◾
*काही सांगायचे आहे...*
_एक मुद्दा, एक विचार!_
_16 जुलै, बुधवार_
▪️
*काही सांगायचे आहे...*
*वयाने पोक्त वाटणारा कोणी एक यात्रेकरू दक्षिणगंगेच्या पाण्याकडे शून्य नजरेने बघत बसला होता. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भटक्या श्वानांची कमी नसते. असाच एक कुत्रा भटकत भटकत तिथे आला आणि त्या बाबांच्या शेजारी बसला. त्यांनी त्याच्या मानेवरून हात फिरवला. दोन मिनिटांत दोघांचे भावनिक मैत्र झाले. दोघेही गप्प. काहीच क्षण गेले असतील आणि तो यात्रेकरू त्या श्वानाच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागला. त्याचं दुःख त्याला सांगू लागला. त्याच्या जवळच्या लोकांनीच त्याला कसं उध्वस्त केलं वगैरे त्याची कर्मकहाणी अक्षरशः कुत्र्याला तो ऐकवत होता. आणि कुत्राही निश्चल डोळ्यांनी आणि भावनिक कानांनी मूकपणे ती जाणून घेत होता. फार विचलित करणारं दृश्य होतं ते.*
*माणसाला व्यक्त होण्यासाठी माणूस मिळू नये?? केवढा हा दैवदुर्विलास!!*
*प्रचंड कुचंबना सहन करत जगणाऱ्या कितीतरी लोकांना व्यक्त होण्यासाठी जागाच नाहीयेत! गरिबीमुळे, अडाणीपणामुळे माणसं अशी बनतात म्हणावं तर तसंही नाही. उलट जी माणसं यात होरपळतायत ती अधिकांश गडगंज श्रीमंती पाहिलेली अशी आहेत. उच्चशिक्षित आहेत. मोठ्या पदांवरची आहेत. रिटायर्ड आहेत. मोठ्या पदव्या, गाडी, बंगला, मान, मरातब यांच्याआड कुणालाही न दिसलेलं, कुरतडणारं हे शल्य सोसणारी माणसं आहेत. ऐकवणार तरी कुणाला? आणि ऐकणार तरी कोण? सभोवताली केवळ कान तुटलेली माणसं. मग ही माणसं शुन्यात नजर लावून एकटक कुठेतरी बघत बसतात. किंवा मग माणूस सोडून कुणाशीही मनमोकळं बोलतात.*
*तुम्हाला ही माणसं वेडसर वाटू शकतील; परंतु यांतील बरीच माणसं अगोदर आपल्यापेक्षाही विचारांनी अधिक प्रगल्भ, समजदार, मायाळू आणि जीव लावणारी होती! कुठल्याशा बेसावध क्षणाला त्यांच्या आयुष्यात कसलंसं वादळ आलं. कोलमडण्याची वेळ आली तेव्हा त्यांना समजून घेणारी माणसंच भोवती नव्हती. जी होती, त्यांनी यांनाच दोषी ठरवलं. किंवा त्यांचा गैरफायदा घेतला. सर्वस्व, स्वाभिमान आणि स्वतेज गमावलेली ही माणसं मग एकटी पडली. माणसांपासून तुटली. माणसांसमोर आपली बाजू मांडण्याऐवजी झाडाफुलांशी, मातीशी, जनावरांशी, तसबिरींशी, उघड्या दाराखिडक्यांशी बोलू लागली. वर्तमानपत्राच्या तुकड्याशी संवाद साधताना त्यांना पाहिलं की हृदय अगदी पिळवटून येतं.*
*आजच्या तथाकथित पुढारलेल्या जगात व्यक्त व्हावं आणि समजून घ्यावं अशा जागा हल्ली कमी होऊ लागल्या आहेत. संवेदना जिवंत असलेल्या जागरूक जणांनी हे जाणीवपूर्वक हेरून आपापल्या परीने अशा जागांची हिरवळ निर्माण केली तर माणसं माणसांशीच बोलतील, पुन्हा रुजतील आणि पुन्हा हिरवळून येतील!*
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc