◾
*थोडा वेळ देता का वेळ?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_17 सप्टेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
◾
*थोडा वेळ देता का वेळ?*
*दुपारी चहाचा ब्रेक झाला होता. दोन मित्र कॅन्टीनच्या टेबलवर चहा पीत बसले होते. एक जरा तणावात दिसत होता. पहिल्याने विचारलं, "काय भाई, अजून सॅलरी झाली नाही त्याचं टेन्शन आहे का? दुसऱ्याने म्हटलं, “नाही रे, पैशांचा प्रॉब्लेम नाहीये, कारण मिसेसपण जॉब करते, मीपण जॉब करतो. भरपूर पैसा येतो महिन्याकाठी. प्रॉब्लेम वेगळाच आहे.” पहिल्याने विचारलं, “काय झालं मग.” दुसरा म्हणाला, “यार आमचं बाळ आमच्याकडे येत नाही. हात पसरले तरी येत नाही आणि बळजबरी घेतलं तर आमच्यासोबत हसत खेळत नाही.”*
*ऐकणाराला हा जरा वेगळाच प्रॉब्लेम वाटला. त्याने म्हटलं, “मग कुणाबरोबर चांगलं खेळतं?” “आंटी सोबत.” “त्याची आंटी दिवसभर त्याच्याबरोबर असते का?” “अरे आंटी म्हणजे पाळणाघरातली आंटी.” “म्हणजे?” “तुला तर माहीतच आहे ना, इथे शहरात जगणं किती अवघड आहे ते. आम्ही दोघेही नवरा-बायको जॉब करतो. आता लग्नापूर्वी इतकी छान छान स्वप्नं पाहिली होती म्हणजे जॉब करणं आलंच. तिलाही सकाळी लवकरच बाहेर पडावं लागतं; मलाही. मग आठ-नऊ महिन्याच्या बाळाला कोण सांभाळणार? ती काही त्याला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. मग आम्ही त्याला दिवसभरासाठी पाळणाघरात ठेवतो. तिथे त्याला तीन वेळेस जेवण वगैरे मिळतं. कशाची कमी नाही. इतर लहान बाळांबरोबर खेळतंसुद्धा. दिवसभर छान राहतं. पण संध्याकाळी जेव्हा आम्ही त्याला घ्यायला जातो, तेव्हा ते आमच्याकडे येत नाही. खूप रडतं. सारखं आंटीकडे झेप घेतं. घरी आणलं की किरकिर करतं. काल ते इतकं रडलं की त्याला घरी आणू की नको असं आम्हाला झालं होतं. आता दिवसभर बाळाला एकट्याला घरीही ठेवू शकत नाही. बायकोला म्हटलं तू जॉब सोड, तर ती म्हणते पन्नास हजाराचा जॉब सोडू का? ऐकायला तयार नाही. मी जॉब सोडू शकत नाही. गावाकडून ना तिचे आईवडील इकडे येत, ना माझे. काय करावं डोकं काम करत नाही यार. लवकर बाळ जन्माला घालायचं नव्हतं पण होऊन गेलं ते, आणि आता ही डोकेदुखी!”*
*लहान बाळाला माहेरी ठेवून दूर कुठेतरी बीएड करणारी मुलगी, दोन महिन्याच्या बाळाला सासू-सासऱ्यांच्या हवाली करून इंग्लिश मिडीयमच्या कुठल्याशा शाळेवर शिकवायला जाणारी मम्मी, जड अंत:करणाने पाळणाघरात बाळाला दिवसभर ठेवून तथाकथित जॉब करणारे मम्मी पप्पा, स्वतः खेड्यात राहून शहरात इतरांकडे मुलांना शिकायला ठेवणारे आईवडील, यांना जेव्हा त्यांची मुलंच नाकारतात, इतरांना मम्मी 'पपा म्हणतात, आणि यांना काका काकू वगैरे म्हणतात, तेव्हा त्यांची वेदना काय म्हणत असेल बरं? त्यांच्यासाठीच कमावलेला पैसा त्यांना खायला उठत नसेल का? शेवटी जगण्यातून आनंद वजा केला तर शिल्लक काय उरते? केवळ शून्य! म्हणून जेव्हा मुलांना आपला वेळ हवा आहे, तेव्हा त्यांना वेळच द्यायला हवा. कारण पैशाने केवळ सोयीसुविधा मिळतील, गमावलेली मुलं नाही!*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc