Tuesday, February 10, 2026

तीन सोनेरी शब्द

*तीन सोनेरी शब्द!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*10 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*तीन सोनेरी शब्द*

*एका शाळेत एक खेळ करून दाखवणारा आला. मुलं उत्सुकतेने त्याच्याभोवती जमली. त्याने पिशवीतून तीन चेंडू काढले, प्रत्येक चेंडूवर काहीतरी लिहिलेलं होतं. त्याने त्यातला एक चेंडू हवेत फेकला. तो खाली यायच्या आत अलगद दुसरा आणि तिसराही उचलला. आता एक चेंडू हवेत, दोन चेंडू हातात. आणि मग इतक्या सफाईदारपणे ते तीनही चेंडू त्याने हवेत गोलगोल फिरवले की मुलांच्या आनंदाला सीमा राहिली नाही! मुलांनी जोरदार टाळ्या वाजवल्या!*

 *एका चाणाक्ष मुलाने कळीचा प्रश्न विचारला, “तुम्हाला हे चेंडू कसेकाय फिरवता येतात? खेळवाला म्हणाला, “सोप्पंय. कोणतेही दोन चेंडू आपल्या दोन्ही हातांना गुंतवून ठेवतात. मात्र त्या दोन चेंडूंच्या बदल्यात हवेत उंचावलेल्या तिसऱ्या चेंडूचा आपल्याला आनंद घेता येतो.” एका मुलाने म्हटलं, “आम्ही पाहिलं, या चेंडूंवर तुम्ही काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. ते वाचून मग तुम्ही चेंडू फिरवता ना? तो चेंडू हवेत फिरवण्याचा मंत्र आहे का?” खेळवाला म्हणाला, “चेंडूंवर काहीतरी लिहिलंय हे खरंय. पण जे लिहिलंय तो चेंडू फिरवण्याचा नाही, तर जीवन जगण्याचा मंत्र आहे!” “बघू! बघू!” म्हणत मुलं त्याच्यापर्यंत पोहचण्यासाठी एकमेकांवर तुटून पडली! जवळ जाऊन पाहिलं तर फक्त इंग्रजीतली तीन अक्षरं. प्रत्येक चेंडूवर एक अक्षर. टी, एम आणि के! मुलांना काही कळेना. हा कसला एकाक्षरी मंत्र? खेळवाला म्हणाला, “हा साधासुधा मंत्र नाही; गुरुमंत्र आहे! मुलांनी गलका केला, “प्लीज आम्हाला सांगा, प्लीज सांगा!”*

  *खेळवाला म्हणाला, “ही तीन अक्षरं म्हणजे आयुष्यातील तीन सोनेरी शब्द आहेत. लाल चेंडूवरचा टी म्हणजे टाईम; म्हणजे वेळ. हिरव्या चेंडूवरचा एम म्हणजे मनी; म्हणजे पैसा, आणि पिवळ्या चेंडूवरचा के म्हणजे नॉलेज; म्हणजे ज्ञान! वरील खेळाप्रमाणेच आयुष्यात या तीनपैकी कोणत्याही दोन गोष्टी जर गुंतवल्या, तर तिसरी गोष्ट आपल्याला प्राप्त करता येते, तिचा मनसोक्त आनंद घेता येतो!” मुलं म्हणाली, “म्हणजे?”*

*खेळवाल्याने समजावून सांगितलं, “बघा, वेळ, पैसा आणि ज्ञान यापैकी तुम्हाला जर ज्ञान हवे असेल तर तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा लागेल, सोबत पैसेही भरावे लागतील. कारण फुकट काही मिळत नाही! तुम्हाला जर पैसे हवे असतील, तर तुमचं ज्ञान, कला आणि तुमचा महत्वाचा वेळ लोकांना द्यावा लागेल, तेव्हा लोक तुम्हाला पैसे देतील, आणि जर तुम्हाला स्वतः ला मोकळा वेळ हवा असेल, तर जे काम तुम्हाला करायचे आहे त्यासाठी त्या कामातील ज्ञानी माणूस नेमून तुम्ही मोकळे राहू शकता, मात्र तुम्हाला त्याला पैसे द्यावे लागतील! म्हणजे दोन गोष्टी गुंतवल्या की तिसरीची प्राप्ती होते! हो की नाही?” मुलांनी “होsss” म्हणत जोरदार टाळ्या वाजवल्या! मुलांना आज एक नवीन गोष्ट समजली होती.*

