Monday, November 21, 2022

लक्षण


भले नव्हे हे बुरेपणाचे लक्षण आहे
चिडचिड होणे पराभवाचे लक्षण आहे!

जीव लावला ज्यांनी त्यांना शिडी समजणे
तुझ्या मनाच्या खुजेपणाचे लक्षण आहे!

इतकी तंद्री, इतक्या खस्ता, इतक्या धडका...
वेड नव्हे तर अन्य कशाचे लक्षण आहे?

बरेच अंतर निघून आलो आता आपण
अता थांबणे खुळेपणाचे लक्षण आहे!

अपुल्यापुरती दुनिया झाली ज्याची त्याची
आणि म्हणे की नव्या युगाचे लक्षण आहे!

वेळ लागु द्या, पण देण्याची दानत ठेवा
जाणिव असणे जितेपणाचे लक्षण आहे!

हजार वेळा हरून सुद्धा पुन्हा तयारी?
हे योद्धयाच्या पराक्रमाचे लक्षण आहे!

-राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

Thursday, November 17, 2022

बशीकपाची कहाणी


जगातील प्रत्येक कपबशीला समर्पित...

▪️बशीकपाची कहाणी▪️

बशी कपाचे भांडण झाले, निमित्त नव्हते काही
शब्दाने मग शब्द वाढला, कारण नसतानाही...

कपास आला राग म्हणाला, सवय तुझी तू सोड!
तोंड कुठेही उचकटण्याची, कशी अमंगळ खोड ?

बशीही म्हणाली फणकाऱ्याने, तुला विचारतं कोण?
गप रे! मेल्या एकाच घावात, करीन तुकडे दोन!

चिनीमातीचा संसार आपला, दोघंही जाऊ फुटून
कप विचारी बशीला, मग माती आणशील कुठून?

बशी म्हणाली, आता नाहीतरी तडाच गेलाय मला
मी जाईनच, परंतु जाईन घेऊन तुला सोबतीला...

तेव्हापासून कप बिचारा, बशीसमोर नमलेला
नशीब फुटकं! दुसरं काय ? उभा चिरा दुभंगलेला!

बशीही आठवे इतर बशांना, सुखात असतील बिचाऱ्या
म्हणे कसा माझ्याच नशिबी, असला बावळट नाऱ्या!

बशीघरातील बशी, बशीला कशीबशी समजावी
सांभाळ कपाला, प्रत्येक गोष्ट का मीच तुला सांगावी ?

बशी म्हणे मग बघच आता, कशी जिरवते याची
दररोज चाले बशी कपाची,  खडखड 'बा' चा 'बा' ची !

अशी लांबली बशी, जाहला कपही उजाड सुना
कोनाड्यामध्ये पडून आठवे, भूतकाळातल्या खुणा!

तुम्हाला जर कधी भेटली, ऐशी कोणी जोडी
चहात साखर वाढवा थोडी, पुन्हा वाढवा गोडी...

आणिक त्यांची घसरलेली, आणा रुळावर गाडी
पुन्हा आणा रुळावर गाडी !!

-राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

Sunday, November 13, 2022

गझलचा पेड क्लास : आत्मचिंतन

🎙️
🔳

गझलचा पेड क्लास. यावरचं हे आत्मचिंतन.

