◾
*शिक्षण की शहाणपण?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_18 जून, बुधवार_
▪️
*शिक्षण की शहाणपण?*
*“पप्पा, कितवीपर्यंत शिकल्यावर आपण शहाणे होतो?” “तसं काही नाही!” “म्हणजे?” “म्हणजे शिक्षणाचा शहाणपणाशी काही संबंध नाही.” “हो का? मग आजपासून शाळा बंद!” “जास्त शहाणपणा करू नकोस, आवर.” “अहो, तुम्हीच म्हणालात ना शिक्षणाचा शहाणपणाशी संबंध नाही. मग शाळेत जाऊन उपयोग काय?” “अरे वेड्या शाळाच आपल्याला शहाणपणाकडे जाणारा रस्ता दाखवते.” “म्हणजे जे कोणी शाळेत गेले नाहीत ते शहाणे नाहीत का?” “आहेत ना! का नाहीत?” “पप्पा तुम्ही स्वतःच गोंधळलेले आहात असं नाही का वाटत तुम्हाला?” “आता तू मला शहाणपणा शिकवणार का?”*
*“अहो मलाच तर माहित नाही म्हणून तुम्हाला विचारतोय ना? पण तुम्ही किती गोल गोल फिरवताय? सरळ सांगा ना. जर अडाणी लोकही शहाणे आहेत, तर शाळेत जाऊन उपयोग काय? आणि शाळेत गेल्याने शहाणपण येते, तर अडाणी माणसं शहाणी कशी??”*
*“हे बघ, शहाणपण म्हणजे विचार करून पाऊल उचलण्याची अक्कल. कुठे, कधी, किती, कोणासमोर, कसं बोलावं आणि कसं वागावं याची समज म्हणजे शहाणपण. दुःखाचा, संकटाचा, वाईट वेळेचा अंदाज घेण्याचं, आणि त्यांचा धीराने सामना करण्याचं कौशल्य म्हणजे शहाणपण. वाद होऊ न देता, समोरच्या माणसाचं मन न दुखावता, आपलं म्हणणं त्याला पटवून देता येण्याची हुशारी म्हणजे शहाणपण. शहाणपण अनुभवाने येतं, आणि चांगलावाईट अनुभव प्रत्येकाला येतो. शाळेत जाणाऱ्यालाही, आणि शाळेत न जाणाऱ्यालाही! म्हणून अडाणी माणसंही शहाणी असू शकतात. शाळेत गेले नाहीत म्हणून ते मूर्ख असं नाही. त्यांच्या आयुष्यात आलेल्या परिस्थितीने, वेळेने, माणसांनी, बऱ्यावाईट अनुभवांनी त्यांना शहाणं बनवलेलं असतं."*
*“आणि शिक्षण?” “आपल्यामध्ये जन्मापासूनच असलेल्या, पण आपल्यालाच माहीत नसलेल्या शक्तींची आपल्याला ओळख करून देतं ते शिक्षण. शिक्षण आपल्याला लिहायला, वाचायला, आकडेमोड करायला शिकवतं. जगातल्या स्पर्धेत आत्मविश्वासानं उभं रहायला, आपलं म्हणणं ठामपणे मांडायला शिकवतं. शहाणं बनवतं. त्यासाठीच तर असते शाळा, आणि आपले पूजनीय शिक्षक. माळावरच्या ओबडधोबड दगडाचं देवाच्या सुंदर मूर्तीत रूपांतर करावं तसं आपल्या खडबडीत आयुष्याला शिक्षण सुंदर आकार देतं. गरीबाला श्रीमंत बनवतं. शिक्षण ही अशी ढाल आहे, की ती आयुष्यभर आपलं रक्षण करते.*
*
*“मग शाळेतलं शिक्षण आणि अनुभवातून आलेलं शिक्षण यात फरक काय?” “फरक इतकाच की शाळेत शिक्षक आधी शिकवतात, मग परीक्षा घेतात. अनुभव आधी जीवघेणी परीक्षा घेतो, आणि मग कानाखाली झापड मारून शिकवतो! अनुभवांनी शिकवलेली शाळा म्हणजे शहाणपण! कळलं?”*
*“हो पण मग महत्त्वाचं काय? शिक्षण की शहाणपण?” “शिकून येणारं शहाणपण! पण तू आज असं का विचारतोयस?" “ अहो, काल तुम्ही म्हणत नव्हते का, की तुमच्या कोणत्यातरी मित्राने तुम्हाला फसवलं म्हणून? मग आजी मला म्हणत होती की तुझा बाप इतका शिकला पण त्याला अजून शहाणपण आलं नाही!”*
*“निघ रे तू शाळेत! आला मोठा उंटावरचा शहाणा!!”*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224