Thursday, October 23, 2025

पूजा म्हणजे नेमकं काय?

*पूजा म्हणजे नेमकं काय?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_22 ऑक्टोबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*पूजा म्हणजे नेमकं काय?*🤔

*पूजा हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा विधी आहे. सणावाराला पूजा हवीच! लक्ष्मीपूजनाशिवाय आपण दिवाळीची कल्पनाही करू शकत नाही. पण पूजा म्हणजे नेमकं काय? असं विचारलं तर तुम्ही म्हणाल, पूजा म्हणजे पूजा! दुसरं काय?*

 *एका सोप्या प्रश्नाच्या आधाराने जाऊया. खनिज (मिनरल) म्हणजे काय? तर ‘जे खाणीमधून मिळतं ते खनिज.’ यातला शेवटचा ‘ज’ म्हणजे जन्मलेला. ज्याचा जन्म किंवा उत्पत्ती खाणीत झाली ते खनिज. प्राण्यापासून उत्पन्न झालेली किंवा मिळालेली उत्पादनं म्हणजे प्राणिज. अगदी तसंच ‘पूर्णत्वामधून जन्मलेली कृती म्हणजे पूजा!’*

 *खरी पूजा तेव्हाच होते, किंवा केली जाते जेव्हा आपल्या आनंदात, सुखात, उत्साहात, संकल्पात, इच्छेत, कार्यात... कशातही 'पूर्णत्व' लाभल्याची भावना आपल्या मनात येते. त्याशिवाय केलेली पूजा म्हणजे केवळ दिखावा आहे; बाकी काही नाही! ‘मला हे मिळू दे, मला ते मिळू दे’ अशी ‘मागण्यासाठी’ केलेली पूजा देवाला तरी पोहचत असेल का? पूजेच्या दिवशी किंवा वेळीही इतरांवर ओरडणं, खेकसणं हे त्याला आवडत असेल का? ‘मन भरलेलं असणं’ म्हणजे पूर्णत्व! आणि देवाकडून काहीच नको असताना त्याची मांडलेली पूजा ही खरी पूजा!*    

*आता आणखी एक सोपा प्रश्न. आपण पूजा करतो म्हणजे नेमकं काय करतो?? तुम्ही म्हणाल सोपं आहे; देव्हारा सजवतो, आरास मांडतो, पंचामृत आणतो, मंत्र म्हणतो, नैवेद्य दाखवतो, आरती म्हणतो, प्रसाद वाटतो!*

 *प्रसिद्ध तत्त्ववेत्ते श्री श्री रविशंकर यांनी या प्रश्नाचे अतिशय छान उत्तर दिले आहे. ते म्हणतात, आपण पूजा करतो म्हणजे दुसरं तिसरं काही करत नाही तर चक्क नक्कल करतो! कुणाची? तर प्रत्यक्ष देवाची! निसर्गाची! तुम्ही म्हणाल, कशी? तर हे पहा- सूर्य-चंद्र घेऊन निसर्गदेव रोज आपली आरती करत असतो, आपण इतकासा दिवा घेऊन त्याला ओवाळतो! त्याने आपल्यासाठी मोठमोठे जलाशय दिले, नद्या वाहत्या केल्या, पाऊस दिला; आपण त्याला ‘जल समर्पयामिss!’ म्हणत लोटाभर पाणी दाखवतो. त्याने आपल्यासाठी ठायी-ठायी अन्न निर्माण केलं, आपण चार बोटांच्या चिपट्यावर बसेल इतका नैवेद्य त्याला दाखवतो. त्याने आपल्याला वाऱ्याचं, पानांचं, पावसाच्या थेंबांचं संगीत दिलं, आपण त्याच्यासमोर कॅसेट वाजवतो! त्याने निर्माण केलेल्या पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करून आपण बोलायला शिकलो; आणि आपण त्याच्यासमोर कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात मंत्रजाप करतो! त्याने ओल्या मातीचा सुगंध दिला, आपण धूप-अगरबत्ती लावतो! आपण वेगळं काय करतो?देव खरंच जर आपला हा खटाटोप पाहत असेल तर गालातल्या गालात किती हसत असेल, नाही? म्हणून पूजेचा खरा अर्थ आहे, आहे त्या परिस्थितीत मन शांत ठेवणं, देवाप्रति, निसर्गाप्रति कृतज्ञता जपणं, ती व्यक्त करणं आणि त्याला धन्यवाद देणं! असं पूजन घरोघरी होवो या सदिच्छा आणि खूप खूप शुभेच्छा!* 
    
