण्याचा प्रकार दिसतो आहे. विजेत्या कवींना किमान तीन काव्यसंग्रह पुरस्कार म्हणून दिले जावेत म्हणजे तरी त्यांचे वाचन वाढेल. स्वतः वाचक नसलेले लेखक बनून इतरांना वाचण्यासाठी भाग पाडत आहेत. वाचक वाचावेत म्हणून तरी लेखकांनी चौफेर वाचक बनणे आवश्यक आहे.
▪️
मुक्तछंदाच्या नावाखाली चक्क निबंध लिहिणारे कवी संख्येने वाढत आहेत. मुक्तछंदातही एक छंद असतो, एक लय आणि ताल असतो, हे ओरडून कोणीतरी सांगण्याची नितांत आवश्यकता आहे.
▪️
चारच कडव्यांची परंतु भारदस्त आणि आशय संपन्न कविता लिहिणे भल्याभल्यांना जमत नाहीये. कडव्यांची आगगाडी म्हणजे कविता नव्हे हे नव्या कवींना सांगणे आवश्यक आहे.
▪️
काही कवी खरोखर कवितेसाठी दिवाने पागल झालेले आहेत व शत प्रतिशत कवितेमध्ये रमत आहेत, त्यांचे भविष्य उज्वल आहे!
▪️
बक्षीसासाठी पेक्षा बक्षिसाआधी चांगली कविता लिहिता येणे हे कवीचे सदभाग्य आहे. ते बऱ्याच जणांना लाभते आहे.

आणि शेवटी,
ताजा कलम:
काही कवींचे हस्ताक्षरही' खराब आहे!!

-राजेश्वर पांडुरंग शेळके
9423542224

Tuesday, September 20, 2022

जुन्या पिढीचं असं होतं...

जुन्या पिढीचं असं होतं...

संस्कारांचं बियाणं घेऊन
फिरत असतात वावरभर
जमेल तेवढं पेरत असतात
उधळत असतात शिवारभर
कधी कधी येतं पीक...
कधी कधी हसं होतं!
जुन्या पिढीचं असं होतं!!

कुठे कुणाचं चुकलं काही
की यांनाच होतो अधिक त्रास
नवी पिढी कशी कुचकामी
यावर बोलतील अख्खा तास
भूतकाळामध्ये शिरून म्हणतील
आमच्यावेळी असं होतं,
आमच्यावेळी तसं होतं...
जुन्या पिढीचं असं होतं!

कळकळ यांची खूप असते
पण हात पुरत नाही...
कधीकधी तर मेंदूही खास
काम करत नाही
भरकटलेलं जहाज काठावर
मग कसंबसं येतं...
जुन्या पिढीचं असं होतं!

त्यांचा त्यांना मान मिळाला 
की आभाळ यांना ठेंगणं
मग नको कुणावर रुसणं
आणि नको कुणावर चिडणं
नातवंडांमध्ये असतील तर मग 
ते म्हणतील, तस्सं होतं!
जुन्या पिढीचं असं होतं!

हळवं असतं यांचं मन
डोळ्यांमध्ये असतो झरा...
पल्याड कोणी बोलवित असतं
शरीर थकलेलं असतं जरा
त्यांच्या केवळ असण्यानेही
घर अगदी साजेसं होतं
जुन्या पिढीचं असं होतं!!

हळूच सोडुन जातात हात
त्याचा नंतर होतो त्रास
फोटोकडे बघतो आपण
शिल्लक राहतात केवळ भास
वेळप्रसंगी गप्पा निघतात 
त्यांचं वागणं कसं होतं!
...
जुन्या पिढीचं असं होतं!

-राजेश्वर पांडुरंग शेळके
नाशिक
9423542224

Wednesday, September 14, 2022

दुनिया

निर्णय चुकला!  हसून म्हटली दुनिया
"मी वेडया माणसांत असतो हल्ली!"


