◾
*सोपस्कार !*
_एक मुद्दा, एक विचार!_
*25 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
▪️
*सोपस्कार*
*मंडळी, आठवतंय? लहानपणी सकाळी आपली अंघोळ झाल्यावर आई कौतुकाने आपल्याला तिच्यासमोर बसवायची. तिच्याकडे गंधाची एक बोटभर लांबट अशी डबी असायची. आपली इवलीशी हनुवटी तिच्या डाव्या हातांच्या काही बोटांच्या चिमटीत ती अलगद पकडायची, त्या डबीतला लालभडक किंवा चॉकलेटी गंध झाकणालाच असलेल्या लांबट काडीने आपल्या कपाळी रेखायची. आपण त्यावेळी साक्षात बाळकृष्ण, बाळराधा, बाळहनुमान, बाळराम वगैरे दिसायचो.*
*गालांवरून अगदी मोरपीस फिरवावं तसे आई दोन्ही हात फिरवायची, नि आपण तिच्याकडे नुसतंच निरागस नजरेने बघत असायचो. तिचं आपल्याकडे बघून झालं की ती म्हणायची, “जा आता खेळायला! तिने असं म्हटलं, की जणू जग जिंकायला निघालेल्या वीराप्रमाणे शक्तिमान होऊन आपण खेळायला निघायचो! आठवतंय? किती सुंदर काळ होता तो!*
*आता जेव्हा कळतं की आईच्या कपाळीचं कुंकू असो, की तिने आपल्या कपाळी लावलेला गंध किंवा टिळा असो, या गोष्टी लावण्यामागे आपल्या शरीरातलं सर्वात प्रभावी जे आज्ञाचक्र त्याचं रक्षण व्हावं हा निर्मळ हेतू होता, तेव्हा आपल्या महान संस्कृतीचा खरोखर अभिमान वाटू लागतो. पण हळूहळू आपण संस्कृतीपेक्षाही महान झालो! आधुनिकतेच्या लाटेत स्त्रियांनी कुंकवाचा आकार छोटा-छोटा करत एके दिवशी कुंकवालाच तिलांजली दिली आणि थेट टिकलीवर आल्या! तशा बाथरूमच्या भिंतीही सौभाग्यवती झाल्या! टिकल्यांचेही इतके आकार-प्रकार झाले, की साडी कोणत्या रंगाची घातलीय त्यावर टिकली केवढी आणि कोणत्या रंगाची लावायची हे ठरू लागलं.*
*इकडे बाप्या माणूस कोणत्या देवाला किंवा गुरुजींना फॉलो करतो त्याच्यावर त्याची गंध लावायची पद्धत ठरू लागली. माणसं आधीही गंध लावायचीच, पण एकसारखा. आता ‘गंध एक बोटाचा लावायचा, की तीन बोटांचा? उभा लावायचा की आडवा? एक ठिपक्याचा की दोन!’ एक न अनेक प्रकार! आता मंगळसूत्राला लपायला जागा हवीय, आणि गंधाने मात्र प्रदर्शनार्थ उचल खाल्लीय!*
*अगदी गेल्या काही दिवसांपर्यंत गंध लावलेली मंडळी सात्विक, सुस्वभावी वगैरे वाटत असत. हल्ली काही ठिकाणी ते जरा जास्तच अंगावर येऊ लागलं आहे. समाजातील अपप्रवृत्तींच्या कपाळीही गंध हटकून दिसू लागलाय. समोरच्या माणसाला बघताक्षणीच भीती वाटावी किंवा त्याच्यावर दबाव पडावा असा आक्रमक, भडक गंध वा कुंकू मुद्दाम लावून मिरवणाऱ्या या माणसांच्या गावी ‘आज्ञाचक्र’ हा शब्द तरी असेल का?*
*मंडळी, आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला नक्की जपायच्या आहेत; मात्र त्यांचा विपर्यास होणार नाही याचं भान समाज म्हणून आपल्याला ठेवावंच लागेल, कारण गंध कपाळावर असतो; पण माणसात देव पाहण्याचे संस्कार मनात असतील तरच तो अर्थपूर्ण ठरतो, अन्यथा तो उरतो फक्त आणि फक्त सोपस्कार!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.