Wednesday, August 6, 2025

नवी वाट

*नवी वाट!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_06 ऑगस्ट, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*नवी वाट*

   *प्रत्येक सकाळ ही एक अजब गोष्ट आहे. इतर काही होवो, ना होवो, सकाळ रोज होते. सूर्यदेव कोवळ्या सुवर्णकिरणांचा शिडकावा आपल्यावर करतात. त्यांच्याकडून दीड जीबी डेटा घेऊन आपण कामाला लागतो. दिवस त्याची दिनचर्या इमानेइतबारे पाळतो. आपण त्याच्यामागे गाड्याबरोबर नाळ्याची जत्रा साजरी करतो. काही तासांच्या फिराफिरीनंतर रात्र झाली की “डेटा संपला!” म्हणत आपण हळूच झोपेच्या कुशीत शिरतो; कारण उद्या उठायचं असतं! उद्या आपण असू की नाही माहित नाही; परंतु उद्या सकाळ होणार म्हणजे होणारच! उजाडणार म्हणजे उजाडणारच! तुम्ही म्हणाल, रात्र आहे म्हणजे उद्या दिवस उगवणारच की! त्यात काय एवढं?*

   *मग सांगा, जितके आपण ‘आजच्या सरणाऱ्या काळ्या रात्रीबरोबर उद्याचा लख्ख दिवस उगवणारच आहे’ याबाबत शंभर टक्के ठाम असतो, तितकेच ‘आज वाट्याला आलेली वाईट परिस्थिती उद्या काहीही करून बदलणारच आहे’ याबाबतीत का नसतो?*

   *रात्रभर दुःख उशाला घेऊन निजलेली अनेक माणसं सकाळ त्यांच्या स्वागताला आल्याबरोबर कालचं शिळं दुःख तिच्या तोंडावर फेकून मारतात. मग सकाळ तरी बिचारी त्यांच्यासाठी काय करू शकणार? उलटपक्षी, कालचा सगळा त्रास, अपमान, नुकसान, दुःख रात्रीच्या अंधाराला "समर्पयामि!" करून आशेचं, प्रयत्नांचं, यशाचं आणि आनंदाचं पसाभर दान तिला मनापासून मागितलं तर ती नाही म्हणणार नाही. तिला आपल्याकडून काय हवं असतं? थोडंसं स्मित, थोडीशी लढण्याची तयारी. बस. हे ज्यांना कळतं, त्यांच्या पदरात सकाळ भरभरून दान टाकते!*

    *आणखी एक. कणा ताठ असणाऱ्यांची परिस्थिती बसून राहत नाही. कारण त्यांचा लढाऊ बाणा. ‘आज परिस्थिती कितीही हालाखीची असो, मी ती बदलवून दाखवीन, तोपर्यंत मी प्रयत्न थांबवणार नाही. आज जरी माझ्या पदरात अमावस्या पडलेली असली तरी पौर्णिमेचा चंद्र पदरात पाडून घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही!' असा आत्मविश्वास त्यांच्यात ठासून भरलेला असतो. दिवस बदलण्यासाठी आटोकाट संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाने तो स्वतःमध्ये भरून घ्यायला हवा. कारण गलितगात्र झालेल्या कालच्या देहाला लढण्यासाठी पुन्हा उभारी कोण देणार? तर तो आपल्या आत पेटलेला जाळ! मग अशा लढाऊ माणसासाठी सकाळ मोठी बहीण बनते, त्याच्या पाठीशी भक्कम उभी राहते. कालचं विसर म्हणते, अग्नीचा स्त्रोत असलेला आजचा नवा सूर्य त्याच्या हवाली करते. लढ म्हणते!*

   *एक मात्र खरं आहे. हतबल झालेल्या कितीतरी जणांना कोणत्यातरी एका नवीन सकाळीच प्रकाशाची नवी वाट सापडली आहे. काय सांगावं? आजची सकाळ खास आपल्यासाठीच देवाने पाठवली असावी?*  