 मुळात पैसे देऊन गझल शिकण्याला गझलोत्सुक मंडळी  तयार का होतात?
काही निरीक्षणे.
▪️ कोणत्याही कवी संमेलनामध्ये गझल सादर करणारा टाळ्या आणि वाहवा घेऊन जातो! हे भाग्य आपल्याही वाट्याला मिळावे अशी प्रबळ इच्छा होते म्हणून.
▪️ मला कोण शिकवणार? या संभ्रमात असतानाच कोणीतरी पैसे घेऊन का होईना परंतु शिकवत आहे, ही दिलासादायक  बातमी मिळते म्हणून.
▪️ आपला पिंड गझललेखनाचा आहे की नाही हे पुरेसे कळलेले नसते म्हणून.
▪️ तुम्ही गझल म्हणून जे लिहिलं आहे ती मुळात गझल नाहीच आहे, आणि तुम्हाला आणखी खूप सराव करावा लागेल, असं पालूपद त्यांना नेहमी तथाकथित गझलकारांकडून ऐकावं लागतं म्हणून.
▪️ आपल्या नव्या प्रयत्नाला मिळालेले उर्मट उत्तर ऐकूनच नवीन गझल शिकणारा बऱ्याच वेळा सुरुवातीलाच गारद होतो म्हणून.
▪️ गझल फार अवघड गोष्ट आहे आणि मी खूप प्रयत्न केला पण मला गझल लिहायला जमली नाही, अशी जाहीर कबुली बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळत असते म्हणून.
▪️ नव्या उमेदीचा गझलकार साहजिकच सुरुवातीला चुका करत असल्यामुळे तथाकथित सेट झालेले गझलकार त्यांनी आस्थापूर्वक  पाठवलेल्या गझलेकडे नाही म्हटलं तरी थोडा कानाडोळाच करतात. अर्थात त्यांचा दुसरा कुठला हेतू नसतो, परंतु नव्याने लिहिणाऱ्यांना  हुरूप येईल इतपत, त्यांना समजून सांगेल इतका उत्साह, वेळ आणि संयम सेट झालेल्या गझलकाराकडे आणि नवशिक्याकडेही असेलच असे नाही. उलट गझल पाठवणाऱ्या नव्या शिलेदाराचा इगो कधी हर्ट होईल हे सांगता येत नाही. नारायण सुर्वेंनी सांगून ठेवले आहे की कवीचा अहंकार फार मोठा असतो. त्यामुळे त्याच्या चुका काढल्या, की त्याचा राग कधी फणा वर काढेल सांगता येणार नाही. नाहीतर तो नाउमेद तरी होतो. त्यामुळे आहे ते संबंध दुरावण्याची शक्यता निर्माण होते. दोन्ही बाजूंनी टाळाटाळ होते, म्हणून.
▪️ पैसे न घेणाऱ्याकडून त्याच्या सवडीने शिकावे लागते. शिवाय, त्यांचे मन राखावे लागते हाजी हाजी करावी लागते. ऐकून घ्यावे लागते. त्यात खूप वेळ जातो. पैसे दिले की समोरच्याच्या उरावर बसून शिकता येते म्हणून!
▪️ पैसे न घेणारा नुसतेच डोस पाजत असतो, पण पैसे घेणारा बिचारा कळकळीने शिकवतो. हे शिकणाऱ्यासाठी फार सुखदायक असते म्हणून. 
▪️ दोन-तीन महिन्यात गझलचा फॉरमॅट समजला की आपण लिहायला मोकळे! म्हणून.
▪️ शिकण्यासारख्या जवळपास सगळ्याच गोष्टीसाठी पैसे मोजावे लागत असताना कवितेपेक्षा वेगळा फॉरमॅट असलेली व सहज साध्य नसलेली गझल शिकण्यासाठी जर पैसे द्यावे लागत असतील आणि मला हव्या त्या वेळेत शिकायला मिळत असेल तर चुकले कुठे? शिकवणारा पण त्याचा बहुमूल्य वेळ देत असतोच. फुकटला व्हॅल्यू नाही, म्हणून मी पैसे देऊन शिकतो/ शिकवतो अशी दोघांचीही मनोभावना असते म्हणून.
▪️ जे विकते ते पिकते, म्हणून.
▪️ पैसे घेऊन गझल शिकवणाऱ्याचे स्वतःचे कर्तृत्व काय आहे? त्याची साधना किती आहे? गझलेतले किती बारकावे त्याला माहित आहेत? त्याच्या किती गझला रसिकांनी डोक्यावर घेतल्या आहेत? एक माणूस म्हणून तो किती चांगला आहे? गझल शिकवण्याची त्याची कळकळ किती आणि बिझनेस किती? या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक आणि सकारात्मक असतील, तर पैसे देऊनही शिकायला हरकत नसावी. तिथेही केवळ तंत्रच शिकायला मिळेल हे लक्षात असू द्यावे. मंत्र तुमचा तुम्हालाच आत्मसात करावा लागेल.

 पण म्हणून काय एखाद्याला पैसे न देता गझल शिकताच येणार नाही❓ नक्कीच येईल. कारण आज चांगली गझल लिहिणारे बहुतांश लोक पेड क्लास न करताच गझल लिहू लागले होते. गझल ही शिकण्याची नव्हे तर आतून उमलण्याची गोष्ट आहे.

◾मग काय करावं? 

▪️अगोदर एखादी गझल ऐका.
▪️तुम्हाला मनापासून ती आवडलीये का ते पहा. आणि का आवडली आहे ते सुद्धा!
▪️जर तुम्हाला गझल हा प्रकार आवडायला लागला तर तुम्ही आणखी ऐकू लागाल. कान तयार होईल तुमचा. आधी कान तयार करा. खूप ऐका. लिहा कमी, ऐका जास्त. वाचा जास्त.
▪️समाजाकडे, आपल्या अवतीभोवती आणि आपल्या स्वतःच्या आतमध्ये जरा अंतर्मुख होऊन बघायला शिका. छोट्या छोट्या स्ट्राइक्सची तुमच्या मेंदूमध्ये नोंद होते का? त्याचे निरीक्षण करा. ते तुम्ही दोन ओळींमध्ये मांडू शकता का ते पहा.
▪️ गझलसंग्रह वाचत रहा. इतर लोक तुम्हाला चांगले कवी मानत असतील आणि तुम्हाला गझलेची लय, ठेका, नाद, आवर्तन आवडत असेल, तर तुम्ही गझलकडे आकर्षित होता आपोआप. तुम्हाला कुणी सांगायची गरज नाही की अशी गझल लिहा. ती तुमच्याकडून आपोआप लिहिली जाईल एक दिवस. वृत्त, मात्रा, लगावली वगैरे गोष्टी आपोआप साधल्या जातील. लक्षात ठेवा, "वह, जिस में लय हैं, आरोह अवरोह उस में तय हैं!"
▪️थोडं ओबड धोबड लिहाल सुरुवातीला. लिहीत रहा. कुणाला तरी पाठवत, पोस्ट करत रहा. जर तुमच्या लिखाणात गझलतत्त्व असेल, तर गझलेच्या मार्गावरचा एखादा पुढे गेलेला प्रवासी स्वतःहून तुम्हाला कॉल करेल. समजावून सांगेल. तुमचा हात धरून तुम्हाला पुढे घेऊन जाईल.
▪️ गझलेने तुमचा हात धरेपर्यंत गझल लिहिणे सोडू नका. एकदा गझलेने तुमचा हात धरला, की ती तुम्हाला आयुष्यभर सोडणार नाही एवढं नक्की.

 ✒️
- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

Thursday, November 10, 2022

एका डोळ्यात सपन...


तिच्या पापणीची ओल 
तुला दिसायाची नाही... 
खोल विहिरीचा तळ 
तशी तुझी माझी आई!

आईवडिलांवरची कविता मी सहसा म्हणत नाही. नॉस्टेलजिक वगैरे व्हायला होतं.
   ज्येष्ठ स्वाध्यायी लहानू सखाराम कापसे यांच्या पत्नी शशिकला कापसे यांच्या प्रथम स्मृतिदिनी कापसे परिवाराने मंजुळा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कवी राजेंद्र उगले यांच्यासह युवाकवी प्रशांत केंदळे, रवींद्र मालुंजकर सर , सुभाष काजळे, गुलाब पवार साहेब आणि मी सहभागी झालो होतो. सर्वांनी आई वडिलांच्या कविता म्हटल्या.

