◾
*संघर्षाचे प्रवासी*
_एक मुद्दा, एक विचार!_
_26 नोव्हेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
▪️
*संघर्षाचे प्रवासी*
*काही माणसं अनंत काळच्या संघर्षाचे प्रवासी असतात. त्यांच्या पाचवीलाच त्यांच्या कपाळावर सटवीने संघर्षाची अशी काही अक्षरं लिहिलेली असतात, की लहानपणापासून त्यांच्या वाट्याला जो संघर्ष येतो, तो आयुष्यभर सुरूच राहतो. नियती एकेक फासा टाकत राहते. ही माणसं त्यातून स्वतःची सुटका करून घेत राहतात. पण एकातून बाहेर पडेपर्यंत नवा फासा तयारच असतो. पहिला गुंता सोडवता सोडवताच दमछाक झालेली माणसं पुन्हा दुसऱ्या गुंत्यात अडकतात. हातपाय मारतात, पाय कसातरी मोकळा करतात. पण नियती पुन्हा नव्या फाशाच्या तयारीत असते.*
*किती कस लागत असेल अशा वेळी या माणसांचा? काय म्हणत असेल त्यांचा जीव? कशी लढत असतील ही माणसं?*
*खरं तर सतत लढतं राहण्यासाठी फार मोठी हिंमत लागते, ती या लढणाऱ्या लोकांकडे असते. फार मोठी किंमत मोजावी लागते; ही माणसं ती किंमत मोजतात. या संघर्षाच्या काळात कितीतरी गोष्टी हातून निसटून जातात. त्यांच्यावर हसऱ्या चेहऱ्याने पाणी सोडावे लागते. ही लढणारी माणसं तेही करतात. लोकांना त्यांचं फक्त यशस्वी होणं दिसतं परंतु त्यांचा त्याग दिसत नाही. कारण आनंदाच्या काळात आपल्यासाठी टाळ्या वाजवणारी माणसं दुखाच्या काळात लपून बसलेली असतात. ज्याची लढाई त्यालाच लढायची असते. कधी कधी तर प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा मदत करत नाही. तोही म्हणतो की तुझी समस्या इतकी अवघड आहे की ती मी सुद्धा सोडवू शकत नाही. ती फक्त तू स्वतःच सोडवू शकतोस! आणि ही लढवय्यी माणसं अशा वेळेला प्रत्यक्ष परमेश्वरालाही वेळेवर मदत न करण्याबद्दल माफ करतात! हार न मानता लढत राहतात. संकटांवर तुटून पडतात. एक वेळ अशी येते की संकटसुद्धा त्यांना घाबरू लागतं. फार कणखर बनतात अशाने माणसं. पण प्रत्येकालाच इतकं कणखर कसं होता येईल?*
*कधीकाळी पहाडासारखी धिप्पाड असलेली बरीच माणसं दिवसागणिक आतुन पोखरली जातात. नंतर शरीराच्या आडून फक्त सापळा शिल्लक राहतो, आणि त्यावर डकवलेली निस्तेज चेहऱ्याची माणसं! सगळं काही अलबेल असलेल्या माणसांना ही माणसं दुर्बल वाटतात; पण तसं नसतं. एका खूप मोठ्या लढाईचे ते एकांडे शिलेदार असतात.*
*खरं जीवन अशी जिद्दी माणसं जगतात, बाकीची फक्त जिवंत राहतात. देवाने पृथ्वीवर पाठवलं म्हणून यायचं, ठेवलं तोपर्यंत राहायचं, बोलावलं की जायचं! या जगण्याला काही अर्थ आहे का? पेक्षा देवा तू मला पृथ्वीवर पाठवलंस, धन्यवाद. तुला मुद्दा माझ्या जगण्यात आडकाठी निर्माण करायची आहे? कर. माझी परीक्षा पहायची आहे? पहा. मी लढतो की नाही बघायचं आहे? बघ. असं म्हणत देवाने घेतलेल्या परीक्षेला जिद्दीने सामोरे जाणारी माणसं हीच खरी माणसं. बाकीची नुसती मिळमिळीत. अशी माणसं काय कामाची?*
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t