Wednesday, September 10, 2025

खरा शिक्षक कोण

*खरा शिक्षक कोण?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_10 सप्टेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

*खरा शिक्षक कोण?*

    *खरा शिक्षक कोण? या अवघड प्रश्नाचे सोपे उत्तर अगोदरच देऊन टाकतो!  शाळा सोडून गेल्यानंतरही आयुष्यभर जो विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील, तो खरा शिक्षक. 'आमचे सर!' किंवा 'आमच्या मॅडम!' असे म्हटल्याबरोबर ज्यांचा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो ते ‘खरे’ शिक्षक!  बाकीचे नुसते शिक्षक. माझ्या छोट्याशा कारकिर्दीत मला आढळलेले शिक्षकांचे सहा प्रकार पुढील प्रमाणे. आपण शिक्षक असाल तर यात कुठे बसता ते शोधा. विद्यार्थी असाल तर आठवा.*

*1. नवीन शिक्षक!*
*नवं रक्त असतं, उत्साह फार, पण नॉलेज कमी, सगळं कॉपी पेस्ट! घे गाईड, सांग समजून. मार रट्टा. शिवाय जुण्यांची कामं ऐका. शिंगरू ओझ्यानेच मरण्याची शक्यता जास्त. शिकवणं बोंबललं.*

*2. मॉडेल शिक्षक!*
*इतकं नटतील की त्याला माप नाही, सर मॅडम एक समान. मुली सरांवर फिदा, मुलं मॅडमवर फिदा!! तिसरं लिहीत नाही. मग मुलांनी शिकायचं की मेकप बघायचा? की फ्लर्ट करायचं?*

*3. हास्य शिक्षक!*
*इतकं हसवतील की शिकवण्याचं राहूनच जाईल. मुलं डोक्यावर घेतील पण मुख्याध्यापक? आणि इतर शिक्षक? त्यांच्या नजरेतून उतरतील. कारण, परीक्षा डोक्यावर आली तरी अभ्यासक्रम अपूर्णच. त्याचं काय?*

*4. कठोर शिक्षक!*
*असं म्हटलं जातं की यांच्यामुळे शाळेची शिस्त टिकून आहे. पण, ‘दिसला पोरगा की काढ ठोकून!’ ही मानसिकता. त्याची साधी चौकशी नाही, की समजून घेणं नाही. चुकीला माफी तर नाहीच. मग 'मारकुट्या' नाव नाही पडलं तर काय कमावलं?*

*5. अनुभवी शिक्षक!*
*पोक्त म्हणूया. बाकीच्यांचे वय तेवढी तर यांची कारकीर्द! मुलं सोडा, त्यांच्या बापांनाही यांनी शिकवलेलं असतं! तसं ते बोलूनही दाखवतात. पण एक प्रकारची कामात शिथिलता. ‘आपले काय?  थोडे राहिले’  ही मानसिकता. नवं तंत्रज्ञान शिकण्यातला पराकोटीचा आळस. ‘फेक तिकडं!’ ही भूमिका. ‘करत नाही म्हणून सांग त्याला!’ ही गुर्मी. मग कसं जुळवून घेणार नव्या पिढीशी? यांना मुलांची घेणं देणं नाही, मग मुलांनाही यांच्याशी घेणं देणं नसतं!*

  *बाकी काही असो. शिक्षणाचा महामेरू आजही सहाव्या प्रकारातल्या 'धडपडया शिक्षकांनी' पेलून धरलेला आहे. त्यांच्यात वरील सर्व प्रकार चिमूटभर असू शकतात; पण कोणत्या प्रकारात किती अडकायचं याच भान त्यांना असतं. मुलांसाठी जीवाचे रान करणाऱ्या, स्वतःचं आयुष्य उधळून देणाऱ्या, खिशाला चाप पडला तरी मागे न हटणाऱ्या आणि ‘माझा प्रत्येक विद्यार्थी घडलाच पाहिजे!’ या ध्येयाने पछाडलेल्या ध्येयवेड्या अशा शिक्षकांमुळेच शिक्षणक्षेत्राच्या कपाळावरचा पावित्र्याचा मंगल तिलक शोभून आणि टिकून आहे. आणि जोपर्यंत ही धडपडी मंडळी शिक्षण क्षेत्रात येत राहतील, तोपर्यंत शिक्षण हाच प्रत्येकाचा तिसरा डोळा राहील!*