'मातृपितृकाव्यांजली'तून अनोखी आदरांजली वाहताना वातावरण भारून गेलं होतं. 
  
'माय जिव्हाळा जिव्हाळा/जणू मायेचा लव्हाळा
तिच्या आशीर्वादे सरे/जीवनातला उन्हाळा...'

     यासारख्या मातेच्या प्रेमळ जिव्हाळ्याला शब्दबद्ध करणाऱ्या कविता सादर करत कवी राजेंद्र उगले यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तर कवी प्रशांत केंदळे यांनी सादर केलेल्या-

'माय अमृताचा घडा/माय प्राजक्ताचा सडा
माय रोज शिकविते/मला जीवनाचा धडा...'

     या कवितेने उपस्थितांचे डोळे पाणावले. मी

'लेकराच्या सुखासाठी/आई-बापाचं कष्टणं
देई लेकराच्या हाती /आई शिक्षणाचं धन...'

     ही कविता म्हटली.. गुलाब पवार यांनी 'आई तुझ्या मूर्तिवाणी, या जगात मूर्ती नाही...'आणि सुभाष काजळे यांनी कविश्रेष्ठ बा.भ.बोरकर यांची 'देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे...' ही कविता सादर करत मैफिल उंचीवर नेली. आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांची जाणीव ठेवून पुढच्या पिढीने समजूतदारपणे वागल्यास हे जग निश्चित सुंदर होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर केल्यास भारतीय संस्कृतीसह कुटुंबव्यवस्था टिकून राहील, असा आशावाद कवींनी व्यक्त केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी राजोळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अजय कापसे, प्रदीप कापसे, मनोज कापसे, अंकुश कापसे, सुमीत कापसे यांनी संयोजन केले.

सोबत मी सादर केलेली कविता...

एका डोळ्यात सपन!

एका डोळ्यात सपन 
दुज्या डोळ्यात जपणं 
देई लेकराच्या हाती 
आई शिक्षणाचं धन

तिच्या पापणीची ओल 
तुला दिसायाची नाही 
खोल विहिरीचा तळ 
तशी तुझी माझी आई 
अडचणीच्या वेळेला 
तिचं धीराचं बोलणं 
देई लेकराच्या हाती 
आई शिक्षणाचं धन

राब राबता राबता 
होई काळजाचा चुरा 
तरी घडवी जोमानं 
तिच्या कौतुकाचा हिरा 
काळजाच्या पायथ्याला 
तिच्या घामाचं शिंपण...

इडापीडा जाण्यासाठी 
करी उपास तापास 
लेक राहिला उपाशी
तिचा अडकला घास 
देवळाच्या पायरीला 
तिच्या नावाचं चांदणं...

तिचा डोक्यावर हात 
तुझी लाखाची कमाई 
उभं आयुष्य सरून 
पुन्हा उरते रे आई 
लेकराच्या सुखासाठी 
आईबापाचं कष्टणं..
देई लेकराच्या हाती 
आई शिक्षणाचं धन..

-राजेश्वर पांडुरंग शेळके.
9423542224

Wednesday, November 2, 2022

कुठे जात आहे...


कुठे जात आहे... 
कुठे ज्ञात आहे?

निखाऱ्यात होतो,
फुफाट्यात आहे...

जरी जात नाही
म्हणे जात आहे!

दिव्या काळजी घे...
नवी वात आहे!

जिथे सुस्त खांदा
तिथे घात आहे!

तुझी भूक ही जी 
तुला खात आहे!

अशी जीत झाली 
तशी मात आहे!

