◾
*फोनपुराण!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_24 डिसेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
▪️
*फोनपुराण!*
अर्थात
_घरात मोकळेपणाने बोला_
*नवरा-बायको घरी एकटेच निवांत बसले होते. बायकोने हळूच विषय काढला. "अहो ऐका ना, तुमच्या वडिलांना म्हणावं थोडंसं फोनवर बोलणं कमी करा." "का? काय झालं?"*
*"काय झालं काय, दिवसभर सारखं फोनवर बोलत असतात. इतकं काय बोलायचं असतं कुणास ठाऊक? त्यांना कंटाळा कसा येत नाही? अहो मी म्हणते, ते काय एकटेच नवलाचे मोबाईल वापरतात का? आता घरामध्ये आपल्या इतके फोन आहेत, पण एवढं बोलतो का आपण फोनवर? अगदी सकाळपासूनच त्यांचे फोन जायला किंवा त्यांना फोन यायला सुरुवात होते. उठले का? चहा घेतला का. नाष्टा केला का? जेवण केलं का."*
*तुम्ही जाता सकाळी उठून ड्युटीवर. इथे दिवसभर आम्हाला ऐकावं लागतं फोनपुराण! अक्षरश: जेवत असतील आणि फोन जर वाजला, तर तोंडातला घास थांबवून कोणाचा फोन आला बघायला फोनकडे धावतील. झोपलेले असतील आणि रिंग वाजली तर खाडकन उठून बसतील! मिस्ड कॉल पडला तर त्यांना ‘कधी इकडून फोन करू’ असं होतं. आणि तुम्हाला गंमत सांगू का? फोनमध्ये सगळं असतं इंग्लिश. यांचा आणि इंग्लिशचा छत्तीसचा आकडा. त्यातलं यांना ‘ओ की ठो’ कळत नाही. तरी बरोब्बर फोन लावतात बरं! शेवटच्या अंकांकडे बघून त्यांना बरोबर समजतं की हा याचा नंबर, तो त्याचा नंबर. कसं काय कळतं कोण जाणे बाई. पण कधीकधी चुकीच्याच लोकांनासुद्धा लावतात फोन, मग ऐकणारे सांगतात, बाबा फोन दुसरीकडे लागला! तरी त्यांना काही फरक पडत नाही.*
*अहो, सगळ्यांची लग्न ते इथेच बसून जुळवतात! कोणाच्या घरी काही भांडण झालं तर त्याचा तोडगाही इथूनच सांगतात. कधी कधी तर इतकं तावातावाने बोलतात की मलाच भीती वाटते- आता फोनवरच भांडण लागतं की काय? मग त्याचं टेन्शन घेऊन पुन्हा ‘राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी’ करत बसतात आणि विक्स नाहीतर झंडूबाम मागतात! आता तुम्हीच सांगा या वयात माणसाने फोनला एवढं चिटकण्याची गरज आहे का?”*
*नवरा म्हणाला, “तुला माहितीये का घरात अबोल राहणारी वयस्कर माणसं फोनवर इतकं का बोलतात?” बायकोने विचारलं, “का?” तो म्हणाला, “कारण घरातली माणसं त्यांच्याशी खास बोलत नाहीत...! मग त्यांना आपल्याच घरात पोरकं झाल्यासारखं वाटतं. हे पोरकेपण जर फोन भरून काढत असेल तर बोलू देत त्यांना. बोललं की माणूस मोकळा होतो. मोकळ्या देहात मोकळा श्वास फिरतो. तेवढंच चिमुटभर आयुष्य वाढतं. आज फोन आहे, म्हणून त्यांचा आवाज जिवंत आहे. उद्या फोनही नसेल, तेही नसतील. रिंग तेव्हाही वाजेल, पण ती फोनची नसेल; ती असेल केवळ त्यांच्या आठवणींची...!" तिने नवऱ्याकडे पाहिलं, आणि पहिल्यांदाच मनापासून म्हटलं— "उद्यापासून मी त्यांच्याशी बोलते मोकळेपणाने. बस्स?"*
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t