 *मंडळी, तुम्ही तुमच्या आयुष्यात या तीनपैकी कोणत्या दोन गोष्टी गुंतवत आहात, आणि त्यांच्या बदल्यात तुम्हाला कोणती तिसरी गोष्ट मिळतेय? करा विचार!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, February 4, 2026

अंतिम ध्येय

*अंतिम ध्येय!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*4 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*अंतिम ध्येय*

*एखाद्याला जर विचारलं की तुझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय काय आहे? तर तो म्हणेल की मला अमुक एका गोष्टीत उत्तुंग यश प्राप्त करायचं आहे. शेकड्यातल्या जवळपास प्रत्येकाचं ‘गडगंज श्रीमंत होणं’ हे ध्येय आहे. पण हे खरं माणसाचं अंतिम ध्येय नसतंच मुळी. लोक लक्ष्यालाच ध्येय समजतात!*

 *ध्येयाच्या नावाखाली विद्यार्थ्याला शालांत परीक्षेत नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवायचे आहेत. तरुणाला किमान २०-२५ लाखाचं पॅकेज असलेला जॉब मिळवायचा आहे. कुणाला एखादी परीक्षा पास व्हायचं आहे, कुणाला स्वत:चा बिझनेस सेट करायचा आहे. मनात स्वप्न पाहिलेली प्रॉपर्टी बनवायची आहे. वृद्धत्वाकडे झुकलेला असेल तर त्याला देवदर्शनाची आस आहे.*

 *मात्र या सगळ्या नद्या आहेत केवळ, अंतिम ध्येयाच्या समुद्राकडे घेऊन जाऊ पाहणाऱ्या. त्या माणसाला खुणावत राहतात- ‘ये आमच्या प्रवाहात, आम्ही तुला तुझ्या खऱ्या ध्येयाचा पत्ता सांगतो; त्याचं घर दाखवतो.’ जुन्याजाणत्या लोकांमध्ये बसलं की कळतं की वरीलपैकी एकही नदी समुद्राला मिळताना निर्मळ राहत नाही. अपेक्षांचा आणि अपेक्षाभंगाचा, यश-अपयशाचा, दु:ख-वेदनेचा, लालसा आणि वासनेचा, विश्वासघाताचा, भ्रष्ट आचारविचारांचा, बिनडोक माणसांच्या अक्कलशून्य वागण्याचा इतका गाळ या नद्या वाहून आणतात की त्या जिथे पोहचू पाहतात, त्या समुद्राच्या किनाऱ्यावर सगळी दलदल होऊन जाते. त्या दलदलीत पाय पडायचा अवकाश, की काळपुरुषाने एकाच झडपेत माणूस गिळलाच म्हणून समजा! जिथे नद्यांची ही अवस्था तिथे त्यांच्या पुराच्या पाण्यावर स्वार होऊ पाहणाऱ्या चिनपाट माणसाची काय कथा? कित्येक माणसांना तर या नद्याच अर्ध्यावर ‘या नाहीतर त्या’ काठाला भिरकावून देतात. माणसं तोंडघशी पडतात. तोंड सोलून निघतं. तरी पिंड जळाला तरी सुंभ तसाच राहतो. पुन्हा दुसरी नदी; पुन्हा दुसरी लहर. दिसलं पाणी की मार उडी! पुन्हा कोणी तळाशी, तर कुणी पल्याड भिरकावलेला! चाकाचा शोध लागल्यापासून हे अविरत सुरूच आहे; आणि अजून पुढची अनंत वर्षे थांबेल असं वाटत नाही.*
    
       *तुम्ही म्हणाल असा हा ध्येयाचा खरा समुद्र तरी कोणता आहे? या समुद्राचं नाव आहे, आनंदसागर!माणसाच्या आयुष्याचं खरं अंतिम ध्येय आहे आनंदी होणं! त्याची सगळी धडपड खरी त्याच्यासाठी आहे. पण त्याला हे समजत नाही की आपण मुळातच आनंदरूप होतो! पुन्हा त्याचा शोध घेण्याची गरज नव्हती! फक्त जगायची बात होती!! पण प्रत्येक वेळी नदीतल्या गाळामुळे गोष्ट बिघडते आणि आपल्या मूळ घरी म्हणजे आनंदाच्या डोही आपलं पोहचणं काही होत नाही!*

   *तूर्तास समुद्र जरी नाही मिळाला तरी आपल्यापुरता एखादा आनंदाचा छोटासा डोह आपल्या आसपासच कुठेतरी शोधायला काय हरकत आहे? उगाच तुकोबांनी म्हटलेलं नाही...*
*आनंदाचे डोही, आनंद तरंग*
*आनंद चि अंग आनंदाचे!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Thursday, January 29, 2026

थिंकोनी कमेंटावे!

*थिंकोनी कमेंटावे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*28 जानेवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*थिंकोनी कमेंटावे!*

   *स्टुपिड कमेंट्स केल्याशिवाय ज्यांचा डेटा ते स्वतः दोघांनाही गप्प बसवत नाही, असे काही लोक सोशल मीडियावर जन्माला आले आहेत. ‘दिवसभर विविध इ-भिंतींवर पोष्टी टाकणे आणि लाईक, कमेंट्सची वाट पाहणे, डकवल्या गेलेल्या पोष्टींवर लक्ष ठेवणे, त्या आपल्या अभ्यासपूर्ण, चिकित्सक नजरेखालून काढणे, त्यात थोडासा का होईना ‘त्रुटी’ नामक क:पदार्थ आढळतो का ते पाहणे, दिसल्यास तत्काळ त्यावर तुटून पडणे, सर्वशक्तीनिशी कमेंटवार करून समोरच्याला गारद करणे आणि मोहीम फत्ते करून विजयीमुद्रेने पुढील पोष्टमोहिमेवर निघणे!’ हा यांचा शिरस्ता. हे सगळं कशासाठी? तर आपल्याकडे इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, किंवा स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी! शिवाय आपल्या संपूर्ण तार्किक, अनुभविक, नोस्टेल्जिक, टायपिक क्षमतांचा पुरेपूर वापर करून डेटाबळ खर्चल्याचं समाधान मिळविण्यासाठी. कधी हे इतरांना हर्ट करतात, तर कधी स्वतःच तोंडघशी पडतात!*

   *हे कमेंटलेखक केवळ साध्या लोकांच्याच पोस्टवर तिरकं लिहीत नाहीत;  तर मोठ्मोठ्या सेलिब्रिटींचे फोटो असलेल्या अनोळखी पोस्टवरसुद्धा तावातावाने कमेंटतात. खूपच घाणेरडा शब्द असेल तर xx अशा फुल्या टाकतात; नाहीतर मग शब्दखेळ, अक्षरबदल करून का होईना आपल्या तिरकस भावना तिथपर्यंत पोहचवतातच! ‘आपली कमेंट एकदा तरी तो सेलिब्रेटी वाचेल’ असे त्यांना वाटते. राजकारणी लोकांनी विरोधी मतं पोस्ट करण्यासाठी चाळीस पैशाने माणसं नेमलेली असतात हेही यांच्या गावी नसते. हे त्यांच्या गर्दीत फुकटच सामील होतात!   ना प्रसंगाचे गांभीर्य, ना कोणत्या वेळी काय कमेंट करावी याचे भान! सगळाच सावळा गोंधळ!*