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Wednesday, October 15, 2025

जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे

*जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_15 ऑक्टोबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!*

*“रविss कुठे आहेस तू? काय करतोयस?” “पप्पा अभ्यास करतोय, बेडरूममध्ये.” “इकडे ये, एक रफ वही आणि पेन घेऊन ये.” “कशासाठी?” “आण म्हटल्यावर घेऊन येत जा. पुढे शंभर चौकशा करत जाऊ नकोस.” मुलगा निमुट वही-पेन घेऊन आला. वडिलांनी त्याच्या हातातून वही घेतली, एक कोरं पान फाडलं आणि त्याच्या बारीक घड्या केल्या! ‘आता पप्पा कागदाची होडी, विमान किंवा एखादी जादू वगैरे करून दाखवतात की काय?’ मुलाला प्रश्न पडला.*

 *वडिलांनी जेवढ्या घड्या पडल्या होत्या तेवढे तुकडे केले, आणि म्हणाले, “आता या प्रत्येक चिठ्ठीवर एकेक नाव लिहायचं.” ‘अच्छा! म्हणजे आज 'राजा-राणी-चोर-शिपाई' खेळण्याचा मूड आहे तर!?’ असा विचार मुलाच्या डोक्यात येईपर्यंत वडिलांनी खिशातून कोऱ्या करकरीत नोटा बाहेर काढल्या. बायकोला हाक मारली. बायको किचनमधून हात पुसतच बाहेर आली, नोटा पाहिल्या व म्हणाली, “झाला वाटतं पगार?” नवऱ्याने मान हलवली. तीही कॉटवर येऊन बसली. सगळा लवाजामा कॉटवर स्थिरस्थावर झाल्यावर नवरा बायकोला म्हणाला, “सांग आता.”*

    *बायकोने सुरू केलं- "घरभाडे अमुक रुपये." वडिलांनी मुलाकडे पाहिलं व म्हणाले, “लिही एका चिठ्ठीवर -घरभाडे.” मुलाच्या लक्षात ‘त’ म्हणता तपेलं आलं. नवऱ्याने पगारामधले घरभाड्याचे पैसे मोजले, बायकोच्या हातात दिले, तिने एक-एक नोट सुट्टी करून बरोबर आहेत का पाहिलं. “हं!” म्हटलं. वडिलांनी नोटा घेतल्या, ‘घरभाडे’ लिहिलेली चिठ्ठी पैशांवर लावली आणि नोटांना रबरबँड लावून बाजूला ठेवली. मुलाला म्हटले, “लिही- किराणाची उधारी, दूधवाले काका, भाजीपाल्यावाली मावशी, लाईटबिल, गॅसची टाकी, मोटरसायकलचा हप्ता, पेट्रोलचे पैसे, दवाखान्याचा खर्च, रविची शाळेची फी, ट्युशनची फी, दीदीचा होस्टेलचा खर्च, मोबाईलचा रिचार्ज, किरकोळ खर्च, उरलेले पैसे...”*

     *वडिलांनी चिठ्ठ्यांप्रमाणे पैसे मोजून त्यांना रबरबँड लावले, पण शेवटची चिठ्ठी तशीच उरली. तिघांनी एकमेकांकडे पाहिलं. मुलाने म्हटलं, “पप्पा तुम्ही जॉबऐवजी एखादा बिझनेस वगैरे का नाही करत? बिझनेसवाल्या लोकांकडे खूप पैसे असतात."*

 *वडिलांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. प्रत्येक माणसाला असंच वाटतं. आपल्यापेक्षा दुसरे जास्त सुखात आहेत; पण तसं काही नसतं. दुरून डोंगर साजरे. जवळ गेलं की सब घोडे बारा टक्के! सगळ्यांच्या डोक्याला सारख्याच मुंग्या! त्यापेक्षा आहे त्याचं असं काही नियोजन करता आलं की जीव सुखात राहतो बघ."*

 *आज मुलाने पुस्तकात नसलेले दोन तीन नवे धडे एकाच अनुभवात शिकले. शिवाय वडिलांनी शेवटच्या चिठ्ठीचे पैसे मुद्दाम खिशातच ठेवले होते ते वेगळं!*
-
    