-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Wednesday, September 3, 2025

आनंदाचा टिळा

*आनंदाचा टिळा*
_एक मुद्दा, एक विचार!_
_03 सप्टेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*आनंदाचा टिळा* 

        *उत्साहाने अगदी ओसंडून वाहणारी काही माणसं असतात. त्यांना कधीही पहा, नेहमी टवटवीत असतात. चेहऱ्यावर मस्तसं स्मित असतं. कोणतीही नवी कल्पना मांडा, ती ऐकायला ही माणसं सर्वांच्या पुढे! काहीही काम सांगा, जबाबदारी घ्यायला सगळ्यांच्या अगोदर! निम्मं काम एकट्याच्या जीवावर ओढण्याची यांची हिंमत आणि तयारी असते. कोणताही विषय काढा, यांची त्याच्यावर पीएचडी ठरलेली! अनुभवांचं, किश्श्यांचं भांडार म्हणजे अशी माणसं. बोलतील तर असं की मैफल सजलीच पाहिजे!*

     *देवाने त्यांना खास सवडीने बनवलेलं असतं. साबणावर शाम्पू फ्री देतात ना, तसंच देवाने त्यांना श्वासांसोबत उत्साह फ्री दिलेला असतो! त्यांच्या चेहऱ्यावर असे काही तेज असते की बघणाऱ्याला प्रश्न पडावा, “कौनसी चक्की का आटा खाते हो भाई?”*

        *ही माणसं जिथे कुठे असतील तिथे स्वर्ग निर्माण करतील. त्यांचं नुसतं उपस्थित असणं म्हणजे आनंदाचा अभिषेक! पावसाआधीचा गारवा! त्यांचे शब्दही इतके प्रभावी असतात की मरगळलेल्या मनालाही क्षणात जगण्याची उभारी मिळावी. जगण्यासाठी बुद्धिमत्ता लागत नाही, तर आनंद लागतो! हा आनंद या माणसांकडे असतो.*
 
       *उत्साही माणसं श्रीमंत असलीच पाहिजेत असा काही दंडक नाही. श्रीमंत माणूस उत्साही असेलच असंही नाही. उत्साही असण्याची प्रतवारीच वेगळी आहे. या माणसांचे संसार पहा. फार उत्साहाने त्यांनी त्यांचा संसार फुलवलेला असतो. त्यांचं घर छोटेखानी असलं तरी त्यांनी असं सजवलेलं असतं की बंगल्यावाल्याला भारी! या उत्साहाच्या बळावरच ही माणसं लढत असतात. ती प्रत्येक वेळेला जिंकतातच असं नाही; परंतु हारल्यावर पुन्हा उठून लढण्याची हिंमत आणि उत्साह त्यांच्यात जितका असतो तितका इतरांमध्ये नसतो.*

     *या ग्रेट लोकांना खिंडीत गाठण्यासाठी देव त्यांना मुद्दाम निरुत्साही माणसांमध्ये टाकतो! त्यांच्या भोवती मुद्दाम आळशी, काही करण्याची हिंमत नसलेली, उमेद नसलेली, कायम नकारात्मक विचार करणारी माणसे टाकतो. पण पूर आलेली नदी जसं तिच्यासोबत ओलं सुकं सगळं वाहून नेते तसंच ही उत्साही माणसंही आपल्यासोबत असलेल्यांना पुढे रेटून घेऊन जातात. अशी कितीतरी निरुत्साही माणसं, त्यांच्या नोकऱ्या, त्यांच्या जागा ह्या केवळ त्यांच्यासोबत असलेल्या उत्साही माणसांच्या बळावर टिकून आहेत. हे काम करतात, ते श्रेय घेतात! उत्साही माणसं तिथून वजा केली, की बाकीची मंडळी भुईसपाट झालीच म्हणून समजा!*
 
     *आपण या उत्साही माणसांना जपलं पाहिजे. कारण त्यांचा उत्साह मावळला की अवेळी सूर्य झाकोळल्यासारखं वातावरण तयार होतं. लोहचुंबकाच्या सानिध्यात आलेल्या लोखंडामध्येही जसा काही काळ का होईना, लोहचुंबकाचा गुण उतरतो, तसाच आपल्या सानिध्यात असलेल्या एखाद्या उत्साही माणसाकडून थोडासा उत्साह उसना घेऊन हा आनंदाचा टिळा आपल्याही कपाळी लावला तर काय हरकत आहे?* 
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Thursday, August 28, 2025