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, July 30, 2025

लोढणं बांधलेला जीव

*लोढणं बांधलेला जीव!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_30 जुलै, बुधवार_

▪️
*लोढणं बांधलेला जीव!*

  *आजकाल गाई, म्हशी, बैल या जित्राबांची संख्या घटत चाललीय. ज्यांच्याकडे आहेत त्यांना देवकृपेने काही कमी नाही. गावाकडं उधळणाऱ्या जनावराच्या गळ्यात लाकडाचं नाहीतर लोखंडाचं लोढणं बांधतात, आणि त्याला जखडून टाकतात.*
 
   *भागाभागानुसार त्याला कोणी लोढं, कोणी गंडास, कोणी गंजार, कोणी गळपट्टा, कोणी अंगठीसुद्धा म्हणतात. तर या लोढ्यामुळं ते जनावर जरा नियंत्रणात राहतं आणि शेतकऱ्याचा जीव निर्धास्त राहतो... आपल्या बाबतीतही नियती असंच करते याचा तुम्ही कधी विचार केलाय का?*
  
      *बऱ्याचदा वरकरणी आपल्याला अतिशय आनंदी, कुठलंही टेन्शन नसलेला, हरहुन्नरी  वाटणारा एखादा माणूस वैयक्तिक पातळीवर मात्र एक पराभूत, दयनीय आणि हतबल जीव असतो! लोढणं बांधलेला जीव! नियतीने त्याच्या उजव्या पायाशी एक भला मोठा अदृश्य दगड लोढणं म्हणून बांधून ठेवलेला असतो. तो कोणाला दिसत नाही. हा माणूसही तो कुणाला दाखवत फिरत नाही.*

   *कुणाला कर्जाचं लोढणं, तर कुणाला कोर्टाचं. कुणाला घरातल्या कुणाच्यातरी नाहीतर स्वतःच्या जीवघेण्या आजाराचं लोढणं, तर कुणाला गळ्यात पडलेल्या चुकीच्या माणसाचं! नावं वेगवेगळी, पण शेवटी ते लोढणंच! माणूस अक्षरशः हे लोढणं कसाबसा ओढत पुढे जात असतो. मनाशी म्हणतो, “मी खूप हुशार होतो; आणखी खूप प्रगती करू शकलो असतो, पण या लोढण्यामुळे जखडला गेलो.*

 *जनावरं असं जखडून ठेवल्यावर काय म्हणत असतील माहित नाही, पण माणसं मात्र एकांतात “हे माझ्या वाट्याला काय टाकलंस देवा?” अशी आर्त विचारणा देवाला नक्की करत असतात. ना कोणाला सांगू शकत, ना कोणापुढे रडू शकत. एक खंत आयुष्यभर माणसाला खात राहते; एक शल्य त्याला आयुष्यभर बोचत राहतं. पण गळ्यात लोढणं बांधलेलं असतानाही एखादं जित्राब जसा स्वतःचा आब राखून असतं, तसाच या माणसाचाही समाजातला वावर खंबीर असतो.*
 
     *असं कोणी भेटलं तर त्याच्या लोढण्याची टर उडवू नये. त्याला सहानुभूती दाखवून खुजंही करू नये. त्याला मदत करता आली नाही तरी हरकत नाही, पण त्याच्या जखमेवर मीठ मात्र चोळू नये. उलट पायात लोढणं असतानाही, पाय मोकळे असलेल्यांपेक्षा वेगात धावण्याची कोणत्याही क्षणाला तयारी दाखवणाऱ्या अशा जिगरबाज माणसाला जोरदार सॅल्यूट ठोकावा! त्याच्यापासून काही शिकावं; प्रेरणा घ्यावी. कारण अशी माणसं समाजातले दीपस्तंभ असतात, जे इतर भरकटू पाहणाऱ्यांना आणि हतबल झालेल्यांना दिशा दाखवण्याचं काम करतात, लढण्याचं बळ देतात. साक्षात मृत्यूसुद्धा त्यांना वचकून असतो, कारण...*