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Wednesday, October 8, 2025

एकच स्वप्न

*एकच स्वप्न...!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_08 ऑक्टोबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*एकच स्वप्न*

     *आजकाल बहुतांश माणसांचं थोड्याफार फरकाने एकच स्वप्न असतं- ‘मला पैसेवाला व्हायचंय!’*

 *आसपासच्या दुनियेचा भपका पाहून त्याला कळलेलं असतं की पैसा हेच सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. पैसा बोलता है! श्रीमंतीची नशाच वेगळी आहे. तसं नसतं तर सर्वस्वाचा त्याग केलेल्या काही आधुनिक साधू-संत-महात्म्यांचे कोटी-कोटींचे आश्रम झाले असते का?  केवळ समाजसेवा करण्यासाठी म्हणून टू व्हीलरवर राजकारणात आलेल्या सेवकांचे पाचच वर्षांत डोळे दिपवणारे आर्थिक साम्राज्य उभे राहिले असते का? मग सामान्य माणसांनी श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहिलं तर बिघडलं कुठे?*

 *स्वप्न म्हणजे गती. एकाच दमात दहा पावलं पुढे नेणारी जादू म्हणजे स्वप्न. तसंही एपीजे अब्दुल कलाम साहेब म्हणतातच ना, की स्वप्नं ती नव्हेत, जी झोपल्यावर पडतात; खरी स्वप्नं तर ती, जी माणसाला झोपूच देत नाहीत! पण काही सामान्य माणसं अशी स्वप्नं पाहतात, की ती स्वतः तर झोपत नाहीतच; पण त्यांच्यामुळे घरातल्या इतरांनाही सुखाने झोपू देत नाहीत! आणि इथेच गडबड आहे!!*

  *स्वप्नाचे दोन तऱ्हेवाईक नातेवाईक आहेत; अट्टहास आणि हतबलता. दोघंही दोन टोकाचे. घरातले कोणीच आपल्या बाजूने उभे नसताना त्यांच्या विरोधाला समजून न घेता “नाही! मी हे करणारच! आणि करूनच दाखवणार!” अशा वेगवान घोड्यावर बसणं म्हणजे अट्टहास, तर “मला हा मोठा डाव खेळणं भाग आहे, नाहीतर मी संपून जाईन. अगोदर पडलेले लहान-सहान खड्डे भरून काढण्यासाठी हा एक मोठा डाव खेळल्याशिवाय मला पर्याय नाही. आता हा डाव हेच माझं स्वप्न.” अशा भरवशाच्या म्हशीवर बसणं म्हणजे हतबलता. दोघंही कधी दगा करतील सांगता येत नाही. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यावर मांड ठोकता आली तर यशाची देदीप्यमान पताका, आणि घोडा सैरभैर झाला तर अपयशाच्या खोल दरीत भिरकावले जाण्याची शक्यता. म्हैस गाभण राहिली तर दुधाने अंघोळीचं भाग्य, पण त्याच भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला तर “अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी!” म्हणत तिच्यामागं फरफटत जाण्याची, कर्जबाजारी होण्याची नामुष्की. स्वप्न पाहणाऱ्या बऱ्याच जणांची गळाभेट नेमकी या भावकीशी होते; खऱ्या स्वप्नांशी नाही!*
  
    *खऱ्या स्वप्नांना आपली खरी कुवत आणि झेप कुठवर हे माहीत असते. आनंदाने जगता जगता निश्चित दिशेने एकेक पाऊल टाकत गेलं, की ती आपोआप पूर्ण होतात! ती आपल्याला थकवत नाहीत. मानसिक त्रास देत नाहीत. आजारी पाडत नाहीत. आपल्यासोबत आपल्या गतीने चालत राहतात, आणि एखाद्या गोड दिवशी एखाद्या छान शिखरावर आपल्याला अलगद नेऊन पोहचवितात. नाहीतर आयुष्यातला आनंद हिरावून घेऊन आपल्या पदरात श्रीमंतीचं दान टाकणारी स्वप्नं तरी काय कामाची? 'मला आनंदी व्हायचंय!'  हे स्वप्न आपण कधी पाहणार? कारण सरतेशेवटी माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद मोजला जातो. थकवा नाही! म्हणून पैशाची स्वप्नं जरूर पहावीत; पण त्यांचा पाठलाग करताना धाप तर लागणार नाही ना? याचा विचार दोनदा नक्की करावा.*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224