▪️
#राजेश्वर_पांडुरंग_शेळके,
नाशिक
9423542224

Monday, October 31, 2022

कवी रवींद्र मालुंजकर : रसग्रहण



प्रश्न:
तुम्ही जर कवी असाल तर तुम्हाला तुमच्या सोडून इतर किती कवींच्या किती कविता पाठ आहेत?
- दहा, पंधरा, वीस, की पन्नास? की एकही नाही?

   विचार करून झाला असेल तर पुढे चला. पुढील वाक्य वाचून तुम्हाला आश्चर्य वाटायला नको की, एक असाही कवी, साहित्यिक अवलिया आहे की त्याच्या स्वतःच्या आणि महाराष्ट्रभरातील कित्येक कवींच्या कवितांच्या ओळी शेकडोंनी तोंडपाठ आहेत! तुम्हाला तुमचीच एखादी कविता ऐकवून तुम्हाला तो कधी क्लीन बोल्ड करेल सांगता येणार नाही! तुम्हाला त्याची कविता माहीत नसेल, पण त्याला मात्र तुमची कविता तोंडपाठ असू शकते. एवढेच नव्हे, तो स्वतःच एकटा कवी झाला नाही, तर त्याने तो ज्यांना ज्यांना भेटला त्या सगळ्यांना कवितेचं वेड लावलं. नाशिक जिल्ह्यातले निम्मे कवी हे या एकट्या माणसाने प्रकाशात आणलेले आहेत!! तो सर्वांचा लाडका तर आहेच, परंतु पायाला भिंगरी बांधून गेली 40 वर्ष कवितेच्या प्रचार आणि प्रसारासाठी तो अविरत झटतो आहे. खेडोपाड्यात कवितेची पाऊलवाट घेऊन जात असताना ऊन-वारा, थंडी-पाऊस याचा त्याने कधी विचार केला नाही.  कवितेपायी भर पावसात नदीच्या पाण्यातून एम 80 गाडी लोटत आणणारा हा काव्यवेडा पठ्ठ्या आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक खेडोपाड्यांमध्ये त्याचा काव्य गोतावळा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तो प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकावर वर्तमानपत्रातून सातत्याने लिहितो आहे. आज मी त्याच्याच पुस्तकावर लिहिणार आहे. Big hands for the one and only THE GREAT RAVINDRA MUKUNDRAO MALUNJKAR!

  सूत्रसंचालनाचे विद्यापीठ म्हणून रवींद्र मालुंजकर हा एक स्वतंत्र अध्याय आहेत. मी आज फक्त त्यांच्या कवितेबद्दल बोलतो आहे. 

  तसं मालुंजकर चौफेर लिहितात, परंतु कविता ही थोडी अखीव, रेखीव,घोटीव असली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो. कविता कोणाचीही असो ती ठेक्यात म्हणता आली की त्यांना आनंद होतो. म्हणून त्यांची कविताही तुम्ही सहज अष्टाक्षरी मध्ये किंवा कुठल्याही एका तालामध्ये बसवू शकता. लेकीसाठी लिहिलेल्या ह्या पुढील काही ओळी पहा,

लेक लाडकी सर्वांची
लेक साऊली घराची
तिच्या आगमने वाजे
रोज तुतारी सुखाची...

 सोपे शब्द मोठा आशय हे मालुंजकरांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. लाडकी लेक सासरी जाताना तिच्या आईवडिलांची होणारी अवस्था त्यांनी किती सुंदर पकडली आहे पहा, 

लेक चालली सासरी
कसे लपवावे आसू
किती वेळ दाखवावे
मुखावर खोटे हसू...

लेक चालली सासरी
झाल्या आठवणी गोळा
काळजात दाटलेला
भावभावनांचा मेळा...

 आपली लेक सुखात राहिली पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा बापाची असते. तिला भेटून येतानाची त्याची मन:स्थिती कवीने खालील शब्दांमध्ये खूप सुंदर रेखाटली आहे.

सुख लेकीचे पाहून
झाला आनंद बापाला
तिच्या घरून निघता
मनोमन सुखावला...

