◾
*शांततेचा आवाज*
_एक मुद्दा, एक विचार!_
_12 नोव्हेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
▪️
*शांततेचा आवाज*
*पहाटेच्या किंवा रात्रीच्या नीरव शांततेचा आवाज तुम्ही कधी ऐकलाय का? भिंतीवरच्या घडयाळाच्या सेकंद काट्याचा आवाज कधी ऐकलाय? स्वतःच्या हृदयाच्या तालबंद ठोक्यांचा आवाज तुम्ही कधी ऐकलाय? ऐकला असेल तर तुम्ही शांततेचे पाठीराखे आहात!*
*तसं हे जगच अखंड शांततेचं पाठीराखं आहे. ब्रह्मांडात स्वैर विहार करणाऱ्या स्वयंभू ध्वनिव्यतिरिक्त या जगात दुसरं काहीही असू नये इतकं हे जग शांतताप्रिय आहे. परंतु पृथ्वीच्या पाठीवर सृष्टीची निर्मिती झाली आणि पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांना अधिकच्या ध्वनींची साथ मिळाली. मग वाहत्या हवेचा, जलाचा, निसर्गातील प्रत्येक घटकाचा ध्वनी निनादू लागला. पशुपक्ष्यांच्या मंजुळ ध्वनींपर्यंत हे ठीक होतं, परंतु कुठल्याशा मुहूर्ताला, कुठल्याशा शैवालापासून, कुठल्याशा एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली म्हणे, आणि त्याची स्थित्यंतरे होत होत माणूस नावाचा प्राणी जन्माला आला. मातेच्या उदरात असेपर्यंत तो ही शांतच होता; पण त्याने बाहेर येतानाच पहिला 'ट्याहाss' केला, आणि निसर्गदेवतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. 'हा नवा जीव आपल्या सात्विक शांततेला गोंगाटाचं बोट लावणार!' माणसानेही ती शंका खरी ठरवली.*
*निसर्गाच्या, पशुपक्ष्यांच्या ध्वनीची नक्कल करून माणसाने नरड्यातून जाडाभरडा आवाज काढला! एकमेकांच्या आवाजाचीही नक्कल केली आणि तिला चक्क भाषा असं गोंडस नाव दिलं. दोन माणसांना एकमेकांची आवाजी भाषा कधीच समजायला नको होती. ती समजली नसती तर निसर्गात जास्तीत जास्त आणखी एका आवाजाची भर पडली असती; पण शांततेला गालबोट लागलं नसतं! माणसं एकमेकांशी बोलली, एकमेकांच्या चित्रविचित्र भाषा एकमेकांना ऐकवल्या, संवादाच्या नावाखाली आणखी लोकांना एकत्र आणलं, वेगवेगळ्या अचाट कल्पना लढवल्या, प्रत्यक्षात आणल्या, आणि शांततेला छळायला सुरुवात केली.*
*नवनिर्मितीच्या नावाखाली माणसाने वस्तू बनवल्या. त्या एकमेकांवर आदळून त्यांचा गोंगाट केला. यंत्रं बनवली. कर्कश्यतेची परिसीमा गाठली. निसर्गाच्या संगीतात छेडछाड करून त्याने स्वतःची तथाकथित मंजुळ वाद्ये बनवली. त्याच्या येणाऱ्या वारसदारांनी त्यांच्यातही सगळा कर्णकर्कश्य गोंगाट घुसवला! सुधारणेच्या नावाखाली माणसाने जे जे केलं ते प्रत्येक पाऊल निसर्गाला आणि त्याच्या स्वयंभू शांततेला गालबोट लावणारंच ठरलं. शेवटी व्हायचं तेच झालं. अतिची माती होणारच.*
*आता माणसाला उशिरा शहाणपण आलंय. आता त्याला गोंगाट सहन होत नाही. डीजे ऐकून त्याचे कान फाटू लागलेयत, हृदय बंद पडू लागलंय. घरात टीव्हीचा दणादणाट आणि भांडणाचा कलकलाट ऐकून त्याचा दिवस खराब होऊ लागलाय. स्वतःचा स्वतःशी होणारा संवाद हरवलाय. मोबाईल नावाचं कर्णपिशाच्च त्याच्या 'कान'गुटीवर बसलंय. हेडफोनच्या नावाखाली अगदी कानात घुसून गोंगाट करू लागलंय. पैसे कमवून देणाऱ्या महाकाय यंत्रांसमोर दिवसभर काम करून माणसाचे कान बधिर झालेयत. आता त्याला पुन्हा शांतता हवी आहे! हे म्हणजे अवघड झालं. निसर्गाने बहाल केलेली सर्वांगसुंदर शांतता भंग करून आयुष्याची वाट लागण्याची चिन्हे दिसू लागल्यावर पुन्हा त्याच शांततेचा धावा करणं म्हणजे पुण्याहून पुणतांबं करण्यासारखंच नाही काय?*
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t