Wednesday, October 1, 2025

हे बगा सायब

*हे बगा सायब...!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_01 ऑक्टोबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*हे बगा सायब...*

*वल्ला दुष्काळ बगायला आलाव का? या! येवढे लोकं कशाला घिऊन आले सायेब? पंचनामा करनारा नि तुम्ही अशे दोगच आला असता तरी चाललं असतं की. आनी येवढे फोटूवाले? ते कशापायी? आमचा नका काडू. इथं पारावर काही न्हाई, चला तिकडं... बांधावर!*

*काय? कपडे खराब व्हतील म्हनता? होऊद्या वाईच. इकडं जिंदगी खराब झाली आमची. या तुमच्या गाड्या-घोड्या लावा तिकडं बाजूला. पायी चालायची तयारी असंल तर या सायेब, नाईतर जा दुसऱ्या गावाला. इथं उभारून तुम्हाला वल्ला दुष्काळ कळायचा न्हाई. घसरून पडन म्हणता? नाही पडू देत तुम्हाला, चला. गुडघाभर चिखलातून दोन मिनिटं चला आमच्याबर, म्हंजी पाऊस, चिखल, दुष्काळ सगळं कळतंय आपाप. आनी लोक इचारतील दोन-चार कळकळीचे प्रश्न. त्यांना नाराज करू नका सायेब. तुम्ही मदत करनार असं त्यांना वाटतंय, म्हनून इचारतेत.*

*हे बगा सायेब पानी. न्हाई, ह्यो नदीचा फुगवटा न्हाई. ही पावसाची कृपा. याच्याखाली आख्ख्या गावाची पिकं झोपलीत गाढ. पलीकडं ढिगारा दिसतोय का? तिथं उभारलेली घरं होती काल-परवापातूर. समदं पान्याखाली गेलं. माणसं जीव वाचवत पळाली कशीबशी म्हनून वाचली. काय म्हनता? नदी कुटं दिसत न्हाई? नदी बगायची का. नदीबी दावतो तुमाला. चला थोडं फुडं.*

 *आले का? हां, या अशे इकडून. त्यो बगा समुद्र. दिसला का? न्हाई, काल-परवापातूर तिथंबी नदीच व्हती. आमच्या बापजाद्यांच्या पिढ्या गेल्या तिच्या पान्यात मनसोक्त पवन्यात, हुंदडन्यात. कधी बिचारीनी तरास दिला न्हाई. यंदाच तिला काय झालं कायनु. आख्ख्या पिकाचा आन घरादाराचा घास घ्यायलाच उटली.*

*काय? इकडून वास येतो म्हनता? हा, पुरात काही जनावरं वाहून गेली, काही फुगून मेली बिचारी. तुम्ही नाकाला रुमाल नका लावू सायेब. आम्ही लावलाय का?*

 *आमच्या दगावलेल्या जनावरांचं गऱ्हानं तुम्हाला सांगाय लागलो तर तुम्हाला ऐकवणार न्हाई सायेब. तूर्तास जे जित्राब जिवंत राहिलेत त्यांच्यासाठी काय करता आलं तर बगा. वैरन देता येती का बगा. हितं समदंच पान्याखाली गेलंय. कुटून आनायचा जित्राबाला चारा. आमच्याकडं आशेनी बगनारे त्यांचे डोळे बगवत न्हाईत सायेब. जीव तीळ-तीळ तुटतो. तेवडं चाऱ्याचं बगाच बरं का. आनी ह्या उघड्यावरच्या संसाराचा इचार करून आज काय मदत देता आली तर बगा.* 

*काल तुमचे वरचे सायेब हेक्टरी अमुक-अमुक रुपये देतो म्हनले. सायेब, एक इचारू का? तुमची बी आसन ना शेती? हेक्टरी किती खर्च येतो तुम्हाला? जाऊद्या सायेब. मनाला नका लावून घिऊ. पुन्हा म्हणशिला की राजकारन करतूय! पन तेवडं वैरंनीचं बगाच बरं का!*

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, September 17, 2025

थोडा वेळ देता का वेळ

*थोडा वेळ देता का वेळ?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_17 सप्टेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