   *एका मोठ्या नटीला एका मुलाखतीमध्ये मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की लोक तुमच्या फोटोवर अतिशय खालच्या शब्दात कमेंट्स करतात ते वाचून तुम्हाला वाईट वाटत नाही का? त्यावर तिने दिलेलं उत्तर खूप छान होतं. ती म्हणाली की ‘सोशल मिडियावरच्या कमेंट आम्ही वाचतो’ हे तुम्हाला कोणी सांगितलं? एवढ्या कमेंट्स वाचण्याइतका वेळ तरी आहे का आमच्याकडे? पण तुम्हाला एक मात्र सांगेल. कमेंट्स करणाऱ्याच्या कमेंट्स प्रत्यक्ष तो सेलिब्रिटी जरी वाचत नसला, तरी टाईप करणाऱ्याचे मित्रमंडळ मात्र नक्की वाचत असते, आणि त्यातून कमेंट करणारा कोणत्या लायकीचा आहे हे त्या मित्रमंडळींना कळत असते. वरील सापळा न समजल्यामुळे समाजात सज्जन म्हणून परिचित असलेले अनेकजण इंटरनेटवर मात्र अतिशय खालच्या स्तराला जाऊन कमेंट करत असतात. एक प्रकारे अशा कमेंट करणारा माणूस खराब शब्द वापरून स्वतःचीच लायकी घालवून घेत असतो, पण त्याला भावनेच्या भरात ते समजत नाही!*

    *कमेंट जरूर करावी, पण आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी. व्यक्त जरूर व्हावं, पण आपल्या कमेंटचं मूल्य ओळखून. प्रसंग काय आहे, आपण स्वतः कोण आहोत, आपलं समाजातलं स्थान काय आहे, आपलं लिहिलेलं वाचणारे कोण आहेत याचा विचार करून व्यक्त झालं तर व्यक्तही होतं येतं आणि देवाचं देवपणही टिकून राहतं, म्हणून-*

*'जैसा जगी मान, तैसेचि वर्तावे*
*आणि कमेंटावे, थिंकोनिया!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, January 21, 2026