*जगायाची प्रबळ इच्छा यमाशी झुंजते तेव्हा*
*लढाई जिंकणाऱ्याला... सलामी ठोकतो मृत्यू!*

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Wednesday, July 23, 2025

शंभर पानी आयुष्य

**शंभर पानी आयुष्य*
_एक मुद्दा, एक विचार!_
_23 जुलै, बुधवार_

▪️
*शंभर पानी आयुष्य*

    *माणसाचं आयुष्य म्हणजे शंभर पानी पुस्तक. जन्म म्हणजे या पुस्तकाचं मुखपृष्ठ; मृत्यू म्हणजे मलपृष्ठ! वर्षागणिक एकेक पान उलटत जातं, आपण पुढे पुढे जात राहतो.*

    *या पुस्तकाची गंमत म्हणजे या पुस्तकाला अनुक्रमणिका नाही. म्हणजे मधले धडे काय काय असणार आहेत हे लेखकाला माहित आहेत; पण त्याने ते मुद्दाम पुस्तकात घातलेले नाहीत. म्हणून तर हे पुस्तक वाचण्यात मजा आहे. आपले आईवडील म्हणजे या पुस्तकाची सुंदर प्रस्तावना, आणि वडीलधाऱ्या माणसाचं प्रेम म्हणजे पुस्तकाला भरभरून मिळालेल्या शुभेच्छा.*

    *या पुस्तकातल्या पानावरची एक ओळ म्हणजे आपला एक दिवस. या ओळीमधला एक शब्द म्हणजे आपल्या वाटेला आलेले प्रहर. आणि अक्षरं म्हणजे ओंजळीतला आत्ताचा एक क्षण! स्वल्पविराम (,) म्हणजे आपण जोडलेली माणसं, अर्धविराम (;) म्हणजे आपल्यावर वाईट प्रसंग येण्याआधी नियतीने दिलेला हलकासा इशारा, तर वाक्यांच्या शेवटी येणारा पूर्णविराम (.) म्हणजे विचार करण्यासाठी आपल्याला मिळालेला निवांत वेळ! ‘येणे, जाणे, खाणे, पिणे...’ अशी क्रियापदं म्हणजे आपलं रोजचं जगणं. ‘छान, भारी, मूर्ख…’ अशी विशेषणं म्हणजे वाट्याला येणारी स्तुती आणि टोमणे! तर, ‘हळूच, अचानक, इथे, तिकडे...’ यासारखी क्रियाविशेषणं म्हणजे आपली काम करण्याची पद्धत आणि आवाका. दोन शब्दांना, वाक्यांना जोडणारी ‘आणि, किंवा, म्हणून...’ यासारखी उभयान्वयी अव्ययं म्हणजे आपल्याला काम पुढे नेण्यासाठी मिळालेली संधी. या वाक्यातलं ‘एकेरी अवतरण चिन्ह’ ('...') म्हणजे आपल्याला वेळोवेळी झालेली सदबुद्धी. तर “दुहेरी अवतरण चिन्ह” ("... ") म्हणजे आपल्याला आलेला आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव, मिळालेला गुरूपदेश! या पुस्तकाची दुमडलेली पानं म्हणजे आपला निरागस विसरभोळेपणा. अर्धवट फाटलेली पानं म्हणजे कधी ना कधी आपला झालेला अपमान, आणि आपण शरमेने खाली घातलेली मान. प्रश्नचिन्ह (?) म्हणजे आपल्यासमोर उभ्या असलेल्या महाकाय अडचणी, तर उद्गारचिन्ह (!) म्हणजे निर्मात्याने आपल्या अवघड प्रश्नाची चुटकीसरशी केलेली सोडवणूक! यातले परिच्छेद म्हणजे आपल्या आयुष्यातली छोटी-मोठी वळणं. यातील धडे म्हणजे सुख-दुःखाची, यश-अपयशाची चलाखीने केलेली सरमिसळ. त्याखालील प्रश्न म्हणजे आपली सद्सद्विवेकबुद्धी जी तटस्थपणे आपल्याला विचारते की तू या यशातून काय शिकलास? या अपयशाने तुला काय शिकवलं? हा आनंद कशाचा? हे दुःख कशामुळे?*