 कालपर्यंत अंगणात बागडणारी आपली लेक सासरी कशी राहत असेल आठवणीने व्याकुळ बाप खालील ओळींमध्ये आपल्याला बघायला मिळतो.

आज कळतंय मला
'बापाचं बापपण'
लेकीच्या काळजीनं
झोपेचं सरपण
अधूनमधून जळल्यावर...!

  कवी लोकांना कविता सुचते कशी? हा एक भाबडा प्रश्न अनेक अकवींना नेहमी पडत असतो. मालुंजकर या प्रश्नाचे उत्तर शोधताना म्हणतात,

देहगाभारा भेदून
येते कविता आतून
मनातल्या भावनांना
घेते शब्दांत गुंफून...

दुःख जगाचे पाहून
मला सुचते कविता
तान्हुल्याच्या हसण्यात
माझी दिसते कविता...

 कविता लिहिणे म्हणजे केवळ 'वेळ जात नाही म्हणून काहीतरी खरडणे' असे नव्हे. कवितेची आणि पर्यायाने कवीची एक भूमिका असते. समाजासाठी कवी अप्रत्यक्षपणे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे कार्य करत असतो. आपल्या कविता लेखनाचं प्रयोजन काय आहे हे कवीने पुढील काही ओळींमध्ये खूप सुंदर सांगितलं आहे. कवी म्हणतो,

माझ्या कवितेने लाभो
दीनदुबळ्या उभारी
त्याच्या आकांक्षांनी घ्यावी
उंच गगनी भरारी...

माझ्या कवितेने द्यावा
घास चिमण पाखरा
येता पंखामध्ये बळ
व्हावा आभाळ आसरा...

  या ओळी वाचल्यानंतर कोणाही काव्यरसिकाला या कविचं शब्दचित्र सहज रेखाटता येण्यासारखं आहे. समाजाच्या भल्यासाठी माझी कविता कामी येवो या भावनेमागे माऊलींचं पसायदानच आहे. मालुंजकरांच्या निरनिराळ्या कविता वाचताना त्यांचा हा स्थायीभाव आपल्याला पदोपदी जाणवल्याशिवाय राहत नाही. यंदाच्या पावसाने बळीराजाला हवालदिल करून सोडलं. त्यावर व्यक्त होताना कवी म्हणतो,

साऱ्या वावरात पाणी
आली घरालाही ओल
सारं सारं आवरता
जगायाचा गेला तोल...

दिसरात केले काम
नाही तुला आली दया
घास तोंडातला आता
तूच लागला ओढाया...

  साक्षात निसर्गाशी भांडण्याची आणि शेतकऱ्याची बाजू मांडण्याची भूमिका इथे कवी घेताना दिसतो, त्याचबरोबर त्याच्या सुखासाठी याचनाही करतो,

त्याच्या पिकल्या पिकाला
नित्य मिळो रास्त भाव
समाधानाच्या ओव्यांनी
आनंदात न्हावो गाव...

त्याच्या जखमेवर शब्दमलम लावताना धीर देतो,

सुख आणि दुःख
येती नियमित
जगण्याची रीत
शिकविण्या

शिवाय छोट्या छोट्या गोष्टीतलाही आनंद माणसाने घ्यायला शिकलं पाहिजे हे सांगताना  मालुंजकर म्हणतात,

अहो, जमेल तेवढं तुम्ही रुजून घ्या पाऊससरीत ओलंचिंब भिजून घ्या...