अरे संसार संसार जसे कपबशीचे घर

*अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर*
_एक मुद्दा, एक विचार!_
_21 जानेवारी 2026, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर*
~~~

    *‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके, तव्हा मिळते भाकर!’ या चार ओळींमध्ये बहिणाबाईंनी जगण्याचं सगळं तत्त्वज्ञान सांगितलं. एका कष्टकरी नवऱ्याने मात्र हेच तत्त्वज्ञान वेगळ्या शब्दात मांडलं, ‘अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर, बशी बसे आरामशीर, कप हिंडे दारोदार...!’ घ्या आता!*

   *कपबशीचा हा संसार घरागणिक असा वेगळा आहे. काही घरांमध्ये बशी बसलेली, कप हिंडतोय, काही घरांमध्ये कप बसलेला, बशी मरमर करतेय; तर काही ठिकाणी पोरांचं आयुष्य सुखी व्हावं या नावाखाली त्यांनाच वेळ न देता कप आणि बशी दोघेही दिवसभर दारोदार हिंडताहेत! काही असो, संध्याकाळी कप असो की बशी, घरी येणं भाग आहे. तसाही बशीविना कपाच्या आणि कपाविना बशीच्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? एखाद्या बशीला नसेल आवडला कप, एखाद्या कपाला नसेल आवडली बशी. काही कपांना वाटतं ‘मीच लै हुशार’; तर काही बश्यांना वाटतं, ‘आमच्या कपाला अक्कलच नाही!’ तरी ‘तुझं माझं जमेना; तुझ्याविना करमेना’ असा सगळा मामला! या अशा अतिशहाण्या कप आणि बश्यांच्या खोडी मोडण्यासाठीच बहुतेक देव त्यांच्या अशा ‘चिवित्र’ जोड्या लावून मजा बघत असतो!*

   *‘जोड्या स्वर्गात बनतात’ असं लोक म्हणतात खरं, पण जे तिकडे चुकांडी देऊन, निसटून पृथ्वीवर येतील, त्यांना इथली जुनी जाणकार मंडळी गंडवतात! ‘काहीही करून कपाला आणि बशीला वेगवेगळं राहू द्यायचं नाहीच’ हा त्यांचा खाक्या. जोड झालाच पाहिजे, मग तो पुढे टिको, ना टिको. ‘आमच्या डोळ्यांदेखत होऊ दे’ च्या नावाखाली घाईघाईत कानतुटका कप किंवा तडा गेलेली बशी आपण घेऊन आलो हे मंडळींच्या लक्षातच येत नाही. पुढे आयुष्यभर त्या कप आणि बशीची खडखड ‘बा’ चा ‘बा’ ची चालू राहते. जिथे बशी शांत तिथे कप तडतड्या. जिथे कप शांत तिथे बशी बडबडी. मग बशीघरात दुसरं काय होणार? कधी कप एकाकी, तर कधी बशी!*

    *‘आम्हाला आमच्या मनासारखा कप किंवा बशी निवडून घेऊ द्या’ म्हणणाऱ्या आधुनिक कपबश्याही खूप सुखात आहेत असं काही नाही. नव्याची नवलाई संपली की पुन्हा तिथेही तेच पाढे! काही कपांना त्यांच्याच बश्यांचं त्यांच्यापेक्षा चांगलं झालेलं बघवत नाही, त्यांचा अहंकार दुखावतो; तर आपल्या कपाचं इतर बश्यांनी केलेलं अतिकौतुक काही बश्यांना आवडत नाही, त्यांना कप हातातून निसटायची भीती वाटते! पुढारलेल्या शहरातल्या कपबश्यांचं हे आतलं दुखणं आहे. आता जे व्हायचं आहे ते का थांबणार आहे का? त्यांच्यापेक्षा अडाणी कपबश्यांच्या जोड्या सुखात आहेत.*

   *कपबशीच्या भांडणात ‘माघार कोणी घ्यायची?’ हा फार कळीचा मुद्दा असतो. याचं साधं, सोपं, सरळ आणि सुटसुटीत उत्तर आहे, ‘ज्याला आनंदी राहायचं आहे, त्याने!’ हळूहळू एकमेकांना समजून घेत अनुभवाचे चटके सोसले, की दोघांचंही महत्व अबाधित राहतं. जगणं सोपं आणि सुंदर होतं. म्हणून,*

 _*तुम्हाला जर कधी भेटली अशी भांडकुदळ जोडी*_ 
 _*चहात साखर वाढवा थोडी, पुन्हा वाढवा गोडी!*_
_*विस्कटलेल्या संसाराची आणा रुळावर गाडी!*_
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, January 14, 2026

चुकामुक

*चुकामुक*