   *पुस्तकाच्या शेवटच्या पानावरच्या शेवटच्या ओळीनंतर दिलेला पूर्णविराम म्हणजे परमेश्वराने आपल्याला सांगणं की बाळा, आता तुझं काम संपलं; पुस्तक जमा कर. आणखी बऱ्याच जणांना हे पुस्तक द्यायचं बाकी आहे!*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Wednesday, July 16, 2025

काही सांगायचे आहे

*काही सांगायचे आहे...*
_एक मुद्दा, एक विचार!_
_16 जुलै, बुधवार_

▪️
*काही सांगायचे आहे...*


    *वयाने पोक्त वाटणारा कोणी एक यात्रेकरू दक्षिणगंगेच्या पाण्याकडे शून्य नजरेने बघत बसला होता. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भटक्या श्वानांची कमी नसते. असाच एक कुत्रा भटकत भटकत तिथे आला आणि त्या बाबांच्या शेजारी बसला. त्यांनी त्याच्या मानेवरून हात फिरवला. दोन मिनिटांत दोघांचे भावनिक मैत्र झाले. दोघेही गप्प. काहीच क्षण गेले असतील आणि तो यात्रेकरू त्या श्वानाच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागला. त्याचं दुःख त्याला सांगू लागला. त्याच्या जवळच्या लोकांनीच त्याला कसं उध्वस्त केलं वगैरे त्याची कर्मकहाणी अक्षरशः कुत्र्याला तो ऐकवत होता. आणि कुत्राही निश्चल डोळ्यांनी आणि भावनिक कानांनी मूकपणे ती जाणून घेत होता. फार विचलित करणारं दृश्य होतं ते.*

 *माणसाला व्यक्त होण्यासाठी माणूस मिळू नये?? केवढा हा दैवदुर्विलास!!*

      *प्रचंड कुचंबना सहन करत जगणाऱ्या कितीतरी लोकांना व्यक्त होण्यासाठी जागाच नाहीयेत!   गरिबीमुळे, अडाणीपणामुळे माणसं अशी बनतात म्हणावं तर तसंही नाही. उलट जी माणसं यात होरपळतायत ती अधिकांश गडगंज श्रीमंती पाहिलेली अशी आहेत. उच्चशिक्षित आहेत. मोठ्या पदांवरची आहेत. रिटायर्ड आहेत. मोठ्या पदव्या, गाडी, बंगला, मान, मरातब यांच्याआड कुणालाही न दिसलेलं, कुरतडणारं हे शल्य सोसणारी माणसं आहेत. ऐकवणार तरी कुणाला? आणि ऐकणार तरी कोण? सभोवताली केवळ कान तुटलेली माणसं. मग ही माणसं शुन्यात नजर लावून एकटक कुठेतरी बघत बसतात. किंवा मग माणूस सोडून कुणाशीही मनमोकळं बोलतात.*

     *तुम्हाला ही माणसं वेडसर वाटू शकतील; परंतु यांतील बरीच माणसं अगोदर आपल्यापेक्षाही विचारांनी अधिक प्रगल्भ, समजदार, मायाळू आणि जीव लावणारी होती! कुठल्याशा बेसावध क्षणाला त्यांच्या आयुष्यात कसलंसं वादळ आलं. कोलमडण्याची वेळ आली तेव्हा त्यांना समजून घेणारी माणसंच भोवती नव्हती. जी होती, त्यांनी यांनाच दोषी ठरवलं. किंवा त्यांचा गैरफायदा घेतला. सर्वस्व, स्वाभिमान आणि स्वतेज गमावलेली ही माणसं मग एकटी पडली. माणसांपासून तुटली. माणसांसमोर आपली बाजू मांडण्याऐवजी झाडाफुलांशी, मातीशी, जनावरांशी, तसबिरींशी, उघड्या दाराखिडक्यांशी बोलू लागली. वर्तमानपत्राच्या तुकड्याशी संवाद साधताना त्यांना पाहिलं की हृदय अगदी पिळवटून येतं.*