खेळ नियतीचा

*खेळ नियतीचा*
_एक मुद्दा, एक विचार!_
_27 ऑगस्ट, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*खेळ नियतीचा* 

*"हं बोला, काय झालं?" "डॉक्टर, मी दोन महिन्यांपासून झोपलेलो नाहीये." टेबलाच्या पलीकडून बसलेल्या त्या इसमाच्या डोळ्यात खोल बघत हसत डॉक्टर म्हणाले, "मोबाईल जरा कमी बघत जावा." समोरचा माणूस म्हणाला, "नाही. माझ्याकडे अकराशे रुपयेवाला बटनाचा मोबाईल आहे." "मग काय कारण आहे?" "माझा भाऊ." "काय झालं त्याला?" माझ्या स्वप्नात येतो." "आणि?" "आणि मला म्हणतो की दादा तू मला का वाचवलं नाहीस? मग पुढची रात्रभर मी झोपू शकत नाही!"*

   *डॉक्टरांनी खुर्ची सरळ केली. त्यांचा चेहरा गंभीर झाला. सावरत बसत म्हणाले, "काय झालं तुमच्या भावाचं जरा सांगाल का?" समोरचा इसम म्हणाला, "डॉक्टरसाहेब, एका दुपारी आम्ही दोघेच घरात सोफ्यावर बसलेलो होतो. अचानक त्याच्या छातीत जळजळ व्हायला लागली. तो मला म्हणाला की मला ऍसिडिटीसारखं होतंय. गोळी दे ना. मी म्हटलं, ड्रॉवरमध्ये तूच ठेवलेली आहेस ना. घे ना तिथून. मला वाटलं तो घेईल उठून. पण काही कळायच्या आतच तो जमिनीवर गडबडा लोळायला लागला. मीही गांगरून गेलो. मी उठून गोळी आणून देईपर्यंत त्याने मान टाकलीसुद्धा. माझा प्रिय भाऊ माझ्या डोळ्यांदेखत मला सोडून गेला डॉक्टरसाहेब. मी तिथेच असून, शिवाय त्याने मला मदत मागूनसुद्धा त्याला वाचवू शकलो नाही. तेव्हापासून त्याच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे असं मला सारखं वाटत राहतं. आता ही गोष्ट मला खायला उठली आहे. साहेब मी काय करू? हे ओझं कसं उतरवू?”*
 
    *डॉक्टरांनी आवंढा गिळला आणि म्हणाले, "माझे वडीलही दोन वर्षांपूर्वी असेच माझ्यासमोर गेले. मी काहीच करू शकलो नाही. जे तुम्हाला वाटतंय ते दुःख, ते शल्य डॉक्टर असून मीही कित्येक दिवस वागवलंय. पण आता मी सावरलो आहे. कारण मला एक गोष्ट समजली आहे. आपलं आयुष्य त्या मैदानावरच्या क्रिकेटच्या खेळासारखं असतं. कधी आपण खेळाडू असतो तर कधी प्रेक्षक. जेव्हा आपण खेळाडू असतो तेव्हा जीवाची बाजी लावून खेळ जिंकण्याचा प्रयत्न करतो, जिंकतोच. पण जेव्हा आपण प्रेक्षक असतो, तेव्हा डोळ्यासमोर खेळ हरत असतानाही आपण मैदानात उतरू शकत नाही. आपल्याला तशी परवानगीच नसते. आपण कितीही चांगले खेळाडू असलो तरी! तेव्हा आपण फक्त हतबल होऊन बघणारे असतो... हरलेल्या मॅचला प्रेक्षक जबाबदार नसतो. म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ज्या दिवशी तुमचा भाऊ गेला त्या दिवशी तुम्ही प्रेक्षक होता, खेळाडू नाही. समोरच्या माणसाने डबडबल्या डोळ्यांनी विचारलं, "मग त्या दिवशी खेळत कोण होतं?" डॉक्टरांनी एक श्वास घेतला, आणि म्हणाले, "नियती! तिच्यापेक्षा मोठा खेळाडू कोण आहे?"*

   *दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्या माणसाचा फोन डॉक्टरांना आला. त्याने म्हटलं, " थँक्यू डॉक्टर, दोन महिन्यानंतर काल रात्री जे झोपलो ते आत्ता उठलो! माझी झोप परत मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद."*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Wednesday, August 20, 2025

सलाम त्यांनाही

*सलाम त्यांनाही*
_एक मुद्दा, एक विचार!_
_20 ऑगस्ट, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*सलाम त्यांनाही*


*एक प्रज्ञाचक्षु ऑफिसर होते. त्यांच्या डोळ्यावर महागडा काळसर चष्मा असल्याने बऱ्याचदा लोकांना ते दृष्टीने अधू आहेत हे समजायचंच नाही. त्यांना भेटायला कोणीही येवो, ते त्यांना स्वतःचं नाव सांगायचे, त्यांचे नावही विचारून घ्यायचे. शेक हॅन्ड करायचे. बस. हाताचा स्पर्श होताच त्याची ओळख आयुष्यभरासाठी साहेबांच्या मेंदूमध्ये नोंद होत असे. त्याचा आवाज त्यांच्या मेंदूमध्ये कोरला जात असे. एकदा असंच त्यांना भेटायला एक सदगृहस्थ गेले. त्यांना शेक हॅन्ड केलं, आणि फक्त नमस्कार म्हटलं. साहेबांनी क्षणात त्यांची पूर्ण कुंडली त्यांना ऐकवली. ऐकणारा थक्क झाला. कारण तो त्यांना पाचेक वर्षापूर्वी केवळ एकदा भेटला होता!*

*आयुष्याची लढाई अपुऱ्या शरीराने लढणाऱ्या या लढवय्यांना खरं तर सलामच केला पाहिजे. पण समाज त्यांची कीव करतो. ‘अरेरे!’ म्हणतो. केवढा हा विरोधाभास! आपल्याला परवा भेटलेला माणूस कोण होता हे आठवत नाही. डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरे तर खरे आपण असतो, आणि खापर मात्र इतरांवर फोडतो!*

*आणखी एक, जितका संघर्ष या दिव्यांग, प्रज्ञाचक्षु, विशेष, किंवा आजाराशी झुंजणाऱ्यांच्या वाट्याला असतो, त्याहूनही खूप मोठा संघर्ष करणारा एक घटक कायम दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे यांचा सांभाळ करणारी देवमाणसं! त्यांच्यासाठी स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या स्वप्नांची राखरांगोळी करणारी घरातली ही माणसं आपलं पद, प्रतिष्ठा, नोकरी, पैसा, आयुष्य सगळं सगळं डावावर लावून त्यांना वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात, खूप सोसतात, दवाखाने, मंदिरं, आश्रम, गंडेदोरे... सगळं पालथं घालतात. कर्जबाजारी होतात, कंगाल होतात. अवघं आयुष्य उधळतात! कधी हरतात, कधी जिंकतात. कधी कधी नाउमेद होऊन थकतात. त्यात आणखी कधी माणूस हाती लागतं, कधी लागत नाही. खूप अवघड लढाई असते ही.*

 *या दमछाक करणाऱ्या प्रवासात ज्यांची मानसिकता सकारात्मक आहे, बाणा लढाऊ आहे, ते फक्त टिकतात. ते स्वतःला कमनशिबी समजत नाहीत. उलट म्हणतात, “माझ्यात याला सांभाळण्याची धमक आणि ताकद आहे हे प्रत्यक्ष देवालाही माहीत आहे, म्हणून त्याने त्याचं हे लाडकं अपत्य सांभाळायला माझ्याकडे दिलेलं आहे!” हा खूप मोठा विचार त्यांना लढतं ठेवतो. समाज म्हणून आपण त्यांचा संघर्ष, त्यांची वेदना समजून घेतली पाहिजे, त्यांना सहानुभूती नव्हे, तर लढण्याचं बळ दिलं पाहिजे. कारण ही माणसं अजूनही घराघरात टिकून आहेत म्हणून हे जग जगण्यासाठी अद्याप लायक आणि शिल्लक आहे. हात, पाय, डोळे नसलेल्यांनी गाठलेल्या उत्तुंग यशाच्या कहाण्या आपण ऐकतो, पाहतो. त्यांचं कौतुक करतानाच त्या याच माणसांच्या आटलेल्या रक्ताने अगोदर लिहिल्या गेल्या होत्या याची जाणीव ठेवली तरी पुरे!*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, August 13, 2025