 'अन्नदाता सुखी राहावा ही मनोभूमिका हे उदात्त माणुसकीचे लक्षण आहे. आणि हे लक्षण रवींद्र मालुंजकरांच्या कवितेमध्ये ठिकठिकाणी जाणवते. असं म्हणतात की 'आपल्या शब्दांना कृतीची आणि कृतीला शब्दांची जोड असली पाहिजे. मालुंजकरांना या दोन्ही गोष्टी साधल्या आहेत. त्यांच्या घराचे दरवाजे अतिथीसाठी सदैव खुले असतात. त्यांच्या घरी गेलेला कोणीही अतिथी विना आदरातिथ्याचा परतत नाही असा  सर्वांचाच आजपर्यंतचा अनुभव आहे. कवीचा स्वभाव त्याच्या शब्दांमधून प्रतीत होत असतो. याचा सुंदर दाखला म्हणजे पुढील काही ओळी. ते म्हणतात,

हात बुडत्याला द्यावा
जपा मानवाचा धर्म
जगताना प्रामाणिक
ध्यानी ठेवा हेच वर्म...

कधी धरू नका इच्छा
मान-सन्मानाची मनी
व्हावे कार्यकर्तृत्वाने
जगी गौरवाचे धनी...

याचकाला देता काही
गाणे समृद्धीचे गावे
देता आधार कुणाला
मन आनंदून जावे...


हे औदार्य अंगी येण्यासाठी कवी एकटाच सुहृदयी असून चालत नाही, त्याची अर्धांगिनी ही त्याच्या सारखीच असेल तर त्याच्या वागण्या, बोलण्या, संसाराला खरी शोभा येते. त्यांनीच लिहून ठेवलेल्या या पुढील ओळी पहा. 

उद्या तिचा वाढदिवस.
म्हणालो तिला...
'काय आणू तुला गिफ्ट... ?'
खळखळून हसत ती उत्तरली...
'कशाला हवंय दुसरं गिफ्ट,
तुझ्याएवढं सर्वांगसुंदर गिफ्ट असताना!'
ती बोलली सहज
आणि मिळाली
बायको समजदार असल्याची खूण..!

  हे कुटुंब समजदार असण्याचं एक कारण म्हणजे ते पॅराशुटर्स नाहीयेत; ते ग्रासरूटर्स आहेत. ज्या परिस्थितीशी तोंड देऊन आई-वडिलांनी आपल्याला घडवलं, तिची त्यांना जाणीव आहे. ताई दादांच्या आठवणी मध्ये रमताना कवी म्हणतो,

आई आभाळ आभाळ
डोळा गच्च भरलेलं
सुखी ठेवण्या संसारा
सारं सारं रितं झालं...

आई माझी वा तुमची
नसे कधीही वेगळी
साऱ्या पोरांवर तिची
माया सारखी सगळी

   वडिलांचे आयुष्य वर्तमानाशी सांधताना कवी नॉस्टेल्जिक होतो. कवीचं व्याकुळ मन प्रकर्षाने लिहितं होतं,

हाडं गोठवणाऱ्या थंडीत
जगण्याची लढाई लढण्यासाठी
सायकलला पॅडल मारणारं
कोणी पाहिलं की
दादा...तुमची आठवण येते!

मी वही मागितल्यावर
तुम्ही मोठ्या कसरतीने
बनवून द्यायचात माझ्यासाठी
जुन्या पानांची वही.
आज मुलांसाठी नवी वही आणताना
कुणाचा व्याकूळ चेहरा दिसला की दादा...तुमची आठवण येते!

कष्टकऱ्यांच्या वस्त्यांमधली
ज्योत जागते रात्री
धगधगत्या स्वप्नांना असते
उजाडण्याची खात्री
 या कवी राजेश्वर शेळके यांच्या ओळींचा प्रत्यय मालुंजकरांच्या खालील ओळींमधून येतो,

कंदिलाच्या इवल्या प्रकाशात
जमेल तसा केला अभ्यास
उज्ज्वल भविष्यासाठी जपला
काळजामधला प्रत्येक श्वास...