दुःखाचे गाठोडे पेलत जगते दुनिया
तरी हासते किती बहाणे करते दुनिया

कुठे जराशी जागा मिळता टेकायाला
हळूच ओझे हलके थोडे करते दुनिया

तोल तिचाही हजार वेळा ढळतो येथे
सावध होते, पुन्हा पुन्हा सावरते दुनिया

तिच्या मनाचा खोल तळाचा हा गाभारा 
रोज नव्या स्वप्नांना येथे पुरते दुनिया 

जमेल तितके सांगत असते तुला मला ही 
सोबत घेउन बरेच काही मरते दुनिया 

कधी कुणाला उचलून घेते खांदयावरती 
कधी कुणाच्या सरणावरती चरते दुनिया! 

तुला वाटते तितकी दुनिया सोपी नाही
लाखामधल्या एखादयाला कळते दुनिया!

-राजेश्वर शेळके
नाशिक
9423542224

शाळा, शिक्षण आणि तो


वर्गाच्या भिंतींना केवळ नाही ठेका 
झाडाखाली सुध्दा शाळा शिकता येते !

त्याच्यासाठी.!

कोण म्हणतो अभ्यास म्हणजे 
नुसता डोक्याला ताप आहे?
शाळा म्हणजे टाइमपास 
अन् शिकणे म्हणजे पाप आहे?

सांगा कोणाला प्रत्येक लेक्चर 
भकास,बोरींग, रटाळ वाटतं?
सांगा कोणाला शाळा सोडून 
अर्ध्यावरती कटावं वाटतं?

गृहपाठ कम्प्लीट कर म्हटल्यावर
 कोण फक्त रट्टा मारतो?
अधली मधली वाक्ये गाळून 
उभा आडवा पटटा मारतो?

वर्गामधला भाई बनून
 कोण दुसऱ्याला छळतो?
खिडकीमधून सर दिसले की 
आपल्या जागेकडे पळतो?

पहिला बेंच रिकामा असूनही 
कोण शेवटीच बसतो?
वर्गात कधिकधीच असतो, 
पण त्याला गमपस्तावा नसतो?

कोण वर्गात टॉन्टस मारण्यात 
सगळ्यात पुढे असतो?
आणि सरानी प्रश्न विचारल्यावर 
एकदम गुपचूप बसतो!

कोण आठवडयातून एकदा तरी 
खरपूस मार खातो?
आणि एवढं सगळं सोसूनसुद्धा 
खुशाल अॅबसेंट राहतो?

परीक्षा जवळ आल्यावरती 
कोणाचा चेहरा पडतो?
कॉपी करताना पकडल्यावर
सांगा बरं कोण रडतो?

प्रत्येक वेळेला रिझल्ट लागल्यावर 
कोण निकालपत्रक लपवतो?
आणि चुकून सापडल्यावर 
काहीही कारणं खपवतो?

सांगा त्याच्या अशा वागण्याचं 
असतं कारण काय?
अहो त्याला मुळात कळलेलंच नसतं
हाऊ व्हाट अँड व्हाय?

गणितातल्या उदाहरणानी 
पुरता जाम होतो 
व्याकरणाच्या नियमांनी 
बिचारा हैराण हातो

विज्ञानाची अवघड भाषा 
सुपीक डोक्यात शिरत नाही
नुसता अक्षराचा पाऊस, 
मातीत पाणी जिरत नाही!

इतिहासाच्या तारखा छळतात, 
भूगोलामधले मॅप्स,
पोकळी भरून निघत नाही, 
डोक्यात राहतात गॅप्स !

शिकण्याची हौस त्यालाही आहे 
पण त्याचं शिकणं होत नाही
कानावर फक्त एवढंच त्याच्या
"याला काही येत नाही!

थोडं जाऊ त्याच्या कलाने,
मेथड बदलून पाहू 
शिकविण्याचं टेक्निक बदलू, 
रिझल्ट येतो का पाहू

शिक्षणाने त्याच्या चेहऱ्यावर
स्माईल ठेवलंच पाहिजे
खरंच दोस्तहो,आपण त्याच्यासाठी
एवढं केलंच पाहिजे
एवढं केलंच पाहिजे!