बिनधास्त बायका

*बिनधास्त बायका!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_13 ऑगस्ट, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*बिनधास्त बायका*

*स्त्री म्हणजे सौंदर्य, सौभाग्य, सौजन्य, आणि समजूतदारपणा याची साक्षात परमेश्वराने प्रत्यक्षात साकारलेली कल्पना. पण काही थोर स्त्रियांचं व्यक्तिमत्व या चौकटीत मावत नाही. त्यांच्यासाठी सौंदर्याची व्याख्या ब्युटी पार्लरपासून सुरू होते. त्यांचं सौभाग्य तर त्यांच्या मुठीत लग्नापासूनच कैद असतं, वरून देवाने काहींना आणखी एक ‘सौ’ मोफत दिलेला असतो, तो म्हणजे सौष्ठव, म्हणजे खातंपितं शरीर! त्यामुळे त्या कोणाच्या बापालाही घाबरत नाहीत, नवऱ्याला तर नाहीच! आणि बिनधास्त स्वभावामुळे सौजन्याची त्यांनी कित्येक वेळा पार ऐशीतैशी करून टाकलेली असते! यावर उतारा म्हणून काही नवरे मंडळी ‘देशी’ जवळ करतात, परंतु त्याने काही फरक पडत नाही!*

 *या प्रकारातील काही स्त्रियांचे वय, वजन, शब्द, आवाज आणि त्या स्वतः सुद्धा भारदस्त असल्यामुळे कोणाची त्यांच्याकडे किंवा त्यांच्या नवऱ्यांकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होत नाही!*

    *अशाच एका बाजाराला गेलेल्या जोडीची गाडी नेमकी पोलिसाने अडवली. नवऱ्याला फैलावर घ्यायला लागला. लायसन्स दाखवा, पीयूसी दाखवा वगैरे वगैरे. नवऱ्याने खिशातून शंभरची नोट काढली. तितक्यात बायकोने पाहिलं. रणरागिणी थेट पोलिसालाच भिडली. ‘तुम्हाला फक्त पैसे खायला पाहिजेत, गोरगरिबांना नाडता, कोणत्या कायद्यात असं लिहिलेलं आहे? दाखवा!’ वगैरे म्हणत त्याचं पार भजं करून टाकलं. दोन मिनिटात चौकात हीs गर्दी झाली. चक्क पोलीस कावराबावरा झाला. म्हणाला, “माफ करा वहिनी, चूक झाली, आता कायद्याप्रमाणे सांगतो” असं म्हणत विनम्रपणे त्याने ‘हे नाही, त्याचे पाचशे रुपये, ते नाही त्याचे सातशे रुपये!’ असं कागदावर लिहीत लिहीत चांगली तीन हजार रुपयांची पावती फाडली! सणाचा बाजार तिथेच झाला! वरून बायकोने नवऱ्याला गाडीचे कागदपत्र व्यवस्थित न सांभाळल्याबद्दल शिव्या घालत घरी आणलं ते वेगळंच!*

     *काही स्त्रियांचे तोफखाने इतके धडाडीचे असतात की त्यांचं वैयक्तिक मतप्रदर्शन सगळी गल्ली ऐकते. त्यांनी स्वतःच्या पोराला घातलेला धपाटा ऐकून शेजारणीचं पोरगंही गप्प बसतं. त्या जर भांडायला उतरल्या, तर गल्लीतल्या बायकांचा सुपडा साफ होतो!! पण याच बोलभांडपणामुळे बिचाऱ्यांचं बऱ्याचदा नुकसानही खूप होतं. त्यांचं खरं असूनही त्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. कशाचंही खापर त्यांच्यावरच फोडलं जातं.*