 चांगला अभ्यास करणारा विद्यार्थी शेवटी चांगला होतोच. मालुंजकरही तसेच झाले. स्वतः शिक्षक होऊन ज्ञानदानाचे काम करणारे रवींद्र मालुंजकर आपल्या शिक्षकांबद्दलची कृतज्ञता खालील ओळींमध्ये व्यक्त करतात,

गुरुजी....
आपणच चेतवला आमच्यात
विश्वासाचा लख्ख दिवा
आपणास मिळो दीर्घायुष्य
अन् आनंदाचा अक्षय ठेवा.

 शेवटी, आयुष्य ज्याला म्हणतात ते तरी वेगळं काय आहे? कवी म्हणतो,

आयुष्य
म्हणजे
वाहते
पाणी....

सुख
दुःखाची
झुळझुळ
गाणी...!

आयुष्य
म्हणजे
हक्काचं
घर...

पाहुण्यांनी
जपावा
स्वतःचा
स्वर...!

आयुष्य
म्हणजे
प्रसन्न
फूल...

जपावं
सुंदर
आतलं
मूल...!

आयुष्य
म्हणजे
राबणारे
हात...

संकटांवर
द्यावी
हसत
मात...!

 अशा सहज सुंदर अक्षरप्रतिभेचा हा शब्दप्रभू त्याच्या आयुष्यामध्येही एक गोड आणि सर्वांना हवाहवासा मित्र आहे. नाशिकचा साहित्यिक आणि सांस्कृतिक कोश रवींद्र मालुंजकर या नावाशिवाय अपूर्ण आहे, राहील. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'आठवांचे लक्ष मोती' या काव्यसंग्रहाच्या संदर्भाने मी त्यांच्या कवितांचं हे माझ्या परीने केलेलं रसग्रहण आहे. तुम्हाला हे रसग्रहण कसं वाटलं? नक्की कळवा. तुम्हाला त्यांच्या कविता वाचायच्या असतील, तर तुम्ही त्यांना त्यांच्या 9423090526 या क्रमांकावर कॉल करून संग्रह मागवू शकता. काही उणं अधिक लिहिलं गेलं असेल, टाईपो झाला असेल, व्याकरण चुकलं असेल,अशुद्धलेखन झालं असेल, तर ती माझी लेखन-उणीव आहे हे मान्य करतो.

 काव्यसंग्रह : आठवांचे लक्ष मोती
 कवी : रवींद्र मुकुंदराव मालुंजकर
 वैशाली प्रकाशन पुणे
 मुखपृष्ठ : अरविंद शेलार
 पाठ राखण : ( ब्लर्ब )विवेक उगलमुगले
 निर्मिती मूल्य:  ₹150 केवळ.

रसग्रहण :
राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
चलभाष: 9423542224

Thursday, October 27, 2022

'सगळे काही...


'सगळे काही...

पोटामधली आगच असते सगळे काही
वेळ बनविते माणुस डाकू, देव, कसाई

प्रत्येकाला छळतो येथे जाळ वेगळा
पुजतो माणुस प्रसंग पाहून दगडालाही!

माणुसकीच्या केवळ गप्पा नावापुरत्या
स्वार्थ काजळी काळे करते गोऱ्यालाही

माय माउली, बाप दादला, भाऊ दादा
तुला सांगतो जगी कुणाचे कोणी नाही..

तू दुनियेच्या बाजारामधली कठपुतली
नाच नाच तू... त्यावर ठरते तुझी कमाई

इथे वांझ शब्दांची केवळ अफरातफरी
हळूच बोला... इथे बोलण्याचीच मनाई!

तलवारीला धार असू दे... ढाल नसू दे
भयाण अंधारातच होते घोर लढाई

डोळ्यामधले अत्तरपाणी खरे बोलते
( कुणास ठावे का त्यालाही इतकी घाई? )

तुझे स्वतःचे जगणे सावर, सोड झमेला
घेउन जाइल खोल तुला ही बेपर्वाई...

कळेल तुजला एखाद्या वळणावर नक्की
वेळेवरती तुझे स्वतःचे कुणीच नाही!

राजेश्वर पांडुरंग शेळके
नाशिक
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...