-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

Wednesday, September 7, 2022

शिक्षक दिन कृतज्ञता

🌻
*तुमच्यातल्या गुरूतत्वाला प्रेमादरपूर्वक चरणस्पर्श.*
🙇‍♂️

*कारण,*
🌻
*तुम्ही हे विद्यादानाचं क्षेत्र निवडलं ते यासाठी नाही की खूप पैसे कमवता येतील; पण यासाठी की मुळातच तुमच्यामध्ये एक शिक्षक दडलेला होता, म्हणून.*

🌻
*तुम्ही पदवीप्राप्त गुरू नंतर झालात, अगोदरपासूनच दुसऱ्याला काहीतरी समजून सांगण्याची कला तुम्हाला अवगत होती, म्हणून.*

🌻
*आपल्या मनातलं तर सगळेच सांगतात, परंतु आपण मिळवलेलं ज्ञान दुसऱ्याला देऊन त्याला श्रीमंत करणारे सगळे नसतात. तुम्ही तुमचं ज्ञान त्यांच्यात उतरवून येत्या पिढीला पुढील काळात श्रीमंत करण्यासाठी आता झटत आहात, म्हणून.*

🌻
*आपण नोकरी धरलीत, तेव्हा आपण खूप श्रीमंत नव्हतात, पण तुमची जिद्द प्रचंड होती, तुम्ही पार केलेल्या अनंत अडथळ्यांचे तुम्हीच साक्षीदार आहात, म्हणून.*

🌻
*तुम्हाला दऱ्यांखोऱ्यातल्या मुलांसोबत रमताना पाहिलं की आजही लोकांचा उर अभिमानाने भरून येतो, म्हणून.*

🌻
*फळ्यासमोर उभे राहिल्यावर देहभान विसरून मुलांना समजावून सांगताना तुम्ही अजूनही तितकेच तल्लीन होता, म्हणून.*

🌻
*तुमचं आणि विद्यार्थ्यांचं एक वेगळं नातं आहे. साक्षात भक्त आणि ईश्वराचं असावं तसं. तुमचे विद्यार्थी काहीतरी यश मिळवतात, आणि तुमची छाती अभिमानाने भरून येते कारण ते पहिला फोन तुम्हाला करतात, पहिला पेढा तुम्हाला भरवतात, कित्येकदा घरी अगोदर न जाता तुमच्याकडे अगोदर येतात, म्हणून.*

🌻
*मुलं एकवेळ आईवडिलांचं ऐकणार नाहीत, पण तुमच्या शब्दांवर त्यांचा अजूनही अतूट विश्वास आहे, म्हणून.*

🌻
*समाजातील इतर प्रत्येकजण एकच आयुष्य जगतो, परंतु तुम्ही आजवर शिकवलेल्या विद्यार्थ्यांची आयुष्ये ही तुमच्या आयुष्याच्याच प्रतिकृती असतात. तुम्ही शिकवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना आयुष्यभर पुरतात. तुम्ही त्यांच्या आयुष्याचा एक भाग होऊन जाता, म्हणून.*

🌻
*मातीच्या गोळ्याला आकार देणारे तुम्ही सर्वश्रेष्ठ कुंभार आहात, म्हणून.*

🌻
*तुम्ही तुमची सात्विकता अजूनही शाबूत ठेवली आहे, म्हणून.*

🌻
*तुम्ही खरोखर ग्रेट आहात, म्हणून.*

🌻
*लोकांना म्हणू देत काहीही...*
*तुम्ही दिपस्तंभ होता, आहात,*
*आणि अखंड रहाल.*

*शेवटी इतकंच,*

🌻
*अडखळलेलं प्रत्येक पाऊल*
*आपोआप शिक्षकांकडे वळतं*
*आणि*
*प्रश्न जेव्हा रस्ता अडवतो,*
*तेव्हा शिक्षकांचं महत्त्व कळतं!*

*तुमच्यातल्या गुरूतत्वाला प्रेमादरपूर्वक चरणस्पर्श.*
🙇‍♂️

-राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...