*थोडा वेळ देता का वेळ?*

  *दुपारी चहाचा ब्रेक झाला होता. दोन मित्र कॅन्टीनच्या टेबलवर चहा पीत बसले होते. एक जरा तणावात दिसत होता. पहिल्याने विचारलं, "काय भाई, अजून सॅलरी झाली नाही त्याचं टेन्शन आहे का? दुसऱ्याने म्हटलं, “नाही रे, पैशांचा प्रॉब्लेम नाहीये, कारण मिसेसपण जॉब करते, मीपण जॉब करतो. भरपूर पैसा येतो महिन्याकाठी. प्रॉब्लेम वेगळाच आहे.” पहिल्याने विचारलं, “काय झालं मग.” दुसरा म्हणाला, “यार आमचं बाळ आमच्याकडे येत नाही. हात पसरले तरी येत नाही आणि बळजबरी घेतलं तर आमच्यासोबत हसत खेळत नाही.”*

 *ऐकणाराला हा जरा वेगळाच प्रॉब्लेम वाटला. त्याने म्हटलं, “मग कुणाबरोबर चांगलं खेळतं?” “आंटी सोबत.” “त्याची आंटी दिवसभर त्याच्याबरोबर असते का?” “अरे आंटी म्हणजे पाळणाघरातली आंटी.” “म्हणजे?”  “तुला तर माहीतच आहे ना, इथे शहरात जगणं किती अवघड आहे ते. आम्ही दोघेही नवरा-बायको जॉब करतो. आता लग्नापूर्वी इतकी छान छान स्वप्नं पाहिली होती म्हणजे जॉब करणं आलंच. तिलाही सकाळी लवकरच बाहेर पडावं लागतं; मलाही. मग आठ-नऊ महिन्याच्या बाळाला कोण सांभाळणार? ती काही त्याला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. मग आम्ही त्याला दिवसभरासाठी पाळणाघरात ठेवतो. तिथे त्याला तीन वेळेस जेवण वगैरे मिळतं. कशाची कमी नाही. इतर लहान बाळांबरोबर खेळतंसुद्धा. दिवसभर छान राहतं. पण संध्याकाळी जेव्हा आम्ही त्याला घ्यायला जातो, तेव्हा ते आमच्याकडे येत नाही. खूप रडतं. सारखं आंटीकडे झेप घेतं. घरी आणलं की किरकिर करतं. काल ते इतकं रडलं की त्याला घरी आणू की नको असं आम्हाला झालं होतं. आता दिवसभर बाळाला एकट्याला घरीही ठेवू शकत नाही. बायकोला म्हटलं तू जॉब सोड, तर ती म्हणते पन्नास हजाराचा जॉब सोडू का? ऐकायला तयार नाही. मी जॉब सोडू शकत नाही. गावाकडून ना तिचे आईवडील इकडे येत, ना माझे. काय करावं डोकं काम करत नाही यार. लवकर बाळ जन्माला घालायचं नव्हतं पण होऊन गेलं ते, आणि आता ही डोकेदुखी!”*

      *लहान बाळाला माहेरी ठेवून दूर कुठेतरी बीएड करणारी मुलगी, दोन महिन्याच्या बाळाला सासू-सासऱ्यांच्या हवाली करून इंग्लिश मिडीयमच्या कुठल्याशा शाळेवर शिकवायला जाणारी मम्मी, जड अंत:करणाने पाळणाघरात बाळाला दिवसभर ठेवून तथाकथित जॉब करणारे मम्मी पप्पा, स्वतः खेड्यात राहून शहरात इतरांकडे मुलांना शिकायला ठेवणारे आईवडील, यांना जेव्हा त्यांची मुलंच नाकारतात,  इतरांना मम्मी 'पपा म्हणतात, आणि यांना काका काकू वगैरे म्हणतात, तेव्हा त्यांची वेदना काय म्हणत असेल बरं? त्यांच्यासाठीच कमावलेला पैसा त्यांना खायला उठत नसेल का?  शेवटी जगण्यातून आनंद वजा केला तर शिल्लक काय उरते? केवळ शून्य! म्हणून जेव्हा मुलांना आपला वेळ हवा आहे, तेव्हा त्यांना वेळच द्यायला हवा. कारण पैशाने केवळ सोयीसुविधा मिळतील, गमावलेली मुलं नाही!*

-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Wednesday, September 10, 2025

खरा शिक्षक कोण

*खरा शिक्षक कोण?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_10 सप्टेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