  *आजच्या तथाकथित पुढारलेल्या जगात व्यक्त व्हावं आणि समजून घ्यावं अशा जागा हल्ली कमी होऊ लागल्या आहेत. संवेदना जिवंत असलेल्या जागरूक जणांनी हे जाणीवपूर्वक हेरून आपापल्या परीने अशा जागांची हिरवळ निर्माण केली तर माणसं माणसांशीच बोलतील, पुन्हा रुजतील आणि पुन्हा हिरवळून येतील!*


✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Wednesday, July 9, 2025

हिंग्लिश, मिंग्लिश आणि इंग्लिश

*हिंग्लिश, मिंग्लिश आणि इंग्लिश*
_एक मुद्दा, एक विचार!_
_8 जुलै, बुधवार_

▪️ 
*हिंग्लिश, मिंग्लिश आणि इंग्लिश*

*"बाई बाई, डोकं पिकवलं या पोरांनी!" "काय गं, काय झालं? आज पुन्हा स्कूलमध्ये काही मॅटर झाला का?" "नाही हो, कसला मॅटर होतोय, पण एवढी इंग्लिश मीडियमची मुलं त्यांना इंग्लिश सोडा, धड हिंदीही व्यवस्थित बोलता येत नाही हो. डोक्याचा पार खकाणा होतो माझ्या!" "अगं काय झालं ते तर सांगशील?"*

*"आमच्या क्लासमधल्या एका मुलाने दुसऱ्या मुलाला पेन्सिल टोचली, तर तो मला म्हणतो, मॅडम इसने मेरे पेट मे पेन्शिल खुपशी!! खुपशी?? एखादे साहेब इन्स्पेक्शनला आले म्हणजे?*

 *परवा दोन मुलांची मारामारी झाली. आले माझ्याकडे रडत. विचारलं, क्या हुआ, तर रडणारा म्हणतो, मॅम इसने मुझको बोचकाडा!! सांगा काय करू मी?*

 *दोन दिवसांपूर्वी चौथीतला अन्वय म्हणत होता, की मॅम मेरा पेट दुख रहा है. मी म्हटलं, दुख रहा हैं नाही म्हणायचं, दर्द कर रहा है असं म्हणायचं. त्याला विचारलं, क्या हुआ तुम्हारे पेट को? तर म्हणतो, पता नही, अंदर कुछ तो भी वळवळ करता है!*

 *आजचीच गोष्ट. क्लासमधला रियांश शेवटच्या लेक्चरला म्हणत होता, मैम, आज मत सिखाओ. मेरे को बहुत कंटाळा आ रहा है. मी म्हटलं, अरे कंटाळा नहीं कहेते!? तर उलट मलाच म्हणतो, मैम कंटाळे को हिंदी में क्या कहेते हैं...? बाई बाई! हद्द झाली अगदी!"*

      *"आता मी थोडं बोलू का?" "बोला, तुमचं कोणी तोंड धरलंय?" "तुमची शाळा जर इंग्लिश मीडियम आहे, तर तिथे हिंदी का बोलतात? फक्त इंग्लिश का बोलत नाहीत? मुलं मराठीतून बोलली तर शाळेला कमीपणाचं का वाटतं? आणि ज्यांना इंग्लिश येत नाही अशा हिंदी भाषिक मुलांसाठी जर हिंदी अलाऊड आहे, तर मग मराठी मुलांनी मराठीतून बोललं तर बिघडलं कुठे?*

*'हिंदी में बात करो, हिंदी सीखो' ची सक्ती कशासाठी? नवीन शैक्षणिक धोरणात 'हिंदीच बोला' असं काही म्हटलंय का? नाही ना! उलट मातृभाषेला प्रोत्साहनच दिलेलं आहे. मग हा चुकीचा अट्टाहास का म्हणून? केवळ शाळेचं इम्प्रेशन पडावं म्हणून? आणि अजून काय? तर म्हणे हिंदी पक्की होण्यासाठी. तुमच्या स्कुलमधल्या मुलांची मराठीची काय 'सिचूएशन' आहे हे पण सांग ना. त्याबद्दल तुम्हा लोकांना काहीच वाटत नाही? इतका कळवळा मराठीबद्दल तू कधी दाखवला नाहीस? आधी मराठी सुधारा मुलांचं. मग हिंदीची काळजी करा. आम्ही पाचवीपासून हिंदी शिकलो. आज अस्खलित हिंदी बोलतोच ना?आणि मला एक सांग, लहान मुलांच्या हिंदीला बोटं मोडणाऱ्या तुझ्यासारख्या अनेक टीचर्सचीही हिंदी आणि इंग्लिश बोलण्याच्या बाबतीत हीच बोंब आहे त्याचं काय?"*
 
*बायकोने सूर बदलला आणि इतकंच म्हणाली, "तुम्हीपण ना! लगेच मनाला लावून घेता. चला, मी चहा ठेवते आपल्यासाठी मस्तपैकी!"*

-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Wednesday, July 2, 2025

कमी, आम्ही आणि हमी

**कमी, आम्ही आणि हमी!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_2 जुलै, बुधवार_

▪️ *कमी, आम्ही आणि हमी!*

   *दररोज सकाळ होते, माणसं उठतात. आवरतात, कामाला लागतात. दिवसभर धावपळ करत राहतात. संध्याकाळी सूर्याने पाठ फिरवली, की माणसांची शक्ती शून्य होते. पुन्हा माणसं रात्रभरासाठी अंथरुणावर स्वतःला ढकलून देतात, सकाळी उठून पुन्हा धावपळ सुरू!*

     *प्रश्न हा आहे, की 'सकाळी उठणे आणि रात्र झाली की झोपणे' एवढेच जर माणसाच्या दिवसाचे प्रयोजन असेल तर, दररोज उठून माणसं दिवसभर इतकी धावपळ का करतात? तशीही संध्याकाळ होणारच असते की! अशी कोणती गोष्ट आहे की जी माणसांना उठून धावायला भाग पाडते? तुम्ही म्हणाल, पोटासाठी. पोटासाठी इतकं लागतं? पहाटेपासून रात्रीपर्यंतचं उसंत नं घेता राबणं लागतं? जीवघेणी स्पर्धा लागते? टोलेजंग बंगले लागतात? कोटी कोटीचा बँक बॅलन्स लागतो?  घरदार, आईबाप, बायका पोरं सगळं विसरून टारगेटमागे धावणं लागतं?  नक्कीच नाही. आणि ज्याने चोच दिली आहे तो पोटापुरता चारा तरी प्रत्येकाला देतोच ना. मग या धावपळीचं कारण? यामागे आहे तीन शब्दांची जादू. आणि ते तीन शब्द आहेत... 'काहीतरी कमी आहे!'*

    *गरीबाला वाटतं पैशाची कमी आहे, पैसेवाल्याला वाटतं सुखाची कमी आहे. धंदेवाल्याला वाटतं नफ्याची कमी आहे, नोकरीवाल्याला वाटतं पगार जरा कमी आहे. कुणाला वेळेची कमी, तर कुणाला संधीची कमी, कुणाला नाव लौकिकाची कमी, तर इस्पितळातल्या कुणाला श्वासांची कमी. काहींना तर सगळं काही असूनसुद्धा काहीतरी कमी आहेच! आणि ही कमी भरून काढण्यासाठीच तर सगळी धावपळ आहे!*

     *निर्मात्याने जेव्हा माणूस नावाचा 'घट' पहिल्यांदा बनवला, तेव्हा त्याच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी त्याने त्याच्यामध्ये टाकल्या. बुद्धी टाकली, सौंदर्य टाकलं, भाषा टाकली, प्रेम टाकलं, भावना टाकल्या, जिद्द टाकली, ऐश्वर्य टाकलं, प्रगती टाकली, कल्पनाशक्ती टाकली, यश आणि अपयश टाकलं, डोळ्यांमधले आसू टाकले, ओठांवरचं हासू टाकलं, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती टाकली, विचार करण्याची शक्ती टाकली. सगळं काही टाकून झाल्यावर शेवटची एकच गोष्ट त्याच्या हातात शिल्लक राहिली. ती टाकताना त्याने थोडा हात आखडला आणि म्हणाला,  "एवढी एक गोष्ट माझ्याकडे राहू देतो. नाहीतर हा मलाच विसरून जाईल, आणि उद्या माझ्यावरच डोळे वटारायला मागेपुढे पाहणार नाही." त्याने हात आखडता घेतला.*

     *माणसाला जेव्हा हे कळायला लागतं, की आपल्याला जी गोष्ट हवीय ती तर आपल्या निर्मात्याने त्याच्याकडेच राखून ठेवलेली आहे, तेव्हा थकूनभागून झाल्यावर तो त्याच्याकडे येतो, त्याच्या पायाजवळ बसतो, हात जोडतो, डोळे मिटतो, मनाने निर्मळ होतो... तेव्हा देव त्याच्याकडे पाहत एक हलकंसं स्मित करतो, आणि हळूच डोक्यावर हात ठेवत त्याने राखून ठेवलेली गोष्ट त्याला बहाल करतो! ती गोष्ट असते... मनाची शांतता! बस्स. ती मिळाली, की माणसाच्या धावपळीचं सार्थक होतं. कमी भरून निघते.*

   *तुम्हाला काय वाटतं? वर्षानुवर्षं दर आषाढी कार्तिकीला पंढरपुरात होणारी लाखोंची गर्दी उगीचंच होते की काय? महाराज, गेली अठ्ठावीस युगे मराठी माणसांच्या मनातली 'कमी' भरून काढण्याची 'हमी' तिथे विटेवर उभी आहे, हे त्यामागचं खरं कारण आहे !*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, June 25, 2025

सारथी

*सारथी*
_एक मुद्दा, एक विचार!_
_25 जून, बुधवार_

▪️ *सारथी*

*चारधाम यात्रा करून छत्तीसगडच्या मार्गे मंडळी महाराष्ट्रात येणार होती. गाडीचा ड्रायव्हर चुणचुणीत हुशार पोरगा होता. थोडासा अंधार पडायला सुरुवात झाली, आणि ड्रायव्हरने सांगितलं की आपल्याला इथे मुक्काम करायला पाहिजे आणि सकाळी प्रवास केला पाहिजे, कारण पुढे घनदाट जंगलामधून रस्ता जातो. हा रस्ता चांगला नाही. गाडीमधले प्रवासी खास करून स्त्रिया अतिहुशार होत्या. त्यांनी गुगलवर चेक करून सांगितलं की थोडंसंच जंगल आहे. आपण ते क्रॉस करून नंतर जे शहर लागणार आहे तिथे मुक्काम करू.*

 *ड्रायव्हरचा नाईलाज झाला. नको नको म्हणत असताना त्यांनी त्याला गाडी पुढे घ्यायला लावलीच. गाडी थोडीशीच झाडांमधून पुढे गेली असेल नसेल, तेवढ्यात एक व्हॅन मागून वेगात येताना ड्रायव्हरला आरशात दिसली. त्याच्या लगेच लक्षात आलं. त्याने जोरात गाडी दामटली, परंतु लुटारू त्याच्यापेक्षा तरबेज आणि फास्ट होते. त्यांनी गाडी थेट आडवी लावली. काही कळायच्या आत ड्रायव्हरला खेचून बाहेर काढला. त्याच्या डोक्यावर बंदूक लावली. इतरांना सांगितले ज्याच्याकडे जे आहे ते सर्व काढून येथे ठेवा नाहीतर ड्रायव्हरचा जीव जाईल. आतले गर्भश्रीमंत अतिप्रतिष्ठित लोक थरथर कापू लागले. दहा मिनिटात गाडीच्या बोनेटवर नोटांचा ढीग लागला. त्यांनी सोनं काढून द्यायला सांगितलं. जीवापेक्षा सोनं जास्त प्रिय नव्हतंच. शिवाय ड्रायव्हरला काही झालं असतं, तर इतरांची पुढे त्यांनी काय अवस्था केली असती हे कल्पनेबाहेर होतं. चुपचाप सगळं सोनं बोनेटवर ठेवलं गेलं. चांगलं पंधरा-वीस तोळे होतं. पण जीवापेक्षा मोठं नव्हतं.*

*सगळ्यांचा सुपडा साफ झाल्यावर त्यांनी ड्रायव्हरला मोकळं सोडलं. एवढ्या अवस्थेतसुद्धा बिचारा ड्रायव्हर हात जोडत म्हणाला, "साब, बस डिझेल डालने जितना पैसा दे दो, हमे अभी एक हजार मील जाना है. दुसरा पैसा नही है हमारे पास." त्यांनी यांच्याच पैशामधली एक गड्डी त्याच्या तोंडावर फेकून मारली. बाकी सगळा ऐवज कपड्यात गुंडाळून दोन मिनिटात व्हॅन अंधारात गुडूप झाली. सगळ्यांचे चेहरे पांढरेफटक पडले. ब्र शब्द बोलण्याची कुणाची हिंमत होईना. ड्रायव्हरने गुपचूप गाडी काढली. घरापर्यंत येईपर्यंत कोणी एक शब्दही कोणाशी बोललं नाही.*

 *घरी आल्यावर सगळे ड्रायव्हरच्या गळ्यात पडून रडायला लागले. सगळ्यांना सुरक्षित घरी आणलं म्हणून त्याचा मोठा सत्कार केला!*

*चारधामच्या चार यात्रा अगोदरच करून आलेल्या अनुभवी ड्रायव्हरचं अगोदरच ऐकलं असतं, तर एवढा अनर्थ घडला असता का? पण तोंड मोकळं असलेली वाचाळ माणसं स्वतःबरोबरच इतरांनाही अडचणीत आणतात ती अशी. ज्या यात्रेला लोक जातात, त्या देवाने तरी यांना थोडी सद्बुद्धी द्यावी म्हणजे प्रवास सुखाचा होईल.*

*आणखी एक. ड्रायव्हरला कधीही कमी लेखू नये. तो ड्रायव्हिंगच्या क्षेत्रातला राजा असतो. त्याला योग्य तो सन्मान दिला पाहिजे. रस्त्यात मुद्दाम गाडी थांबवून त्याचा चहा पाणी त्याला विचारलं पाहिजे. तोंडावर पाणी मारू दिलं पाहिजे. त्याने जेवण केलं की नाही याची विचारपूस केली पाहिजे. शक्य असेल तर आपल्या सोबतच त्याच्याही जेवणाची व्यवस्था केली पाहिजे.*

 *आणि हो! आपल्याला सुरक्षित घेऊन जाणाऱ्या आणि पुन्हा सुरक्षित आपल्या घरी घेऊन येणाऱ्या या अतिमहत्त्वाच्या देवतुल्य माणसाला ड्रायव्हर म्हणून हिणवण्यापेक्षा सारथी म्हटलं तर?*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...