◾
*एकच स्वप्न...!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_08 ऑक्टोबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
▪️
*एकच स्वप्न*
*आजकाल बहुतांश माणसांचं थोड्याफार फरकाने एकच स्वप्न असतं- ‘मला पैसेवाला व्हायचंय!’*
*आसपासच्या दुनियेचा भपका पाहून त्याला कळलेलं असतं की पैसा हेच सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. पैसा बोलता है! श्रीमंतीची नशाच वेगळी आहे. तसं नसतं तर सर्वस्वाचा त्याग केलेल्या काही आधुनिक साधू-संत-महात्म्यांचे कोटी-कोटींचे आश्रम झाले असते का? केवळ समाजसेवा करण्यासाठी म्हणून टू व्हीलरवर राजकारणात आलेल्या सेवकांचे पाचच वर्षांत डोळे दिपवणारे आर्थिक साम्राज्य उभे राहिले असते का? मग सामान्य माणसांनी श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहिलं तर बिघडलं कुठे?*
*स्वप्न म्हणजे गती. एकाच दमात दहा पावलं पुढे नेणारी जादू म्हणजे स्वप्न. तसंही एपीजे अब्दुल कलाम साहेब म्हणतातच ना, की स्वप्नं ती नव्हेत, जी झोपल्यावर पडतात; खरी स्वप्नं तर ती, जी माणसाला झोपूच देत नाहीत! पण काही सामान्य माणसं अशी स्वप्नं पाहतात, की ती स्वतः तर झोपत नाहीतच; पण त्यांच्यामुळे घरातल्या इतरांनाही सुखाने झोपू देत नाहीत! आणि इथेच गडबड आहे!!*
*स्वप्नाचे दोन तऱ्हेवाईक नातेवाईक आहेत; अट्टहास आणि हतबलता. दोघंही दोन टोकाचे. घरातले कोणीच आपल्या बाजूने उभे नसताना त्यांच्या विरोधाला समजून न घेता “नाही! मी हे करणारच! आणि करूनच दाखवणार!” अशा वेगवान घोड्यावर बसणं म्हणजे अट्टहास, तर “मला हा मोठा डाव खेळणं भाग आहे, नाहीतर मी संपून जाईन. अगोदर पडलेले लहान-सहान खड्डे भरून काढण्यासाठी हा एक मोठा डाव खेळल्याशिवाय मला पर्याय नाही. आता हा डाव हेच माझं स्वप्न.” अशा भरवशाच्या म्हशीवर बसणं म्हणजे हतबलता. दोघंही कधी दगा करतील सांगता येत नाही. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यावर मांड ठोकता आली तर यशाची देदीप्यमान पताका, आणि घोडा सैरभैर झाला तर अपयशाच्या खोल दरीत भिरकावले जाण्याची शक्यता. म्हैस गाभण राहिली तर दुधाने अंघोळीचं भाग्य, पण त्याच भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला तर “अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी!” म्हणत तिच्यामागं फरफटत जाण्याची, कर्जबाजारी होण्याची नामुष्की. स्वप्न पाहणाऱ्या बऱ्याच जणांची गळाभेट नेमकी या भावकीशी होते; खऱ्या स्वप्नांशी नाही!*
*खऱ्या स्वप्नांना आपली खरी कुवत आणि झेप कुठवर हे माहीत असते. आनंदाने जगता जगता निश्चित दिशेने एकेक पाऊल टाकत गेलं, की ती आपोआप पूर्ण होतात! ती आपल्याला थकवत नाहीत. मानसिक त्रास देत नाहीत. आजारी पाडत नाहीत. आपल्यासोबत आपल्या गतीने चालत राहतात, आणि एखाद्या गोड दिवशी एखाद्या छान शिखरावर आपल्याला अलगद नेऊन पोहचवितात. नाहीतर आयुष्यातला आनंद हिरावून घेऊन आपल्या पदरात श्रीमंतीचं दान टाकणारी स्वप्नं तरी काय कामाची? 'मला आनंदी व्हायचंय!' हे स्वप्न आपण कधी पाहणार? कारण सरतेशेवटी माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद मोजला जातो. थकवा नाही! म्हणून पैशाची स्वप्नं जरूर पहावीत; पण त्यांचा पाठलाग करताना धाप तर लागणार नाही ना? याचा विचार दोनदा नक्की करावा.*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224