*खरा शिक्षक कोण?*

    *खरा शिक्षक कोण? या अवघड प्रश्नाचे सोपे उत्तर अगोदरच देऊन टाकतो!  शाळा सोडून गेल्यानंतरही आयुष्यभर जो विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील, तो खरा शिक्षक. 'आमचे सर!' किंवा 'आमच्या मॅडम!' असे म्हटल्याबरोबर ज्यांचा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो ते ‘खरे’ शिक्षक!  बाकीचे नुसते शिक्षक. माझ्या छोट्याशा कारकिर्दीत मला आढळलेले शिक्षकांचे सहा प्रकार पुढील प्रमाणे. आपण शिक्षक असाल तर यात कुठे बसता ते शोधा. विद्यार्थी असाल तर आठवा.*

*1. नवीन शिक्षक!*
*नवं रक्त असतं, उत्साह फार, पण नॉलेज कमी, सगळं कॉपी पेस्ट! घे गाईड, सांग समजून. मार रट्टा. शिवाय जुण्यांची कामं ऐका. शिंगरू ओझ्यानेच मरण्याची शक्यता जास्त. शिकवणं बोंबललं.*

*2. मॉडेल शिक्षक!*
*इतकं नटतील की त्याला माप नाही, सर मॅडम एक समान. मुली सरांवर फिदा, मुलं मॅडमवर फिदा!! तिसरं लिहीत नाही. मग मुलांनी शिकायचं की मेकप बघायचा? की फ्लर्ट करायचं?*

*3. हास्य शिक्षक!*
*इतकं हसवतील की शिकवण्याचं राहूनच जाईल. मुलं डोक्यावर घेतील पण मुख्याध्यापक? आणि इतर शिक्षक? त्यांच्या नजरेतून उतरतील. कारण, परीक्षा डोक्यावर आली तरी अभ्यासक्रम अपूर्णच. त्याचं काय?*

*4. कठोर शिक्षक!*
*असं म्हटलं जातं की यांच्यामुळे शाळेची शिस्त टिकून आहे. पण, ‘दिसला पोरगा की काढ ठोकून!’ ही मानसिकता. त्याची साधी चौकशी नाही, की समजून घेणं नाही. चुकीला माफी तर नाहीच. मग 'मारकुट्या' नाव नाही पडलं तर काय कमावलं?*

*5. अनुभवी शिक्षक!*
*पोक्त म्हणूया. बाकीच्यांचे वय तेवढी तर यांची कारकीर्द! मुलं सोडा, त्यांच्या बापांनाही यांनी शिकवलेलं असतं! तसं ते बोलूनही दाखवतात. पण एक प्रकारची कामात शिथिलता. ‘आपले काय?  थोडे राहिले’  ही मानसिकता. नवं तंत्रज्ञान शिकण्यातला पराकोटीचा आळस. ‘फेक तिकडं!’ ही भूमिका. ‘करत नाही म्हणून सांग त्याला!’ ही गुर्मी. मग कसं जुळवून घेणार नव्या पिढीशी? यांना मुलांची घेणं देणं नाही, मग मुलांनाही यांच्याशी घेणं देणं नसतं!*

  *बाकी काही असो. शिक्षणाचा महामेरू आजही सहाव्या प्रकारातल्या 'धडपडया शिक्षकांनी' पेलून धरलेला आहे. त्यांच्यात वरील सर्व प्रकार चिमूटभर असू शकतात; पण कोणत्या प्रकारात किती अडकायचं याच भान त्यांना असतं. मुलांसाठी जीवाचे रान करणाऱ्या, स्वतःचं आयुष्य उधळून देणाऱ्या, खिशाला चाप पडला तरी मागे न हटणाऱ्या आणि ‘माझा प्रत्येक विद्यार्थी घडलाच पाहिजे!’ या ध्येयाने पछाडलेल्या ध्येयवेड्या अशा शिक्षकांमुळेच शिक्षणक्षेत्राच्या कपाळावरचा पावित्र्याचा मंगल तिलक शोभून आणि टिकून आहे. आणि जोपर्यंत ही धडपडी मंडळी शिक्षण क्षेत्रात येत राहतील, तोपर्यंत शिक्षण हाच प्रत्येकाचा तिसरा डोळा राहील!*

-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Wednesday, September 3, 2025

आनंदाचा टिळा

*आनंदाचा टिळा*
_एक मुद्दा, एक विचार!_
_03 सप्टेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*आनंदाचा टिळा* 

        *उत्साहाने अगदी ओसंडून वाहणारी काही माणसं असतात. त्यांना कधीही पहा, नेहमी टवटवीत असतात. चेहऱ्यावर मस्तसं स्मित असतं. कोणतीही नवी कल्पना मांडा, ती ऐकायला ही माणसं सर्वांच्या पुढे! काहीही काम सांगा, जबाबदारी घ्यायला सगळ्यांच्या अगोदर! निम्मं काम एकट्याच्या जीवावर ओढण्याची यांची हिंमत आणि तयारी असते. कोणताही विषय काढा, यांची त्याच्यावर पीएचडी ठरलेली! अनुभवांचं, किश्श्यांचं भांडार म्हणजे अशी माणसं. बोलतील तर असं की मैफल सजलीच पाहिजे!*

     *देवाने त्यांना खास सवडीने बनवलेलं असतं. साबणावर शाम्पू फ्री देतात ना, तसंच देवाने त्यांना श्वासांसोबत उत्साह फ्री दिलेला असतो! त्यांच्या चेहऱ्यावर असे काही तेज असते की बघणाऱ्याला प्रश्न पडावा, “कौनसी चक्की का आटा खाते हो भाई?”*

        *ही माणसं जिथे कुठे असतील तिथे स्वर्ग निर्माण करतील. त्यांचं नुसतं उपस्थित असणं म्हणजे आनंदाचा अभिषेक! पावसाआधीचा गारवा! त्यांचे शब्दही इतके प्रभावी असतात की मरगळलेल्या मनालाही क्षणात जगण्याची उभारी मिळावी. जगण्यासाठी बुद्धिमत्ता लागत नाही, तर आनंद लागतो! हा आनंद या माणसांकडे असतो.*
 
       *उत्साही माणसं श्रीमंत असलीच पाहिजेत असा काही दंडक नाही. श्रीमंत माणूस उत्साही असेलच असंही नाही. उत्साही असण्याची प्रतवारीच वेगळी आहे. या माणसांचे संसार पहा. फार उत्साहाने त्यांनी त्यांचा संसार फुलवलेला असतो. त्यांचं घर छोटेखानी असलं तरी त्यांनी असं सजवलेलं असतं की बंगल्यावाल्याला भारी! या उत्साहाच्या बळावरच ही माणसं लढत असतात. ती प्रत्येक वेळेला जिंकतातच असं नाही; परंतु हारल्यावर पुन्हा उठून लढण्याची हिंमत आणि उत्साह त्यांच्यात जितका असतो तितका इतरांमध्ये नसतो.*

     *या ग्रेट लोकांना खिंडीत गाठण्यासाठी देव त्यांना मुद्दाम निरुत्साही माणसांमध्ये टाकतो! त्यांच्या भोवती मुद्दाम आळशी, काही करण्याची हिंमत नसलेली, उमेद नसलेली, कायम नकारात्मक विचार करणारी माणसे टाकतो. पण पूर आलेली नदी जसं तिच्यासोबत ओलं सुकं सगळं वाहून नेते तसंच ही उत्साही माणसंही आपल्यासोबत असलेल्यांना पुढे रेटून घेऊन जातात. अशी कितीतरी निरुत्साही माणसं, त्यांच्या नोकऱ्या, त्यांच्या जागा ह्या केवळ त्यांच्यासोबत असलेल्या उत्साही माणसांच्या बळावर टिकून आहेत. हे काम करतात, ते श्रेय घेतात! उत्साही माणसं तिथून वजा केली, की बाकीची मंडळी भुईसपाट झालीच म्हणून समजा!*
 
     *आपण या उत्साही माणसांना जपलं पाहिजे. कारण त्यांचा उत्साह मावळला की अवेळी सूर्य झाकोळल्यासारखं वातावरण तयार होतं. लोहचुंबकाच्या सानिध्यात आलेल्या लोखंडामध्येही जसा काही काळ का होईना, लोहचुंबकाचा गुण उतरतो, तसाच आपल्या सानिध्यात असलेल्या एखाद्या उत्साही माणसाकडून थोडासा उत्साह उसना घेऊन हा आनंदाचा टिळा आपल्याही कपाळी लावला तर काय हरकत आहे?* 
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...