_एक मुद्दा, एक विचार!_
_14 जानेवारी 2026, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*चुकामुक*

  *गावाकडच्या भाविकांचा एक ग्रुप काशी यात्रेला गेला. सगळ्या बाया बापड्यांना आणि धोतर टोपी बाबांना घेऊन जाणाऱ्या एजंटने सांगितलं की एका मोठ्या स्टेशनच्या अलीकडेच आपल्याला छोट्या स्टेशनवर उतरायचं आहे, म्हणजे गर्दी टाळता येईल. ठरल्याप्रमाणे मंडळी उतरली; पण एक आजीबाई गाडीतच बसून राहिल्या, आणि त्यांची चुकामुक झाली!*

 *थोड्या वेळाने उतरलेल्या माणसांपैकी कोणाच्यातरी लक्षात आलं की एक आजी गाडीतच राहिल्या, गाडी निघून गेली! पोक्त वयाची दोन माणसं लगोलग मागून आलेल्या दुसऱ्या गाडीने पुढे गेलेल्या गाडीत राहून गेलेल्या आजीबाईंना शोधण्यासाठी गेली. तिच्या घरच्यांना कळवलं. गावाकडून आजीचे नातेवाईक आजीला शोधायला दुसऱ्या गाडीने गेले. आजी कुठे गेली, कुठे उतरली, तिचं काय झालं, काही कळलं नाही. पुढील प्रत्येक स्टेशनवर उतरून शोध घेतला, पण आजीचा काही मागमूस लागला नाही. उत्तर भारतात, तीही हिंदी पट्ट्यात पहिल्यांदाच गेलेली ही गावाकडची अशिक्षित मराठी आजी कशी बरं सापडायची?*

 *मंडळी खूप थकली पण आजी सापडली नाहीच. सगळ्या यात्रेचा फियासको झाला. चेहऱ्यावरचा रंग उडाला. बाया बापड्यांचे डोळे रडून रडून कोरडेठाक झाले. आजीचं अंतिम दर्शन कुणालाही झालं नाही. शेवटी आजीच्या घरच्यांनी जड अंतःकरणाने विचार करून निर्णय घेतला आणि पवित्र काशीच्या तीर्थक्षेत्रावर एका घाटावर आजीचा अंत्यविधी पिठाचा गोळा वगैरे ठेवून ब्राह्मणसाक्षीने आरंभ केला. अवघं वातावरण भावूक झालं.*

 *गंगेत स्नानासाठी डुबकी मारलेल्या एका महिलेने जलदान करण्यासाठी पाणी ओंजळीत घेतलं, आणि 'हर हर गंगेsss!' म्हणत अर्पण केलं आणि समोर बघते तर काय? जिचा अंत्यविधी करत होते ती आजी काही अंतरावर घाटावर जिवंतपणे आंघोळ करत होती! एकच गलका झाला. सगळे धावत धावत आजीजवळ गेले. तिचा मुलगा तिच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागला. "तू इकडे कशी पोहोचलीस?" विचारल्यावर ती म्हणाली, "गाडीतल्या काही मराठी माणसांशी मी बोलले. ते म्हणाले की काही काळजी करू नका. तुमच्या गावाकडची मंडळी काशी यात्रेसाठी इथे काशीला नक्की येतील. आपण तिथे जाऊन थांबूया. म्हणून मी इकडे येऊन तुमची वाट पाहत बसले. तुम्ही का इतका उशीर केलात!?" सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला. चुकामुक झालेली आजी शेवटी अशी सापडली! जिवंतपणी आजीचा होऊ घातलेला अंत्यविधी होता होता राहिला!!*

 *आयुष्य हे चुकामुकींचा खेळ आहे. इथे प्रत्येकाची कधी ना कधी, कशाशी तरी, कोणाशी तरी चुकामुक होते.माणसांशी झालेली चुकामुक एखाद्या वेळेला या आजीसारखी दुरुस्त होऊ शकते, परंतु नियतीशी, नशिबाशी, आयुष्याशी झालेली चुकामुक कशी दुरुस्त व्हावी? आयुष्यभर माणूस काहीतरी शोधत राहतो अधून मधून असं वाटतं की आपण जे शोधतो आहोत ते आपल्याला मिळत आहे परंतु खरं पाहिलं तर कोणाला काहीच मिळत नाही. लपाछपीच्या खेळात लपलेला गडी सापडावा आणि तेवढ्यात घरच्यांनी बोलावून घ्यावं तसं प्रत्येकाच्या बाबतीत होतं आणि हाती काही मिळण्याच्या काळातच देवाजीचं बोलावणं येतं आणि मग कळतं आयुष्य म्हणजे निव्वळ चुकामुक! म्हणून एक वेळेस तिळगुळ दिले नाही तरी चालतील, परंतु गोड बोलायला काय हरकत आहे?*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, January 7, 2026

