Saturday, April 17, 2021

एक बाहुली घरात जेव्हा दंगा मांडत असते..


एक बाहुली घरात जेव्हा दंगा मांडत असते
थकलेले घर थकवा विसरुन क्षणभर हासत असते

शाळा भरली, शाळा सुटली, जे जे काही घडले
दप्तर टाकुन लेक अगोदर सगळे सांगत असते

हातामधला खाऊ अर्धा पप्पांना "खा" म्हणते
लेक भरवते अन बापाचे पोट टरारत असते

बापाच्याही नकळत त्याला वाचत असते मुलगी
परिस्थितीची पाने काही, तीही चाळत असते

मुलगी म्हणजे काटकसर अन ऐनवेळची लक्ष्मी
अडचण आली की गल्ल्यातिल चिल्लर नाचत असते

कुरकुरमाळ्या करता करता दुःख विसरतो बाबा
बापालाही लेक निरागस जगणे शिकवत असते!.

-राज शेळके, नाशिक

तू ज्ञानाची पहिली ओळख तू तेजाचे नाव नवे


दीपस्तंभ

तू ज्ञानाची पहिली ओळख तू तेजाचे नाव नवे 
तू गेला त्या मार्गावरती नवपक्ष्यांचे 
लक्ष थवे

अंधाराला भेदुन तेथे तू पेटवला दीप नवा 
स्पर्श तुझा झाला अन् झाली सुगंधित सारीच हवा

तू शब्दांचा असीम साधक तू ज्ञानाची भूक नवी
तू बुद्धाचा दिव्य उपासक तू अजरामर चिरंजीवी

तू जिद्दीची अमर कहाणी, तू यत्नांचे नाव दुजे 
अखंड ऊर्जा, स्वयंप्रेरणा, बा भीमराया नाव तुझे

खचलेल्यांच्या उद्धाराची तू शेवटची आस भीमा
तू लढणाच्यांच्या देहातील धडधडणारा श्वास भीमा 

तुझा चेहरा, तुझे दाखले दीपस्तंभ बनतील इथे 
संघर्षांचे सर्व प्रवासी तुझे शिष्य बनतील इथे

जोवर राहील चंद्र चांदणे, जोवर राहील सूर्य नभी 
अखंड तळपत राहील तोवर भीमा तुझेही नाव जगी

तुझ्या दिव्य तेजाचा येवो अंश जरा आमच्यात भीमा 
तुझा त्याग,बलिदान लढाई सदा असो लक्षात भीमा!

राजेश्वर शेळके,
नाशिक
9423542224

आयुष्य माणसाला स्वस्तात नाडते


आयुष्य माणसाला स्वस्तात नाडते
घेते बरेच काही, थोडेच वाढते!

अंधार भेदण्याला लढतात माणसे
तेथे शरीर पडते... जेथे उजाडते

इतक्यात वाढली का जवळीक आपली
ही घोर संकटाची चाहूल वाटते 

साधू नकोस संधी दिसताच फायदा
मित्रा, अति हुशारी तोट्यात घालते

ज्याच्या घरी सुखांचा नियमीत राबता
त्याला कठोर नियती रस्त्यात गाठते!

ही बक्षिसी म्हणू की आहे नवी तऱ्हा
लालूच ती नशा जी जाळ्यात ओढते

जेथे सदा टवाळी सत्कर्म झेलते
तेथेच दुर्गुणांची किंमत वधारते!

-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

ऐकण्यासाठी मनाचे कान केले




ऐकण्यासाठी मनाचे कान केले
मी पुन्हा शब्दांस माझ्या म्यान केले

हात आधी जोडले... मग फूट केली
एवढेसे काम...पण तू छान केले

माणसे तर शांतता पाळीत होती
दंगलींचे हे कुणी फर्मान केले?

जेवढा एल्गार केला जिंकण्याचा
हारण्याने तेवढे बेभान केले

कोंडमारा काळजाला सोसवेना
शब्द आले... मोकळे मैदान केले

घेउनी अंदाज माझ्या ताकदीचा
भांडण्याच्या ऐवजी गुणगान केले

ही तुझ्या दारी कशी आली गरीबी
व्यर्थ सारे तू तुझे कुर्बान केले! 

तुडविले नात्यांस साऱ्या ऐनवेळी
माणसांनी हे असे बलिदान केले

     ©राज पांडुरंग शेळके
            नाशिक
        #9423542224

पुरुष


राबतो इतका घरासाठी पुरुष
मग कुठे उरतो स्वतःसाठी पुरुष

वेदना त्याची कधी कळते कुणा
फक्त आठवतो सुखासाठी पुरुष!

भाकरीशी झुंजतो सारा दिवस
घास बनतो लेकरासाठी पुरुष

तो सुरक्षित राहतो निश्चिन्त ही
भिंत ठरतो ज्या कुणासाठी पुरुष

देव जेव्हा देवपण नाकारतो
देव ठरतो माणसासाठी पुरुष

संकटांचे सैन्य जेव्हा घेरते
जीव देतो जिंकण्यासाठी पुरुष

राज शेळके, नाशिक
9423542224







माणसे दुखवायची नसतात म्हटले ते...


माणसे दुखवायची नसतात म्हटले ते
आणि वर छद्मीपणाने खास हसले ते

हाक जेव्हा मारली, तेव्हा कुणी नव्हते
आज त्यांचे काम अडले, अन प्रकटले ते!

ठेवली आधी नजर, ठरवून माझ्यावर
बैठका जमवून मग चघळीत बसले ते

ते कुठे गेले जयांना मी नको होतो?
की मला पाहून येथेही...निसटले ते?

दूरवर येणार होते सोबती माझ्या
चार कोसांवर थबकले, हाय थकले ते!

पांघरुण एका चुकीवर घालण्यासाठी
कैकदा केल्या चुका...मुद्दाम चुकले ते

फेकला ज्यांनी चिखल सर्रास दुनियेवर
आज त्यांची वेळ आली...फार चिडले ते!

-राजेश्वर शेळके
9423542224






Monday, January 4, 2021

व्यथा चालून थकली



व्यथा चालून थकली शेवटी, माझ्याबरोबर
तिला पाहून हसले, जीर्ण झालेले कलेवर

तसा मी वर्ज्य होतो... मैफिलीबाहेर अगदी
तरी पडलीच टाळी... तान येताना समेवर

उगीचच हिंडलो मी गावभर वेड्याप्रमाणे
घरी माझ्याच होते शोधले मी जे घरोघर

खऱ्याचा कानही ऐकून खोटे तृप्त झाला
म्हणाला, त्रास होतो सत्य कोणी बोलले तर!

तुला देईन भिक्षा पाहिजे तितकी परंतू
पुन्हा आणायचे नाही कुणी बालक कडेवर

तुझ्यामागे घराचा व्याप आहे,मान्य आहे
तरीही बैस थोडे, जग स्वतःसाठी घडीभर

-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...