   *बाकी काही असो, या बायका असतात खूप मायाळू. खूप भावनिक. त्यांना आनंदी राहायला, गप्पा मारायला आवडतं. खूप जास्त टेन्शन त्या हाताळू शकत नाहीत. चिडचिड करतात; परंतु संसारासाठी, मुला-बाळांसाठी होता होईल तेवढं राबतातसुद्धा. त्यांचाही एक हळवा कोपरा असतो. तो समजून घेणारा जर कोणी भेटला तर त्या अशा खुलतात की बस! ज्याचं नाव ते! अशा स्त्रियांना समाजाने आदराच्या, प्रेमाच्या नव्या भिंगाने पाहिले तर त्यांच्यातील वात्सल्यरूपिणी बहिण, मैत्रीण, बायको, आई सहज बघता येईल, नव्याने अनुभवता येईल!*


✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Wednesday, August 6, 2025

नवी वाट

*नवी वाट!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_06 ऑगस्ट, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*नवी वाट*

   *प्रत्येक सकाळ ही एक अजब गोष्ट आहे. इतर काही होवो, ना होवो, सकाळ रोज होते. सूर्यदेव कोवळ्या सुवर्णकिरणांचा शिडकावा आपल्यावर करतात. त्यांच्याकडून दीड जीबी डेटा घेऊन आपण कामाला लागतो. दिवस त्याची दिनचर्या इमानेइतबारे पाळतो. आपण त्याच्यामागे गाड्याबरोबर नाळ्याची जत्रा साजरी करतो. काही तासांच्या फिराफिरीनंतर रात्र झाली की “डेटा संपला!” म्हणत आपण हळूच झोपेच्या कुशीत शिरतो; कारण उद्या उठायचं असतं! उद्या आपण असू की नाही माहित नाही; परंतु उद्या सकाळ होणार म्हणजे होणारच! उजाडणार म्हणजे उजाडणारच! तुम्ही म्हणाल, रात्र आहे म्हणजे उद्या दिवस उगवणारच की! त्यात काय एवढं?*

   *मग सांगा, जितके आपण ‘आजच्या सरणाऱ्या काळ्या रात्रीबरोबर उद्याचा लख्ख दिवस उगवणारच आहे’ याबाबत शंभर टक्के ठाम असतो, तितकेच ‘आज वाट्याला आलेली वाईट परिस्थिती उद्या काहीही करून बदलणारच आहे’ याबाबतीत का नसतो?*

   *रात्रभर दुःख उशाला घेऊन निजलेली अनेक माणसं सकाळ त्यांच्या स्वागताला आल्याबरोबर कालचं शिळं दुःख तिच्या तोंडावर फेकून मारतात. मग सकाळ तरी बिचारी त्यांच्यासाठी काय करू शकणार? उलटपक्षी, कालचा सगळा त्रास, अपमान, नुकसान, दुःख रात्रीच्या अंधाराला "समर्पयामि!" करून आशेचं, प्रयत्नांचं, यशाचं आणि आनंदाचं पसाभर दान तिला मनापासून मागितलं तर ती नाही म्हणणार नाही. तिला आपल्याकडून काय हवं असतं? थोडंसं स्मित, थोडीशी लढण्याची तयारी. बस. हे ज्यांना कळतं, त्यांच्या पदरात सकाळ भरभरून दान टाकते!*

    *आणखी एक. कणा ताठ असणाऱ्यांची परिस्थिती बसून राहत नाही. कारण त्यांचा लढाऊ बाणा. ‘आज परिस्थिती कितीही हालाखीची असो, मी ती बदलवून दाखवीन, तोपर्यंत मी प्रयत्न थांबवणार नाही. आज जरी माझ्या पदरात अमावस्या पडलेली असली तरी पौर्णिमेचा चंद्र पदरात पाडून घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही!' असा आत्मविश्वास त्यांच्यात ठासून भरलेला असतो. दिवस बदलण्यासाठी आटोकाट संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाने तो स्वतःमध्ये भरून घ्यायला हवा. कारण गलितगात्र झालेल्या कालच्या देहाला लढण्यासाठी पुन्हा उभारी कोण देणार? तर तो आपल्या आत पेटलेला जाळ! मग अशा लढाऊ माणसासाठी सकाळ मोठी बहीण बनते, त्याच्या पाठीशी भक्कम उभी राहते. कालचं विसर म्हणते, अग्नीचा स्त्रोत असलेला आजचा नवा सूर्य त्याच्या हवाली करते. लढ म्हणते!*

   *एक मात्र खरं आहे. हतबल झालेल्या कितीतरी जणांना कोणत्यातरी एका नवीन सकाळीच प्रकाशाची नवी वाट सापडली आहे. काय सांगावं? आजची सकाळ खास आपल्यासाठीच देवाने पाठवली असावी?*  

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, July 30, 2025

लोढणं बांधलेला जीव

*लोढणं बांधलेला जीव!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_30 जुलै, बुधवार_

▪️
*लोढणं बांधलेला जीव!*

  *आजकाल गाई, म्हशी, बैल या जित्राबांची संख्या घटत चाललीय. ज्यांच्याकडे आहेत त्यांना देवकृपेने काही कमी नाही. गावाकडं उधळणाऱ्या जनावराच्या गळ्यात लाकडाचं नाहीतर लोखंडाचं लोढणं बांधतात, आणि त्याला जखडून टाकतात.*
 
   *भागाभागानुसार त्याला कोणी लोढं, कोणी गंडास, कोणी गंजार, कोणी गळपट्टा, कोणी अंगठीसुद्धा म्हणतात. तर या लोढ्यामुळं ते जनावर जरा नियंत्रणात राहतं आणि शेतकऱ्याचा जीव निर्धास्त राहतो... आपल्या बाबतीतही नियती असंच करते याचा तुम्ही कधी विचार केलाय का?*
  
      *बऱ्याचदा वरकरणी आपल्याला अतिशय आनंदी, कुठलंही टेन्शन नसलेला, हरहुन्नरी  वाटणारा एखादा माणूस वैयक्तिक पातळीवर मात्र एक पराभूत, दयनीय आणि हतबल जीव असतो! लोढणं बांधलेला जीव! नियतीने त्याच्या उजव्या पायाशी एक भला मोठा अदृश्य दगड लोढणं म्हणून बांधून ठेवलेला असतो. तो कोणाला दिसत नाही. हा माणूसही तो कुणाला दाखवत फिरत नाही.*

   *कुणाला कर्जाचं लोढणं, तर कुणाला कोर्टाचं. कुणाला घरातल्या कुणाच्यातरी नाहीतर स्वतःच्या जीवघेण्या आजाराचं लोढणं, तर कुणाला गळ्यात पडलेल्या चुकीच्या माणसाचं! नावं वेगवेगळी, पण शेवटी ते लोढणंच! माणूस अक्षरशः हे लोढणं कसाबसा ओढत पुढे जात असतो. मनाशी म्हणतो, “मी खूप हुशार होतो; आणखी खूप प्रगती करू शकलो असतो, पण या लोढण्यामुळे जखडला गेलो.*

 *जनावरं असं जखडून ठेवल्यावर काय म्हणत असतील माहित नाही, पण माणसं मात्र एकांतात “हे माझ्या वाट्याला काय टाकलंस देवा?” अशी आर्त विचारणा देवाला नक्की करत असतात. ना कोणाला सांगू शकत, ना कोणापुढे रडू शकत. एक खंत आयुष्यभर माणसाला खात राहते; एक शल्य त्याला आयुष्यभर बोचत राहतं. पण गळ्यात लोढणं बांधलेलं असतानाही एखादं जित्राब जसा स्वतःचा आब राखून असतं, तसाच या माणसाचाही समाजातला वावर खंबीर असतो.*
 
     *असं कोणी भेटलं तर त्याच्या लोढण्याची टर उडवू नये. त्याला सहानुभूती दाखवून खुजंही करू नये. त्याला मदत करता आली नाही तरी हरकत नाही, पण त्याच्या जखमेवर मीठ मात्र चोळू नये. उलट पायात लोढणं असतानाही, पाय मोकळे असलेल्यांपेक्षा वेगात धावण्याची कोणत्याही क्षणाला तयारी दाखवणाऱ्या अशा जिगरबाज माणसाला जोरदार सॅल्यूट ठोकावा! त्याच्यापासून काही शिकावं; प्रेरणा घ्यावी. कारण अशी माणसं समाजातले दीपस्तंभ असतात, जे इतर भरकटू पाहणाऱ्यांना आणि हतबल झालेल्यांना दिशा दाखवण्याचं काम करतात, लढण्याचं बळ देतात. साक्षात मृत्यूसुद्धा त्यांना वचकून असतो, कारण...*

*जगायाची प्रबळ इच्छा यमाशी झुंजते तेव्हा*
*लढाई जिंकणाऱ्याला... सलामी ठोकतो मृत्यू!*

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...