शहरातली अंधश्रद्धा

*शहरातली अंधश्रद्धा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_7 जानेवारी, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*शहरातली अंधश्रद्धा*

*रविवारी शहरातली माणसं तशी आळसावलेली असतात. अंमळ उशिराच उठतात. अशाच एक मॅडम निवांत उठल्या, स्नान वगैरे उरकल्यावर व्हरांड्यात जाऊन सूर्याला नमस्कार करण्यासाठी दरवाजा उघडला. पाहतात तर काय? उंबऱ्याजवळ उजव्या बाजूला मुठभर तांदूळ ठेवलेले. त्यावर हळद, कुंकू टाकलेलं. थोडीशी राखही. एका पिठाच्या गोळ्यात दोन अगरबत्त्या खोचलेल्या. बाजूला एक लिंबू! मॅडमचा आळस कुठल्या कुठे पळाला. झोप खाडकन उडाली. तशाच उलट पावली माघारी गेल्या आणि नवऱ्याला झोपेतून उठवून बाहेर आणलं. नवरा अर्धवट झोपेतच होता, पण समजदार होता. त्याने घडला प्रकार पाहिला, तसाच पुन्हा घरात गेला, केर भरण्याची सुपली आणि झाडू घेऊन आला. सगळं सुपलीत भरलं. शंभर-दिडशे फुटांवरच्या एका झुडपात टाकून हसत हसत आला!*

 *बायको दारात उभी राहून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. त्याने म्हटलं, "विसरून जा. जणू इथं काही नव्हतंच!" ती म्हणाली, "ते ठीक आहे, पण हे जादूटोणा वगैरे तर गावाकडे असतं ना? इथे शहरात सुद्धा??"*

 *तो म्हणाला, "शहर हे सुद्धा एक गावच असतं. अगडबंब पसरलेलं. शहरात कोण राहतं? गावाकडचीच माणसं शहरात येऊन राहतात ना? फरगेट." "अरे पण आपण कुठे कुणाचं घोडं मारलंय? चार महिनेही नाही झाले आपल्याला हे घर घेऊन. इकडचा भाग जरा सुशिक्षित वाटतो, जरा शांतता आहे म्हणून आपण इकडे राहायला आलो ना? आपण तर इथे कोणाला नीटसं ओळखतही नाही. मग हे काय? एवढ्या सुशिक्षित वाटणाऱ्या भागातही जादूटोणा? तरी मी तुला म्हणत होते की अगोदर सीसीटीव्हीची व्यवस्था करूया. तेव्हा तू म्हणालास आताच काही घाई नाही. कोणी केलं असेल हे? आणि आपल्याच दारावर का?"*

 *नवरा म्हणाला, "गावापेक्षा शहरात शिकलेले निर्बुद्ध आणि अतृप्त आत्मे जास्त असतात म्हणून!" बायको म्हणाली, "म्हणजे?" नवऱ्याने सुपली ठेवली आणि म्हणाला, "हे बघ, शहरात माणसं आली, की बरेच जण झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात, काहींचं पोट भरतं; पण मन भरत नाही. सुखदुःख श्रीमंतांनाही आहेत, आणि गरिबांनाही. माणूस सुख गटागटा पितो आणि दुःख चघळत बसतो. दुःखाशी संकटाशी स्वतः दोन हात करण्याची हिंमत नसलेली माणसं मग बाबा लोकांच्या नादी लागतात, आणि 'माझ्यावरचं दुःख, साडीसाती जाऊदे; भले ती दुसऱ्यांवर टाक, पण मला या दुःखातून बाहेर काढ' अशी बावळट मानसिकता ठेवतात. मग हे बाबा लोक सांगतात- तुमच्या आसपास जे सुखी दिसत असतील त्यांच्या दारावर एवढ्या वस्तू देऊन टाका, म्हणजे तुमच्या वाट्याचं दुःख, साडेसाती त्यांना आणि त्यांच्या वाट्याचं सुख तुम्हाला!!' आणि हे वैतागलेले मूर्ख लोक तसंच करत सुटतात.*

*"बापरे! म्हणजे आता आपल्या मागे लागणार की काय ही साडेसाती आणि दुःख?" बायको घाबरल्या सुरात म्हणाली. नवऱ्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "अशी सुखदुःखांची अदलाबदल करणं इतकं साधं, सरळ, सोपं आणि सहज असतं, तर एका रात्रीतून सगळी दुःखी माणसं आनंदी, आणि सगळी आनंदी माणसं दुःखीकष्टी झाली नसती का?? साडेसाती म्हणजे वाईट वेळ नक्की जाते, पण अशी दुसऱ्यांच्या दारात लिंबू मिरच्या टाकून नव्हे! विचार करण्यात आणि टेन्शन घेण्यात वाया चाललेला वेळ जर काम शोधण्यात आणि पैसे कमावण्यासाठी खर्च केला, की साडेसाती जाते म्हणजे जातेच! आणि हो, चांगली वेळ कधीच येत नसते; आपल्याला आपल्याकडे असलेल्या आजच्या वेळेलाच प्रयत्नांनी चांगलं बनवावं लागतं! "चल, चहा ठेव मस्तपैकी, आलं आणि गवती चहा टाकून! राहिलं सीसीटीव्हीचं, तर तो आज बसवून टाकू! मग तर झालं!?*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Wednesday, December 24, 2025

फोनपुराण!

*फोनपुराण!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_24 डिसेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*फोनपुराण!*
अर्थात 
_घरात मोकळेपणाने बोला_

*नवरा-बायको घरी एकटेच निवांत बसले होते. बायकोने हळूच विषय काढला. "अहो ऐका ना, तुमच्या वडिलांना म्हणावं थोडंसं फोनवर बोलणं कमी करा." "का? काय झालं?"*

 *"काय झालं काय, दिवसभर सारखं फोनवर बोलत असतात. इतकं काय बोलायचं असतं कुणास ठाऊक? त्यांना कंटाळा कसा येत नाही? अहो मी म्हणते, ते काय एकटेच नवलाचे मोबाईल वापरतात का? आता घरामध्ये आपल्या इतके फोन आहेत, पण एवढं बोलतो का आपण फोनवर?  अगदी सकाळपासूनच त्यांचे फोन जायला किंवा त्यांना फोन यायला सुरुवात होते. उठले का? चहा घेतला का. नाष्टा केला का? जेवण केलं का."*

 *तुम्ही जाता सकाळी उठून ड्युटीवर. इथे दिवसभर आम्हाला ऐकावं लागतं फोनपुराण! अक्षरश: जेवत असतील आणि फोन जर वाजला, तर तोंडातला घास थांबवून कोणाचा फोन आला बघायला फोनकडे धावतील. झोपलेले असतील आणि रिंग वाजली तर खाडकन उठून बसतील! मिस्ड कॉल पडला तर त्यांना ‘कधी इकडून फोन करू’ असं होतं. आणि तुम्हाला गंमत सांगू का? फोनमध्ये सगळं असतं इंग्लिश. यांचा आणि इंग्लिशचा छत्तीसचा आकडा. त्यातलं यांना ‘ओ की ठो’ कळत नाही. तरी बरोब्बर फोन लावतात बरं! शेवटच्या अंकांकडे बघून त्यांना बरोबर समजतं की हा याचा नंबर, तो त्याचा नंबर. कसं काय कळतं कोण जाणे बाई. पण कधीकधी चुकीच्याच लोकांनासुद्धा लावतात फोन,  मग ऐकणारे सांगतात, बाबा फोन दुसरीकडे लागला! तरी त्यांना काही फरक पडत नाही.*

 *अहो, सगळ्यांची लग्न ते इथेच बसून जुळवतात! कोणाच्या घरी काही भांडण झालं तर त्याचा तोडगाही इथूनच सांगतात. कधी कधी तर इतकं तावातावाने बोलतात की मलाच भीती वाटते- आता फोनवरच भांडण लागतं की काय? मग त्याचं टेन्शन घेऊन पुन्हा ‘राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी’ करत बसतात आणि विक्स नाहीतर झंडूबाम मागतात! आता तुम्हीच सांगा या वयात माणसाने फोनला एवढं चिटकण्याची गरज आहे का?”*

*नवरा म्हणाला, “तुला माहितीये का घरात अबोल राहणारी वयस्कर माणसं फोनवर इतकं का बोलतात?” बायकोने विचारलं,  “का?”  तो म्हणाला, “कारण घरातली माणसं त्यांच्याशी खास बोलत नाहीत...! मग त्यांना आपल्याच घरात पोरकं झाल्यासारखं वाटतं. हे पोरकेपण जर फोन भरून काढत असेल तर बोलू देत त्यांना. बोललं की माणूस मोकळा होतो. मोकळ्या देहात मोकळा श्वास फिरतो. तेवढंच चिमुटभर आयुष्य वाढतं. आज फोन आहे, म्हणून त्यांचा आवाज जिवंत आहे. उद्या फोनही नसेल, तेही नसतील. रिंग तेव्हाही वाजेल, पण ती फोनची नसेल; ती असेल केवळ त्यांच्या आठवणींची...!" तिने नवऱ्याकडे पाहिलं, आणि पहिल्यांदाच मनापासून म्हटलं— "उद्यापासून मी त्यांच्याशी बोलते मोकळेपणाने. बस्स?"*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...